photo of library with turned on lights

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि आठवणीतली पुस्तके

Mumbai Marathi Grantha sangrahalaya.

आठवणी

7/30/20261 min read

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि आठवणीतली पुस्तके

गिरगावातला साहित्य संघ हा जसा सांस्कृतिक मापदंड आहे किंवा होता तसाच अजून एक शैक्षणिक, कलात्मक आणि वैचारिक मापदंड म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय. लहानपणी वाचनाची सवय लागण्यासाठी आधी घराजवळ एक लायब्ररी होती तिथे आम्ही ४-५ जण एकमेकांसोबत जात असू. तेव्हा आम्ही साधारण सगळेच चौथी ते सातवी वयोगटातले असू. वाचनाची सवय रुळल्यानंतर मग पुढे ८वी मध्ये आम्ही मैत्रिणींनी मोठी लायब्ररी म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्वतःची मेम्बरशिप घेतली....घरी फॅमिली मेम्बरशिप आधीच घेतलेली असायची.

लहानपणी आधी गोड गोष्टीं, चांदोबा, ठकठक, विक्रम आणि वेताळ, श्यामची आई, फास्टर फेणे पासून सुरु झालेला वाचनाचा प्रवास मग लक्ष्मीबाई टिळक, कुसुम अभ्यंकर, इंद्रायणी सावकार, मंगला गोडबोले, शोभा राऊत, मालती दांडेकर, सुरेश वैद्य, बाबा कदम, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरीं, पु.ल.देशपांडे, व.पु काळे, दिलीप प्रभावळकर, गौरी देशपांडे, शिवाजी सावंत, वि.स. खांडेकर, जी.ए. कुलकर्णी, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, रणजित देसाई, गो.नी. दांडेकर, श्री ना पेंडसे, वि.वा.शिरवाडकर, शंकर पाटील, आनंद यादव, द.मा.मिरासदार, भालचंद्र नेमाडे, चंद्रकांत खोत, आनंद नाडकर्णी, मारुती चितमपल्ली, अनिल अवचट, अच्युत गोडबोले, सुभाष भेंडे, डॉ. भा.नी. पुरंदरे, प्रदीप दळवी, विजया मेहता, गिरीश कुबेर, सुधा मूर्ती, सत्चिदानंद शेवडे आणि कितीतरी इथे उल्लेख न केलेल्या लेखकांपर्यंत येऊन पोहोचला.

ह्या transition मध्ये आधी हे सगळे लेखक कळण्याआधी बराच वेळ mills n boons छाप प्रेमाकुळलेल्या कादंबऱ्या वाचण्यात गेला...पण घरून हेच वाचू नको तेच वाच अशी सक्ती कधीच केली गेली नाही....कारण आई-दादांना खात्री होती की पसारा बाजूला सारून काय वाचायचं ते मला आपलं आपण कळेल. मला आपण काय वाचायला हवं हे कळण्यासाठीचा प्रवास खूप सोपा होत गेला कारण आजूबाजूला आपण काय वाचलं आणि काय आवडलं त्यावर चर्चा करण्यासाठी खूप पोषक वातावरण होतं. आम्ही मैत्रिणी चौपाटीला फिरायला जाताना आधी वाचून झाल्येल्या पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी मु.म.ग्रं. मध्ये भेटून मग पुढे फिरायला जायचो आणि ह्या सगळ्या पुस्तकांवर खूप चर्चा करायचो. पुढे काय वाचणार ते एकमेकांना सांगायचो. रविवारी लोकसत्तामध्ये येणारी पुस्तक-परीक्षण वाचून ते पुस्तक आधी कोण मिळवत अशी पैज असायची.

माझ्या ७ वीनंतर आमचं उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गोंदिया-नागपूर जाणं कमी झालं तेंव्हा मी लायब्ररीत जाऊन वाचत बसायचे तेव्हाची एक गम्मत मला आठवते आहे ....एक आजोबा कुठलं तरी मॅगझीन तिथून घेऊन वाचत बसले होते आणि मी त्यांच्या समोरच्या टेबलवर बसून काहीतरी वाचत होते. मला अचानक काहीतरी हळूच टरकावून फाडल्याचा आवाज आला म्हणून मी चमकून वर बघितलं तर ते आजोबा लगबगीने शांत बसले आणि त्यांनी ते पान फाडण्याचं थांबवलं...मला आधी खूप हसू यायला लागलं पण मी ते कसबसं आवरलं आणि परत वाचनावर लक्ष केंद्रित केलं...नंतर माझं लक्ष नाही असं बघून परत हात वरच्या पानांमध्ये लपवून ते आजोबा आतलं पान फाडायला लागले ...आता मला स्वस्थ बसवत नव्हतं पण मी खूप लहान असल्याने त्यांना direct सांगण्यापेक्षा, लायब्ररी स्टाफला सांगितलं की ते आजोबा मॅगझीन मधली पान फाडून आपल्या पिशवीत जमा करत आहेत....नंतर मला कळलं की ते आजोबा कुठल्या तरी केसचा तपास करत होते आणि पुरावा जमवत होते...मला एकदम CID मध्ये छोटा रोल केल्याचा फील आला होता आणि थोर वाटलं की आपली लायब्ररी गुन्हे पकडायला पण मदत करते 😊

मला जे अनेक जॉब्स आधी करावेसे वाटायचे त्यातला librariyan हा एक जॉब होता, कारण मस्त नेहेमी पुस्तकांच्या सान्निध्यात आणि नवनवीन पुस्तकं सगळ्यात आधी वाचण्याचं भाग्य .... असो. ही लायब्ररी आमच्यासाठी शाळेनंतर परत एकदा भेटण्याचं ठिकाण, तिथेच बसून काही वाचन करण्याची जागा, अभ्यासाची जागा (कारण गिरगावात घरं बहुधा चाळीत असल्यामुळे वेगळी अभ्यासाची खोली स्वतःसाठी असणं शक्य नव्हतं), कलासक्त कार्यक्रमांची माहिती आणि passes मिळण्याची जागा, दिवाळीमध्ये अभयंगस्नानानंतर नंबर लावून चांगले दिवाळी अंक मिळवण्याचं ठिकाण असं बरच काही होतं. कॉलेजमध्ये असताना व्यावसायिक नाटकाच्या रंगीत तालिमी साहित्य संघात व्हायच्या त्याचे डिटेल्स लायब्ररीतून कळायचे. असा मी-असा मी, व्यक्ती आणि वल्ली अशा नाटकांच्या रंगीत तालिमी आम्ही तिथून बघितल्या आहेत. लायब्ररीमध्ये वर्षाला एक असा नारळी पौर्णिमेला वर्धापन दिनाचा कार्यक्रम व्हायचा तिथे आम्ही मंगला खाडिलकर, भाऊ मराठे अशा चांगल्या सूत्रसंचालकांचे गाण्यांचे कार्यक्रम, संजय उपाध्ये ह्यांचे गप्पाष्टक, शरद उपाध्येंच राशीचक्र, प्रमोद नवलकरांची भ्रमंती असे आणि कितीतरी कर्यक्रम बघितले होते.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय हे आमच्या जडण-घडणीच्या काळातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण होतं आणि म्हणूनच ते मला खूप प्रिय होतं. कॉलेज आणि पोस्टग्रॅजुएशन पर्यंत ह्या लायब्ररीमध्ये आठवड्यात एकदा तरी जाणं व्हायचं, लग्नानंतर अगदीच ६ महिन्यांनी जाणं व्हायचं आणि नंतर ते बंदच झालं. पण तरीही वाचनाची आवड तशीच राहिली कारण ठाण्याला पण फिरती लायब्ररी होती, माझ्या सासूबाई दर वाढदिवसाला मला पुस्तक द्यायच्या त्यामुळे वाचन सुरु राहिलं. पुढे शिकागो मध्ये मी जमतील तेवढी पुस्तकं भारतातून आणली. आता नेपरव्हिलला खूप छान public library आहे आणि तिथे मराठी पुस्तकं मिळतात हे बघून मला कोण आनंद झाला होता...आताही मी जमेल तसं वाचन करते...सानाला पण वाचनाची खूप आवड आहे ते बघून खूप आनंद होतो. तिने पण स्वतःची लायब्ररी घरीच maintain केली आहे ... शेवटी वाचाल तरच वाचाल हेच आजच्या AI च्या जमान्यातही खरं आहे ...

ज्या पुस्तकांचा माझ्यावर अजूनही प्रभाव आहे त्या पुस्तकांची नावं आठवून लिहिण्याचा प्रयत्न -

कथासंग्रह -कादंबऱ्या, वास्तवदर्शी

दीपज्योती, अश्विनीस्पर्श, नुपूर निनादले पायी, कठपुतळी, तपश्चर्या, अपराजिता, शलाका, रेशीमगाठी, अशा वेळी, दुनियादारी, जाता-येता, खेकडा, निर्मनुष्य, व्यक्ती आणि वल्ली, असा मी असा मी, बटाट्याची चाळ, हसवणूक, गोफ, विंचुर्णीचे धडे, निरगाठी आणि चंद्रिके ग सारीक ग, दुस्तर हा घाट, तेरुओ आणि काही दूरपर्यंत, तीन तरुण दोन तरुणी एक बंड, एम टी आयवा मारू, trimakasi madam, अमृतवेल, क्रौंचवध, गंधाली, बारी, रुपमहाल, पैस, बनगरवाडी, माणदेशी माणसं, आम्ही भगिरथाचे पुत्र, कुणा एकाची भ्रमणगाथा, पडघवली, माचीवरील बुधा, शोधयात्रा, बलुतं, पाटलांची चंची, निर्मला, अनुदिनी, एका खेळियाने, मिरासदारी, वपूर्झा, पार्टनर, चकवा चांदण, रारंगढांग, झाडाझडती, मृण्मयी, झोंबी, कोसला, उपरा, उचल्या, झुळूक, खंडाळ्याच्या घाटासाठी, स्वभाव-विभाव, द्राक्ष-रुद्राक्ष, कागदी बाण, संभवामि युगे युगे, मी आहे, पसायदान, तेल नावाचा इतिहास, अधर्मयुद्ध, वाईज-अदरवाईझ

अनुवादित पुस्तकं -
तो तो चान, कोमा, सेकंड लेडी, पॅपिलॉन, Bermuda Triangle, चारचौघी (little women), क्लिओपात्रा, चिपर बाय डझन, एक होता कार्व्हर, एका कोळियाने (the Oldman and the sea), for-here or to-go? Not without my daughter, Rich Dad-Poor Dad, Men are from mars women are from venus, चार वर्षं बेटावर एकटा, Yes I am Guilty….

ऐतिहासिक -
मेघदूत, महाभारत, रामायण, युगान्त, ध्यासपर्व, पर्व , उत्तरकांड, स्वामी, राधेय, कौंतेय, मृत्युंजय, श्रीमानयोगी, छावा, पावनखिंड, पानिपत, रणांगण, ययाति, देवयानी, युगंधर, राऊ, उर्मिला, राधा, जानकी, बाजी, रत्नप्रतिमा, आम्रपाली, रक्तरेखा….

व्यक्तिचित्र -
राजा रविवर्मा, स्मृतीचित्रे, आनंदी-गोपाळ, कऱ्हेचे पाणी, मी कसा झालो, हसरे दुःख, दास डोंगरी राहतो, दोन डोळे शेजारी, मोगरा फुलला, भेटी लागे जीवा , रामनगरी, एकटा जीव, नाथ हा माझा, सांगत्ये ऐका, टाटायन , मुसाफिर, अग्निपंख, timepass, आहे मनोहर तरी, आमचा बाप आणि आम्ही, स्वप्नपन्ख, इडली, आर्किड आणि मी, मन में है विश्वास, झिम्मा….

© कविता सराफ
२९ जुलै २०२६