empty concrete road

कळणं ते वळणं आणि मग वळण

Understanding → Transformation → New Direction

चिंतन

Kavita Saraf

8/1/20261 min read

कळणं ते वळणं आणि मग वळण

एखादी गोष्ट 'कळणं' आणि ती पटल्यामुळे आणि सततच्या सवयीने अंगवळणी पडून ती 'वळणं' किंवा त्याच 'वळण' लागणं हा किती मोठा प्रवास आहे हे आपल्या कधी लक्षातच येत नाही.....

आज विचार करताना जाणवलं की हा कळण्यापासूनचा ते वळण्यापर्यंतचा प्रवास कधी छोटासा, छोटा, मोठा, मोठ्ठा, अविरत चालणारा कधीच न संपणारा, खूप त्रासदायक किंवा कधी हवाहवासा .... असू शकतो .... हे तर quantification झालं ह्या प्रवासाचं.....पण दुसरी बाजू म्हणजे qualitative aspect म्हणजे नक्की 'कसा' झाला हा प्रवास ह्याच उत्तर कधी सहज, प्रयत्नपूर्वक, थोड्या परिश्रमाने, खूप मेहेनत घेऊन किंवा मग खूप स्वतःशीच झगडल्यानंतर, हरल्यानंतर, सर्वस्व गमावल आहे असं वाटावं इतका त्रासदायक,वेदनादायी .... फार क्वचित आनंददायी .... कसाही असू शकतो .....

पण त्या-त्या प्रवासातून आपण किती अनुभवसंपन्न होतो, भल्या-बुऱ्या प्रसंगांची आठवण कायम राहते आपल्याबरोबर ......बऱ्याचदा हा प्रवास कसा झाला असेल हे आपल्याला आलेल्या अनुभवांवर, प्रसंगाच्या गांभीर्यावर अवलम्बून असते.... पण काही 'वळणं' ही मनावर ओरखडा उठल्याशिवाय लागतच नाहीत.... पण ती एकदा लागली की समाधान किंवा सुटकेचा निश्वास, किंवा हे आपल्याला आता जमतं आहे अशी जाणीव ... असा काहीसा अनुभव किंवा मग नाईलाजाने का होईना पण I have chosen to compromise with the outcome अशी अवस्था ....

काही 'वळणं' मोठ्यांनी सांगितल्यामुळे, संस्कारांमुळे किंवा general societal norms मुळे लागलेली असतात .... त्यात बराचसा शिस्तीचा भाग असतो आणि हा कळणं ते वळणं हा प्रवास तसा छोटासा किंवा छोटा असतो .... आणि mostly ही वळणं सवयीचा भाग असतात ...... पण आपण जसजसं मोठं होत जातो बऱ्या-वाईट प्रसंगांची ओळख होते तशी ह्या कळणं-वळणं-वळण प्रवासाची खरी गम्मत अनुभवता येते .... असंच काहीतरी कळलेलं नव्याने अनुभवता आलं आणि ते पुन्हा आपल्याला पटलं आहे हे जाणवलं की त्याचं वेगळंच समाधान मिळतं किंवा कळलेलं आहे पण वळलेलं नाही असं जेव्हा असतं तेव्हा आपली त्या त्या प्रसंगांमध्ये उडालेली तारांबळ आठवून पण हसू येतं .... पुनःप्रत्ययातून किंवा मग सवयीने ... नंतर कधीतरी अंगवळणीही पडतं..... हा प्रवास बऱ्यापैकी मोठा असतो पण तरीही कधीतरी संपणारा ....

काहीतरी मनोमन पटलेलंच असतं पण ते तरीही वळलेलं नसतं आणि अंगवळणी तर त्याहूनही पडलेलं नसतं..... किंवा अशा प्रसंगांना सामोरे जायची मानसिक तयारीच नसते ..... असे प्रसंग आपण शक्यतो टाळत असतो किंवा लांबणीवर टाकत असतो ....पण हे प्रसंग आपली पाठ पुरवणं काही सोडत नाहीत ..... मग आपल्या वागण्यात बदल करायचा तो नक्की कोणासाठी किंवा आपल्या समाधानासाठी करायचा आहे हे एकदा ठरलं की निदान त्या व्यक्तींसाठी किंवा त्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पाडण्यासाठी तरी प्रयत्नपूर्वक बदल केले जातात किंवा मग 'फक्त आत्मसमाधान' हे मोठं बक्षीस मिळवायचा मोह टाळता येत नसल्यामुळे बदल होतात .... असे प्रसंग लक्षात ठेवून पुढच्या वेळेला....अशा प्रसंगांना धीराने तोंड द्यायला आपण 'तयार' असलो तर आपण 'वळायच्या' मार्गाला लागलो ह्याचं समाधान असतं .... पण पुढच्या साधारण अशाच प्रसंगातही आपण गडबडलो किंवा 'पहिले पाढे पंचावन्न' झाले तर मग ....परत नव्याने शोध ..... आपल्याला नक्की कसली भीती वाटते आहे .... ह्याचा विचार ... साद-प्रतिसादाची उजळणी ..... घडलेल्या प्रसंगाची आणि आपल्या वागण्याची इतकी धास्ती घेतलेली असते की आपल्याला माहित असतं की आपण परत अस्वस्थ होणार आहोत.... मग शांतपणे rational जागं ठेवून ....आपल्या स्वभावाला अनुसरून नसेल तरीही योग्य मार्ग निवडतो आणि पुढे जातो ...... पन्नास वेळेला स्वतःला किंवा जवळच्या लोकांना सांगून आपणच आपलं पटवून घेतो की आपण जे केलं ते योग्यचं आहे....समाधान, शांतता अनुभवतो.......मुख्य म्हणजे एक-एक प्रसंगातून अनुभवसंपन्न होतो ..... आणि हा प्रवास चालूच राहतो ...... अविरत .....

माझ्या मते कळणं हे conceptual/logical पातळीवर पटलेलं प्रमाण आहे (know) ....पण वळणं हे स्वानुभवातून आणि हा प्रवास पार केल्यानंतर आलेलं शहाणपण आणि केलेली कृती ह्या दोन्हीतून आलेलं आहे behavioral आहे (use) आणि त्याचं वळण होत आहे की नाही हे आपल्या समजूतदारपणावर आणि शिस्तीवर अवलंबून आहे (expand) ....

हा सगळाच कळणं-वळणं-वळण खेळ कशासाठी मांडायचा ? तर त्याचं उत्तर वागण्यात शिस्त यावी ....क्रिया-प्रतिक्रिया सहज घडण्यासाठी, वेगवेगळे अनुभव पचवण्यासाठी केलेली तयारी.... आणि त्यातून अनुभवसिद्ध होण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधान किंवा मानसिक शांतता अनुभवता यावी म्हणून..... असं मला वाटतं....म्हणुनच तर आपल्या पुराणामध्येही आकलनशक्तीला आणि शांतिपाठांना अनन्यसाधारण महत्त्व असेल का ?

© कविता सराफ

नोव्हेंबर २०२१