Kavita's Kaleidoscope
आई, तिच्यावरचा प्रभाव आणि मी
आई, तिच्यावरचा प्रभाव आणि मी
आठवणी
Kavita Saraf
2/22/20261 min read

आई, तिच्यावरचा प्रभाव आणि मी
मी बाकी लेखांमध्ये पण म्हटलं आहे तसं माझ्यावर आईचा खूप प्रभाव आहे ते मला आई गेल्यानंतर इतक्या प्रखरतेने जाणवावं हा मोठाच विषाद आहे. आपण मोठं होताना आपण कसे वाढत आहोत, आपल्यामध्ये काय झिरपतं आहे, आपल्यावर कोणाचा प्रभाव आहे हे कधी कळलंच नाही .....दादा मी २३ वर्षांची असताना गेले आणि आई सानाच्या जन्मानंतर १ वर्षांनी म्हणजे मी ३३ वर्षांची असताना ...१० वर्षांच्या आत मी दोघांनाही गमावलं ....आजही मी त्या धक्क्यांमधून बाहेर आले आहे असं वाटतं नाही ....आता मागे वळून बघताना विचार करते तेव्हा जाणवतं आहे की मला मी मोठी होत असतांना आई-दादांचं महत्त्वं कळलं नव्हतं पण ते नकळत माझ्यामध्ये झिरपलं होतं ..... आपल्या बरोबर आपली माणसं असतात तेव्हा ती एक दिवस आपल्याबरोबर नसतील असा विचार करून आपण जगत नाही म्हणूनच वेळीच ते महत्त्व आपल्याला लक्षातच येत नाही....
मला हे सगळे आई आणि मी लेख सुचले कारण मला आई आदर्श आहे हे हळूहळू जाणवलं आणि ती आणि दादा माझ्या फोटोग्राफिक मेमरीमध्ये चपखल बसले आहेत ....आणि जसं मी म्हटलं तसं .....आई 'असताना' मी तिच्याशी ती माझा 'आदर्श' आहे असं अजिबात वागले नव्हते ....प्रामाणिकपणे लिहिलं तर हे सगळं नंतरच सुचलेलं शहाणपण आहे....पण better late than never म्हणतात तसं मी हे सगळं लिहायला घेतलं आणि सगळ्या आठवणी जाग्या झाल्या...
माझ्यावर माझ्या आई-दादांचा प्रभाव आहे .... तसाच आईवर पण तिच्या जवळच्या लोकांचा प्रभाव होता आणि त्याचा उल्लेख ती नेहेमी करायची .... त्यातल्या ४ जणांची आठवण माझ्यासाठी अजूनही ताजी आहे ....हे लिहून त्यांना आदरांजली वाहिली आहे ...
दादा आजोबा -
आईचे वडील ती त्यांना दादा म्हणायची. म्हणूनच आम्ही तिघी पण आमच्या वडिलांना दादा म्हणायचो. आजोबा वकील होते आणि गरिबीतून स्वकष्टाने शिकले होते. त्यांचा दुसरा भाऊ म्हणजे माझे काका आजोबा, चोपड्याला शेती बघायचे आणि तिकडेच राहायचे. आजोबांचे 'स्वतःसाठी जगलास.....' मी खूप वेळा लिहिलं आहे तशीच त्यांची अजून एक theory होती ती म्हणजे 'आपण गाडी घेतली की ती बघायला चार लोक असले पाहिजेत' आणि 'आपल्या मरणानंतर चार लोक आपल्याला उचलायला आले पाहिजेत' ....इतक्या चपखल वाक्यांमधून आपल्याला 'माणसं गोळा करता' आली पाहिजेत असं त्यांचं सांगणं असायचं. त्यांनी खूप माणसं जमवली होती आणि तीच सवय माझ्या आईने पण तंतोतंत उचलली होती. आजोबांचा कष्टाळू स्वभाव आणि माणसं जोडण्याची कला ह्यामुळे त्यांच्या सासरी म्हणजे आईच्या आजोळी ते सगळ्यांचे आवडते होते. त्यांना प्रेमाने आणि आदराने आजोळी, 'बाबुराव' म्हणायचे.
आजोबा वकील होते त्यामुळे त्यांच्याकडे नेहेमीच चांगली वाक्पटूता आणि युक्तिवाद असायचा पण माझी आई त्यांच्याशीसुद्धा मुद्देसूद बोलून त्यांना विचार करायला लावायची. आजोबा तसे जुन्या विचारसरणीचे होते आणि त्यांना 'मुलाचं' प्रचंड कौतुक होतं आणि प्रसंगी त्यांनी त्यांच्या मुलींना दुय्यम वागणूक देऊन मुलाचे लाड पुरवले होते. मुली परक्यांचं धन असताना, मुलींच्या शिक्षणावर खूप पैसे खर्च करण्यापेक्षा मुलाला डॉक्टर करणं त्यांना जास्त महत्वाचं वाटलं. अर्थात आई हे त्यांच्याशी उघडपणे बोलली होती पण नंतर 'जुन्या खोडाच्या सवयीसुद्धा पक्क्या असतात'....म्हणून सोडून द्यायची.
आजोबा आपल्या मुलींची पत्र पाठवून चौकशी करायचे ....सल्ले द्यायचे....आई पण त्यांना पत्र पाठवायची ...आईचं अक्षर छान होतं त्यामुळे माझ्या बहिणींची अक्षरं पण खूप छान आहेत ....माझं अक्षर ४ थी पर्यंत चांगलं होतं ...मला आठवतं आहे की मी आजोबांना १ लीत असताना पोस्टकार्ड लिहिलं होतं ...आणि आजोबांनी ते आपल्या ऑफिस रूममध्ये त्यांच्या डेस्कवर समोरच ठेवलं होतं. ते पक्षकारांना माझ्या सगळ्यात लहान नातीने लिहिलं आहे असं सांगायचे ...दादा आजोबा मुंबईला आमच्या घरी यायचे आई-दादा आणि नातींना भेटायला....तेव्हा आम्हाला खूप मजा यायची...आमच्यासाठी आजोबा काही ना काही घेऊन दयायचे, आम्हाला फिरायला घेऊन जायचे, आई-दादा त्यांना नाटका-सिनेमाला घेऊन जायचे. आई त्यांचं पथ्य, जेवणाच्या वेळा खूप सांभाळायची कारण त्यांना गॅस ट्रबल होतं आणि खूप मोठ्याने ढेकरा यायच्या ....मोठ्याने भा....त असं ओरडल्याशिवाय त्यांना मोकळं वाटायंच नाही .....त्यामुळे आमच्या चाळीत लोकांची हसून हसून मुरकुंडी वळायची. पण आजोबा परत जाताना खूप वाईट वाटायचं. परत निघताना आजोबा आपल्या ट्रंक, सॅकसारखी वळकटी आणि हॅन्डबॅग ह्या सगळ्यांना दोरीने घट्ट बांधून घ्यायचे ....आम्हांला त्याचं खूपच हसू यायचं पण आम्ही ते कधी त्यांना दाखवायचो नाही ...आईचं आजोबांवर खूप प्रेम होतं आणि आईच्या विचारांवर आजोबांचा प्रभाव होता पण आईने त्याला आवश्यक तो फिल्टर लावला होता त्यामुळे ती मात्र मुलगा आणि मुली समानता मानायची ....आजोबा ८० वर्षांचे होईपर्यंत एकटे राहायचे पण नंतर मामाकडे राहायला गेले. आजोबा गेले तेव्हा आईला आपला आधार गेल्यासारखं झालं.
काकू आजी -
आईचं Chemistry खूप चांगलं होतं ...ती chemical engineer होऊ शकली असती ....पण तिने D.Ed. करून चोपड्याला शिक्षिकेची नोकरी करून कुटुंबाला आधार दिला. आई चोपड्याला असताना तिच्या काका-काकूंकडे राहायची, तेव्हा तिला तिच्या काकूचा सहवास लाभला. काकू खूप शिस्तीची, टापटिपीची आणि कमी resources उपलब्ध असताना कसं छान राहता येईल आणि आपल्या मुलांना कसे चांगले वाढवता येईल ह्याचा आदर्श होती. काकू आजी खूप गोरी पान, नेटनेटकं नऊवारी साडी नसणारी आणि कपाळावर लाल कोरडं कुंकू सुबक लावणारी मला आठवते आहे. आईची आई, माझी आजी (अक्का आजी) खूप श्रीमंतीत वाढली असल्याने फार शिस्तीची नव्हती, तिच्याने पसारा व्हायचा... आईला हा बदल जाणवण्यासारखा होता, त्या शिस्तीचा तिला स्वतःच्या संसारासाठी पुढे खूप उपयोग झाला. आई नेहेमी काकूंच्या शिस्तीची आठवण काढायची आणि तिच्या आईची (अक्का आजीची) सुद्धा... ह्या दोन्ही आजी खूप प्रेमळ होत्या....
एन.वाय.कुलकर्णी सर -
आईच्या चोपड्याच्या शाळेतले प्रिंसिपल होते हे बहुतेक....आई नेहेमी तिच्या सरांबद्दल बोलायची. स्वच्छ पांढरं धोतरं आणि नेहरू शर्ट आणि गांधी टोपी असा त्यांचा नेहेमीच शाळेचा पोशाख असायचा. ते बहुतेक गणित शिकवायचे. आई गणित आणि सायन्स शिकवायची. आई सरांकडून मुलांचे वर्ग कसे घ्यायचे, कोणताही विषय शिकवताना शिक्षकाने त्याची आधी तयारी कशी करायची, मुलांना विषयाची गोडी लागावी म्हणून काय पद्धतीने शिकवावं, विद्यार्थ्यांची एकाग्रता कशी वाढवावी, हे आणि बरच काही त्यांच्याकडून शिकली....त्याचा तिला खूप फायदा झाला होता. हे सर, आई आणि अजूनही शाळेतले शिक्षक राष्ट्र सेवादलात काम करणारे आणि साने गुरुजींच्या विचारसरणीने प्रेरित होते. पुढे आईचं लग्नं ठरून आई मुंबईला राहणार हे ऐकून सरांना आनंद झाला होता पण त्याचबरोबर आपल्या शाळेतल्या एका उत्तम शिक्षिकेला विद्यार्थी मुकणार हे बघून वाईटही वाटलं होतं. आईने राहुलच्या काकूला चोपड्याच्या शाळेत शिकवलं आहे...हे काही वर्षांपूर्वी मला कळलं तेव्हा मला एकदम मस्त वाटलं. पुढे एकदा आमच्याकडे मुंबईला सर आले होते आईला भेटायला....पण मला ते आईकडूनच कळलं होतं ...मी बहुतेक अगदी बाळ होते तेव्हा. आई माझा अभ्यास घायची तेव्हा सरांची आठवण सांगायची.
आईची मामी -
आईची मामी म्हणजे मंगळमूर्ती मामी ही खूप आधुनिक विचारसरणीची, तितकीच जुन्याचा योग्य मेळ घालणारी, रॅशनल आणि प्रॅक्टिकल होती. त्या घरच्या चांगल्या परिस्थितीमुळे आणि स्वतःच्या हुशारीमुळे BA झालेल्या होत्या. मला आठवतं आहे त्याप्रमाणे आई-मावशी त्यांच्या मामीबरोबर खूप मोकळ्या होत्या. आईची मामी, आई आणि मावशीपेक्षा ८-१० वर्षांनी मोठी होती त्यामुळे त्यांच्यामध्ये मामी-भाचीपेक्षा जास्त मैत्रिणीचं नातं होतं. आई-मावशीचं लग्न होण्याआधी त्या त्यांच्या आजोळी नेहेमी जायच्या माझ्या आजीबरोबर त्यामुळे मामी आणि आई-मावशींना एकमेकांबरोबर वेळ मिळायचा. आईचे मामा-मामी आणि माझी आई-मावशी सगळे जण बॅडमिंटन डबल्स खेळायचे एकत्र. मामी, आई-मावशी तबकडी असलेला ग्रामोफोन ऐकायच्या, पुस्तकं वाचायच्या आणि नागपूरला सायकल वरून एकत्र फिरायला जायच्या. धंतोलीतल्या बाजारात खरेदी करायच्या आणि एकत्र मूव्हीज बघायच्या. मामींनी नागपूरच्या बंगल्यातही काळानुसार खूप छान सुखसोयी करून घेतल्या होत्या पण ते करताना त्यांनी मूळ बंगल्याचा ढाचा बदलला नाही. मामी थोड्याशा सुहासिनी मुळगावकरांसारख्या दिसायच्या असं मला वाटतं. मला पण ही मामी आजी खूप आवडायची कारण त्या सगळयांशी हसून, प्रेमाने आणि त्या-त्या वयाची भाषा आपुलकीने बोलायच्या. आईला तिच्या मामीचं खूप कौतुक आणि आदर होता. आईचं लग्न झाल्यावर त्यांच्या भेटी कमी झाल्या पण दोघीही कधी मुंबई-नागपूरला असल्या की नेहेमी आवर्जून भेटायच्या.
ह्यातली काही जणं फक्त आईच्या विचारांमध्ये, बोलण्यात आणि तिच्या सवयींमधून मला भेटली आहेत पण काहींना मी प्रत्यक्ष भेटले आहे आणि ते आईचा आदर्श का होते हे जवळून बघितलं आहे ...
© कविता सराफ
२२ फेब्रुवारी, २०२६
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations