unknown person holding clear glass ball

पृथ्वी - धरा

The Earth

चिंतन

Kavita Saraf

7/3/20251 min read

पृथ्वी धरा

त्या दिवशी वारी करताना मी विचार करत होते....की ही पृथ्वी माता किती त्रास सहन करते पण तिच्या अंगाखांद्यांवर वावरणाऱ्या तिच्या लेकरांची ती किती काळजी घेते .... सकाळी उठताना 'कराग्रे वसते ...' आणि 'समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णूपत्नीं क्षमाम देहीं पादस्पर्श क्षमस्व मे' ... म्हणून दिवसाची सुरवात आजही होते. त्या दिवशी मी वारी करताना पूर्ण वेळ हा श्लोक म्हणत, पृथ्वी मातेचा विचार करत वारी पूर्ण केली आणि आधीच्या वारींपेक्षा हि वारी कमी त्रासाची झाली, प्रत्येक पाऊल मखमली झालं आहे असं वाटतं होतं आणि नंतरही पाय फार दुखले नाहीत.

अगदी सुरवातीपासून विचार केला तर..... Milky Way आपली आकाशगंगा आणि आपलं जग, त्याची उत्पत्ती ... हिरण्यगर्भ, ॐकार ध्वनी (primordial Om), पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, त्रिगुण, त्रिगुणातून ब्रह्मा, विष्णू, महेश आणि मग सृष्टी. शिवईच्छेप्रमाणे ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची वेळ आली तेव्हा काही सुचेनासं झालं (cold feet) ....मग शिवलीलामृतातल्या ११ व्या अध्यायात म्हटलं आहे त्याप्रमाणे .... 'विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, येरु म्हणे मज नाही ज्ञान , मग शिवे तयालागून चारी वेद उपदेशिले' ....वेद आणि मग सूर्य, चंद्र, पंचमहाभूते असा सगळा क्रम अस्तित्वात आला. हाच क्रम सांख्यदर्शनाने सुद्धा वर्णिला आहे. कालचक्र-विविध युगं, सप्तर्षी आणि ह्या सगळ्यांचा अविष्कार सादर करण्यासाठी असलेला भव्य रंगमंच म्हणजे आपली पृथ्वी.... इतका खोल विचार पृथ्वीच्या अस्तित्वामागे आहे...

माझ्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्टीतलं आवडतं काम म्हणजे बालनाट्य पहाणे, एका तिकीटामध्ये ३ बालनाट्य अस काहीसं असायचं .... आई छान छान नाटकांची तिकीट काढून आणायची आणि मी आणि माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन बालनाट्याला जायची तयारी करायची. म्हणजे आधी तिकीट काढून आणणं आणि प्रत्येक मुलासाठी खायला - चिवडा, वेफर्स, एक्सट्रा स्ट्रॉंग च्या गोळ्या आणि साधी किंवा क्रीम बिस्किट्स असा साधा खाऊ घरून वेगवेगळा पॅक करून आणायची आणि मग सोबतीला कधी पाणी, कोकम सरबत किंवा पन्हं. तर अशाच बालनाट्यांपैकी एक बालनाट्य म्हणजे 'आम्ही हरलोय ....पृथ्वी जिंकलीय'....बहुतेक ते मी २ रीत असताना बघितलं होतं.... मला वाटतं राजा-राणी बढे मंडळींचं असावं ...पुढे मी ६ वीत असताना त्यांच बालनाट्य शिबीर केलं होतं आणि गिरगावातल्या साहित्य संघामध्ये आमच्या नाटकाचा प्रयोग आणि प्रशस्तिपत्र वितरण सोहोळा होता... (मी खूपचं भरकटले) ....

तर सांगायचं म्हणजे हे बालनाट्य पंचमहाभूतं आणि त्यांची आपापसातली चढाओढ ह्याबद्दल होतं .....सगळे जण आपल्या शक्तीनुसार आपण किती श्रेष्ठ आणि संहारक आहोत असं दाखवतात .... शेवटी ब्रह्मदेव पृथ्वीचा त्याग, सहनशीलता आणि सर्व प्राणिमात्रांना जीवन देण्याची तिची वृत्ती अधोरेखित करतात आणि मग चारही महाभूतं 'आंम्ही हरलोय ....पृथ्वी जिंकलीय' अशी घोषणा करतात आणि उपनिषदांनी दिलेली 'वसुधैव कुटुम्बकम' संकल्पनेचा उल्लेख करून नाटक संपते.

जे कालातीत सत्य आहे....'परब्रह्म' त्याच परब्रह्माने उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या जबाबदाऱ्या घेऊन ह्या विश्वाचा समतोल राखला आहे ... आणि त्यासाठी हे परब्रह्म जोडीने (परब्रह्म आणि त्याची शक्ती) अविरत कार्य करत आहे .... शिव-शक्ती, विष्णू-लक्ष्मी, ब्रह्मा-सरस्वती हे तम्-सत्व-रज गुणांचं प्रगटीकरण (manifestation) आहे. आजही मी जेव्हा उपनिषदांचा, वेद आणि योग ह्या विषयांचा अभ्यास करते तेव्हा हे त्रिमूर्ती आणि पंचमहाभूतं फक्त प्राणिमात्राच्या कल्याणासाठी निस्वार्थी झटत आहेत हे जाणवतं आणि मला लहानपणी बघितलेलं हे नाटक पुनःपुन्हा आठवतं ...

अशीच अजून एक आठवण म्हणजे गिरगावातल्या घराजवळ मला वाटतं मुंबादेवीला जाताना एक traffic circle ला Atlas आणि त्याने खांद्यावर घेतलेली पृथ्वी असा पुतळा होता... आई मग मला शेषनागाने किंवा वराहाने पृथ्वी आपल्या डोक्यावर/सोंडेवर तोलून धरली आहे त्या आणि दशावताराच्या गोष्टी सांगायची, तिला माहित असलेल्या ग्रीक पुराण कथा पण सांगायची .... पृथ्वीचं नित्यनूतन नातं विष्णूशी आहे आणि विष्णूचा प्रत्येक अवतार हा पृथ्वीची सहनशीलता जेव्हा-जेव्हा पराकोटीची अजमावली गेली किंवा तिच्या अस्तित्वाचा प्रश्न इरेला पेटला तेव्हा तेव्हा झालेला आहे. पृथ्वीच लक्ष्मी आहे म्हणजेच one of the most important resources आहे. ह्याच पृथ्वीच्या लेकीशी रामाचं नातं आहे... वारंवार ते नातं परीक्षेतून पार पडून शेवटी भूगर्भातच दडलं आहे.

कुसुमाग्रजांच्या 'पृथ्वीचे प्रेमगीत' आणि 'जमिन आणि आगगाडी' ह्या कविता, शाळेतली भूगोलाची पुस्तकं, ‘खंडाळ्याच्या घाटासाठी’, ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’ ह्या पुस्तकांमधून, National Geographic documentaries, San Andreas (all parts), Geostorm, Day After Tomorrow movies आणि तशाच कितीतरी कलाकृतींमधूनसुद्धा पृथ्वीची वेगवेगळ्या रूपातली ओळख लहानपणापासून झाली आहे. हे सगळं अनुभवत असतांना मला सुचलेल्या, ९७ आणि ९९ साली मुक्तछंदात केलेल्या कविता खाली लिहिल्या आहेत...

सातत्याने सकल प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या ह्या पंचमहाभूतांबद्दल कितीही विचार केला तरी कमीच आहे, आदर्श कशाचा असावा ह्याची इतकी उदात्त उदाहरणं आहेत ही आणि त्याबद्दल लिहायच ठरवलं ... आपण जे म्हणतो ना की एकदा विचार केला आणि तो सुविचार असेल तर तो अंमलात आणण्यासाठी सगळं ब्रह्माण्ड मदत करतं ... (आपल्याला ह्याचं bollywood version माहित आहे ... किसी चीझ को शिद्दत से चाहो तो सारी कायनात उसे तुम्हे मिलाने कि साजिश में लाग जाती है….) तसंच काहीसं माझ्याबाबतीत नेहेमी होतं ...

मी हा पृथ्वीचा लेख लिहायला घेतल्यानंतर मला भूगर्भात काय दडलं आहे त्याचा whatsapp video कोणीतरी forward करणं, AAH - Adopt A Highway साठी घराजवळच्या रस्त्याची साफसफाई करणे आणि तिथे आयोजकांनी अगदी 'Servicing Mother Earth' असा उल्लेख करणं, sustainable resources चं article वाचनात येणं, ११ आंतरराष्ट्रीय योग दिवस 'Yog for One Earth, Yog for Health' असणं आणि त्या निमित्त भूनमनासन, ताडासन आवर्जून करणं, चक्र ध्यानाची सुरवातच मूलाधार चक्रापासून म्हणजेच पृथ्वी तत्त्वापासून होणं, उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यामुळे मागच्या अंगणात मातीत काम करून भाज्या उगवण्याचा पहिलाच प्रयत्न करणं, त्याच मातीचा पाऊसानंतरचा वास अनुभवणं आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करताना mindful असून पूर्ण अनुभवणं अशा कितीतरी गोष्टी आपोआप जुळून आल्या आणि yes this is the sign असं जाणवलं...

आपण नेहेमी पृथ्वीला आईची उपमा देतो कारण आपल्या सगळ्याच बाळांच सदैव कल्याण चिंतणं, त्यासाठी कष्ट सोसणं, त्याग करणं, सृजनाची उपजत जाण असणं, संस्काररूपी वृक्षांची पाळंमुळं घट्ट असणं, आकाशात झेप घेण्याची आस असणं, मायेची सावली देणं, सतत कार्यरत असणं (परिवलन, परिभ्रमण), प्रसंगी बाबांच्या रागापासून बचाव करणं (सूर्याच्या उष्णतेच्या त्रासापासून), मामाच्या गावी जाऊन त्याचं प्रेम अनुभवणं (चांदोबाच्या गोष्टी) आणि त्यालाच प्रसंगी भाऊ म्हणून ओवाळणं, आईच्या साडीच्या वासाच महत्त्व असणं (आपल्या मातीच्या सुवासाचं), सहनशीलतेचा उद्रेक होऊन उफाळून येणं (लाव्हारस उद्रेक आणि भूकंप), प्रेमाची भरती-ओहोटी अनुभवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळं जग फिरूनही आईपाशी त्रिभुवनातली सुख आहे हे जाणवणं ('down to earth')..... हे आणि असे सगळेच आई-पृथ्वी parallels किती अलौकिक आहेत !!!

ह्या पंचमहाभूतांपासून बनलेलो आपण.... म्हणजेच आपणही ह्या आदर्शाचा एक अंश आहोत पण तरीही रोजच्याच धबडग्यात त्याचा पूर्णतः विसर पडतो मग अशा काही आठवणी जाग्या होतात आणि परत आपली नाळ जोडली जाते आपल्या मूळाशी.... परत परत तिकडे येऊ शकणं हाच एक सुखद अनुभव आहे....

एकच माउली अशी होऊन गेली ज्यांनी ह्या पंचमहाभूतांना त्यांच्या-त्यांच्यामध्ये विलीन करून संजीवन समाधी घेतली ....आणि त्यांचा योग्य तो आदर्श साऱ्या विश्वासाठी ठेवला.

२ नोव्हेंबर १९९७

पहाटेचा सुखद वारा

मोहवीत असतो धरेला

आणि चाहूल लागते बालसूर्याची

त्याच्या कोवळ्या किरणांची

दिवस जसा चढत जातो

कोवळी किरणे बनतात उग्र

भाजून टाकतात धरेला

तिला कळत नाही

हाच का तो सकाळचा सूर्य ?

संधीकाळी अचानक

चंद्र डोकावू लागतो आकाशात

त्याच हळुवार चांदणं बरसू लागतं

जणू चंद्र समजावीत असतो धरेला

भाऊ आपल्या बहिणीला

धरेलाही समजूत पटते

याच एका क्षणासाठी

दुसऱ्या दिवशी सूर्याला ती सामोरी जाते

पण एक दिवस अचानक

चंद्र कुठेतरी गुप्त होतो

धरेचं मन आक्रन्दून उठतं

पुन्हा उगवतो चंद्र आकाशात

धरा रुसून बसते

चंद्राला खूप आवडतं

बहिणीचं रुसणं

आणि मग उचंबळून येणं

साऱ्यांच्याच जीवनात असतील

का रात्री शीतल चांदण्यांच्या ?

की सगळ्याच अमावास्येच्या?

१७ मे, १९९९

तप्त तापलेल्या धरतीला

दिलासा मिळतो

पहिल्या पावसाच्या थेंबाचा

अंगांगातून फुलून येते धरती

त्याच्या स्वागतासाठी

नवं लेणं पांघुरते

हिरव्या रंगाचं

पिवळ्या सोनसळीचं

पाऊस तिचं रूप बघून

बेभान होऊन बरसतो

त्याला माहित असतं

आपलं येणं थोड्या दिसांचं

धरतीलाही तो

वेगवेगळ्या स्वरांतून

सांगत राहतो

मी पुन्हा भेटेन

पण वेगळ्या रूपात

धरतीही त्याचं ते रूप आणि हे रूप

याची सांगड घालत राहते

वाट पाहते

पुन्हा त्याच्या

बेभान होऊन येण्याची ...

३ जुलै, २०२५

© कविता सराफ