Children celebrate holi festival with colored powder

केम-ऊत्तरेश्वर-छबिना

Yatra of Uttareshwar @ Kem (Solapur)

आठवणी

7/30/20261 min read

केम-ऊत्तरेश्वर-छबिना

आमचं मूळ गावं सोलापूर जिल्ह्यातलं केम म्हणजे आम्ही केमला राहणारे कुलकर्णी आहोत. माझे काही काका केमकर असंही आडनाव लावतात. तर दादांचे वडील केम सोडून मुंबईला आले आणि ते मुंबईच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रिटायर्ड झाले. त्यांच्याबरोबर ते आपल्या सगळ्या मुलांना आणि कुटुंबाला घेऊन फणसवाडीतल्या जगन्नाथ चाळीत स्थायिक झाले. आजोबांचे चुलत भाऊ बद्रिकाश्रमात आणि पुण्यालाही स्थायिक झाले होते. माझ्या चुलत काकांचं केमकर प्रकाशन होतं आणि त्यामध्ये छापलेली पुस्तकं मला नेहेमी भेट द्यायचे. दादा चाळीतच राहिले आणि त्यांचे बाकी ३ भाऊ ठाणे, बोरीवली आणि केमला राहायचे. मी माझ्या दादांकडून असलेल्या आजी-आजोबांना बघितलं नाही ....पण त्यांची आठवण मात्र आम्ही दरवर्षी शिवरात्रीच्या निमित्ताने काढायचो.

केम हे छोटसं टुमदार गाव आहे, तिथे घरगुती आणि मशिनरी असलेले कुंकवाचे कारखाने आहेत....हळकुंड आणि चिंचोक्यांपासून कुंकू तयार करतात - धुवून वाळवलेले हळकुंडं कांडण्यापासून, त्यात चिंचोक्यांचा नैसर्गिक रंग मिक्स करून, पावडर करून, चाळून, त्यात थोडं सुगंधी अत्तर मिसळून सुवासिक कुंकू तयार होईपर्यंत सगळी प्रोसेस इथे कारागीर आनंदाने दाखवतात ....प्रत्येक बॅचमधलं कुंकू ऊत्तरेश्वर, महालक्ष्मी, तुळजा भवानी,माहूर देवी, सप्तशृंगी अशा देवळांमध्ये मध्ये पाठवलं जातं. आणि मगच ते विकायला बाजारात येतं. केमचं ग्रामदैवत हे ऊत्तरेश्वर आहे. गावच्या वेशीतच असलेल्या प्रशस्त देवळात काळ्या दगडाची भलीमोठी पिंडी आहे. सणावाराला-श्रावण सोमवार-शिवरात्र वगैरे दिवसांत शंकराची पिंडी चांदीचा उत्तरेश्वराचा मुखवटा समोर ठेवून फुलं-फळं-नारळ अशी काहींना काहीतरी आरास करून सजवली जाते .....ह्या मुखवट्याला जटाजूट आणि दाढी -मिशी आहे आणि खूप सुंदर डोळे आहेत. वर्षानुवर्ष हा मुखवटा तसाच तेजस्वी दिसतो. ऊत्तरेश्वराच्या सान्निध्यामुळे दादा शिवभक्त होते....दरवर्षी शिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो, त्यात शिवलीलामृत पठण, भजन, कीर्तन,जत्रा आणि समाजोपयोगी कार्यक्रम असतात. उत्सवाची सांगता शिवरात्रीच्या दिवशी छबिना म्हणजे मिरवणूक निघून गावातून मिरवून परत देवळात परत येते. हा उत्सव खूप पाहण्यासारखा असतो असं दादा नेहेमी सांगायचे ...

मला आठवतं आहे त्याप्रमाणे आम्ही एकदा माझ्या आत्याने भागवत सप्ताहाचं ह्या देवळात आयोजन केलं होतं तेव्हा केमला उत्तरेश्वराच्या देवळात गेलो होतो ....मी तेव्हा बहुतेक दुसरीत होते ...तिथे सप्ताहाची सांगता होताना आत्याने महापूजा, होमहवन, ब्राह्मण भोजन, गावजेवण असं सगळं खूप रितसर केलं होतं ...तेव्हाही म्हणजे साधारण ४५ वर्षांपूर्वीही त्या आरतीसाठी ऑटोमॅटिक झान्झा, नगारे, टोल वाजवणारं मशीन होतं. पण आम्हाला खरा नगारा वाजवायला खूप मजा यायची. आमचं घर ते देऊळ अंतर खूप कमी होतं त्यामुळे आम्ही भागवत सप्ताहामध्ये खूप वेळ देवळातच असायचो ....

त्यानंतर मी कॉलेजमध्ये असतांना एकदा छबिना अनुभवायला गेलो होतो ...हा पूर्ण सोहोळा खूपच नेत्रदीपक असतो...

रात्री ऊत्तरेश्वर महादेव आणि पार्वती ह्यांची घोड्यावर बसून वरात काढतात ....ही महादेव आणि पार्वतीची विवाहानंतरची वरात असते...पूर्ण गावभर सगळे रस्ते रांगोळ्यांनी सजवलेले असतात, सगळ्या घरांना आणि रस्त्यांवर तोरणं-पताका लावलेल्या असतात , बँडबरोबर वाजत-गाजत ही वरात मानाच्या ५ घरी क्रमाक्रमाने थांबते ...प्रत्येक घरच्या सुवासिनी महादेव-पार्वतीची भाकर तुकड्यानी दृष्ट काढतात आणि ओवाळून पुढच्या घरी पाठवणी करतात ....आमचं घर पण ह्या घरांपैकी एक होतं ....पूर्ण रस्त्यांत शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी असते .....इतके सुंदर शोभेचे फटाके मी पहिल्यांदा केमलाच पाहिले .....मला आवाजाच्या फटाक्यांची खूप भीती होती लहानपणी....अजूनही आहे. त्यामूळे मला शोभेच्या फटाक्यांचं अप्रूप आहे....हे शोभेचे फटाके लावण्याचं काम पण केमच्या कित्येक घरांतून घेतलं जातं ....गांवातले कितीतरी लोक आपलं काहीही चांगलं होण्यासाठी ऊत्तरेश्वराला नवस करून तो नवस फटाके प्रायोजित करून फेडतात. रस्त्यांत मिठाई, बर्फी, पेढे, साखरफुटाणे असा प्रसाद वाटतं, नाचत-वाजत-गाजत, गुलाल उधळत, फटाक्यांच्या आतषबाजीत संथ गतीने वरात मार्गस्थ होते ... वरातीतले महादेव-पार्वती दृष्ट लागण्यासारखे सुंदर दिसतात ....देवळातून सुरु झालेल्या वरातीला देवळांत महादेव-पार्वती येईपर्यंत साधारण ४-५ तास लागतात ...पण डोळ्यांचं पारणं फेडावं इतका दिमाखदार सोहोळा असतो हा...परतलेल्या वरातीची परत एकदा दृष्ट काढून गावातले लोक परत घरी येईपर्यंत दुसऱ्या दिवशीची पहाट झालेली असते ....

आमचं कुलदैवत नृसिंह आहे ..त्यामुळे केमहून परत येताना नीरा-नरसिंगपूरच्या नृसिह-लक्ष्मी देवळात अभिषेक करून आणि ढवंळसंच्या देवीचं दर्शन घेऊन मग आम्ही मुंबईला परतायचो....

लहानपणापासून हे ग्रामदैवत, कुलदैवत आणि देवी आम्हां सगळ्याचं भलं व्हावं म्हणून जागृत आहे असा आमचा विश्वास आहे....

© कविता सराफ
११ जून २०२६