a body of water with trees in the background

टॉर्च लेक .....एक थरारक अनुभव !!!

Torch lake experience

आठवणी

Kavita Saraf

7/30/20261 min read

टॉर्च लेक .....एक थरारक अनुभव !!!

साधारण महिनाभरापूर्वी, जुलै २०२४ मध्ये रवी आणि प्रेषिता टॉर्च लेकची pontoon ride करून आले आणि तिथून येतानाच ऑगस्ट मध्ये परत एकदा सगळ्यांनी मिळून टॉर्च लेकला जाऊया असं ठरवूनच आले .....खर तर आम्ही माझ्या बहिणी इकडे येऊन गेल्यामुळे एप्रिल-मे-जून मध्ये त्यांच्या बरोबर खुप ठिकाणं फिरलो होतो अगदी Mackinac Island ला bus करून जाऊन आलो होतो आणि येताना torch lake वर फोटोही काढले होते ....त्यामुळे मला मनातून परत ऑगस्ट मध्ये परत बाहेर फिरायला जायची ईच्छा नव्हती ...पण राहुल आणि साना-स्वराला शाळा सुरु होण्याआधी एक ट्रिप करून येऊ असं वाटलं त्यामुळे आम्ही टॉर्च लेकला जाऊ असं ठरवलं. आमचे शेजारी नाईक आणि त्यांची मुलगी-जावई गोडसे आणि नातेवाईक ह्यांनी सुद्धा टॉर्च लेक ट्रिप ऑगस्ट मध्ये प्लान केली होती म्हणून आम्ही एकमेकांबरोबर जाता यावं म्हणून १-२ दिवस adjust करून १८ ऑगस्टला निघायचं ठरवलं. १९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे तर आपण लेकला अर्पण करण्यासाठी नारळ घेऊन जाऊ असं मजेत म्हटलं...
आणि १९ ऑगस्ट चा दिवस उजाडला .... श्रावणी सोमवार असल्यामुळे काहीच न खाता निघालो होतो. Cars, rental company आवारात park करून आम्ही swim suits आणि cover-up अशा वेषात सगळे जण pontoon चालवत मजा करत जाणार म्हणून खूप आनंदात होतो. प्रेषिताच्या आधीच्या अनुभवामुळे आम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी बसणारी life-jackets try करून pontoon मध्ये ठेवली ...आणि मग रवी आणि राहुल navigation आणि map instructions ऐकण्यासाठी pontoon rental च्या लोकांशी बोलायला गेले तोपर्यंत आम्ही तिघी जणी आणि प्रेषिता फोटो काढत मजा करत होतो... पोळ-सराफ pontoon चं नाव Avalon होतं, आम्ही ७ जण आणि आमचे २ pet dogs, Leo आणि Bruno असे ९ जण एका pontoon वर होतो. नाईक-गोडसे pontoon चं नाव Tahoe होतं, ते १२ जण, २ पेट dogs Fluffy आणि Milo असे १४ जण त्यांच्या pontoon वर होते. Basic instructions ऐकून आम्ही सगळे मजेत-गाणी ऐकत, नाचत, एकमेकांचे फोटो काढत आनंदात हेलकावत टॉर्च लेक मध्ये मस्त विहार करत निघालो ... पौर्णिमा असल्यामुळे लाटा जरा जोरात होत्या पण आनंदाच्या भरात आम्हाला त्याचं काहीच वाटलं नाही ....एक-दोनदा मोठ्या लाटांमुळे समोरून पाणी pontoon वर येऊन मागच्या बाजूने निघून गेलं ....पण त्याचीही आम्हाला सुरवातीला मजाच वाटली. आजूबाजूला मस्त उंच हिरवीगार झाडं , निळशार पाणी, छान ऊन, सगळे जण एकमेकांबरोबर, लाटांची गाज... सगळं वातावरण एकदम perfect त्यामुळे खूप छान उत्साही-प्रफुल्लित वाटत होतं. राहुल आणि मी पण थोडा वेळ pontoon चालवून बघितली, पण steering wheel खूप sensitive होतं त्यामुळे रवीच्या आधीच्या अनुभवामुळे त्यानीच सुकाणू हातात ठेवलं आणि आम्ही sand-bar च्या दिशेने निघालो ...

Sand-bar हा परीसर मुलांना pontoon मधून उतरून पोहण्यासाठी आणि पाण्यात मस्ती करण्यासाठी आहे आणि तिथे फार खोल पाणी नाही. पाण्याचा रंगही फिकट निळा-हिरवा. आम्ही sand-bar ला पोहोचेपर्यंत साधारण ११-११:३० झाले होते. साना, स्वरा आणि वीरू तिघेही पाण्यात उतरले......आम्ही मोठे चौघे जण pontoon नांगर (anchor) टाकून park करण्याचा प्रयत्न करत होतो पण लाटांचा वेग आणि खूप वारा असल्यामुळे anchor वाळूत टिकून राहत नव्हता आणि pantoon पाण्यातून सरकायला लागली ....मग रवीने ती तिथे park न करता थोडी फिरून जिथे थोडं पाणी कमी पण वाळूत anchor रुतून बसेल अशा ठिकाणी जायचा निर्णय घेतला ....ते करताना pontoon चं engine पाण्याच्या थोडं वर राहिलं पाहिजे अस बघत आम्ही तिकडे निघालो आणि मुलांना खुणेने सांगितलं की तुम्ही आहेत तिथेच थांबा ....आम्हाला बरीशी जागा मिळायला थोडा वेळ लागला पण नंतर आम्ही pontoon anchor टाकून park केली. तोपर्यंत नाईक-गोडसे pontoon येऊन त्यांनी पण पाण्यात फोटो काढले आणि ते त्यांची pontoon घेऊन निघाले ....आमच्यापासून ते थोड्या दूर अंतरावर असल्यामुळे आम्ही एकमेकांशी बोलू शकलो नाही.
मुलं पाण्यात उतरलेली आधीची जागा आणि ही जागा एकमेकांपासून बऱ्यापैकी दूर होती त्यामुळे साना, स्वरा आणि वीरूला हात धरून पाण्यातून चालत आणत होती....मुलं आल्यानंतर आम्हाला जाणवलं की आपली pontoon वाळूत रुतून बसली आहे आणि अजिबात हालत नाहीये... मग आम्ही चौघांनी ती थोडी मागून ढकलून पाहिली, दोघे पुढे आणि दोघे मागून अशी ढकलून पाहीली मग strategically पुढे चढून त्यावर एका बाजूने उड्या मारून हलते आहे का ते पाहिलं .... पण कुठल्याच प्रयत्नांना यश येत नव्हतं ....मग प्रेषिताने rental company ला फोन करून सांगितलं की आमची pontoon अडकून पडली आहे तर काही मदत मिळू शकेल का ....तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांना pontoon काढायला यायला लागलं तर त्याचे काही अमुक पैसे होतील त्यापेक्षा तुम्ही pontoon tow करणाऱ्या company ला फोन करून बघा... कदाचित कमी पैसे लागतील आणि त्यांनी त्या company चा फोन नंबर दिला....मग राहुल त्या दुसऱ्या company च्या माणसांशी जवळ जवळ ५०-६० मिनिट्स बोलत-बोलत आहे त्या परिस्थितीचे त्यांना फोटो पाठवणे, pontoon capacity, make, mfg. year, असे सगळे details देत होता ....तोपर्यंत प्रेषिता pontoon समोर एक दोरी अडकवण्यासाठी नाक आहे हे पाहून आजूबाजूच्या pontoon वाल्यांना विचारायला गेली की तुम्हीं तुमच्या pontoon च्या मदतीने आमची pontoon ओढून बाहेर काढू शकाल का पण आजूबाजूच्या pontoon सुद्धा भाड्याच्या असल्यामुळे आम्हाला तसं करता येणार नाही , आमची स्वतःची pontoon असती तर आम्ही मदत केली असती असं सांगितलं. तोपर्यंत मी आणि रवी ने परत ढकलून, धक्के मारून काय करता येईल ते बघत होतो. ढकलण्यासाठी आता आजूबाजूची पण काही माणसं मदतीला आली होती पण pontoon अगदी इंच-इंचच सरकत होती .... राहुलने त्या company शी बोलून, pontoon tow करण्यासाठी त्यांना rental company पेक्षा १० पट जास्ती पैसे लागणार होते म्हणून मग आम्ही ठरवून कळवतो असं सांगून फ़ोन ठेवला. तोपर्यंत साना अगदीच tensed होऊन रडायला लागली होती, तिला तेव्हा आम्ही समजावलं की आपण pontoon नक्की बाहेर काढू थोडा वेळ लागेल पण आपण प्रयत्न सुरु ठेवू. Bruno पाण्यात आणि pontoon वर असं करत होता आणि Leo pontoon प्रवास न आवडल्यामुळे गप्प पडून होता. मग आम्ही सगळ्यांनी मिळून परत एकदा pontoon ला ढकलणं सुरु ठेवलं....हनुमान चालीसा म्हणत प्रयत्न सुरु ठेवले ..... पण खूप जोर लावूनही काहीच उपयोग होता नव्हता. आम्ही साधारण १:३०-२ तास असेच अडकून वाट बघत होतो .... pontoon थोडी पुढे आली आणि अजून थोड्या पाण्यात गेली तर engine सुरु करण्याचा chance आहे, असं बोलत प्रयत्न करत होतो आणि गजानन महाराजांचा पण धावा करत होतो ...
मध्येच मला चैतूचा फ़ोन आला की ते पुढे गेले आहेत आणि त्यांच्या pontoon वर खूप पाणी भरत आहे तर त्यांना rental company चा नंबर हवा आहे .... प्रेषिताने लगेच तिला नंबर पाठवला आणि आम्ही परत प्रयत्न सुरु ठेवले....तेव्हा आम्हाला अचानक दोन माणसं, fluorescent रंगाचे jackets घातलेली आणि हातात मोठमोठे metal-detectors घेऊन आमच्या दिशेने येताना दिसली ...रवी आणि राहुल ने त्यांना आमची परिस्थिती सांगितली आणि ते लगेच मदतीला धावून आले. त्यात एक आजोबांसारखे दिसणारे गृहस्थ आम्हाला आम्ही दोघी - प्रेषिता आणि मी पुढे आणि ते दोघे, रवी-राहुल मागे असं करत धक्का मारायला सुरवात करा, असं सांगितलं. त्यांना आलेलं पाहून आजूबाजूच्या pontoon वरचे पण २-३ लोक धावून परत धक्के मारायला आले आणि जी pontoon आत्तापर्यंत फक्त इंच-इंच हालत होती ती काही foot हलली आणि आम्हाला हव्या त्या दिशेने पुढे गेली .... मग आनंदात रवीने pontoon वर चढून सुकाणू परत हातात घेतलं आणि त्या आजोबांसारख्या गृहस्थाने तुम्ही एक-एक जण आधी pontoon वर पटापट चढा असं सांगून स्वतः pontoon आमच्यासाठी धरून ठेवली ....मुलांना प्रथम चढायला देऊन आम्ही सगळे पटापट pontoon वर चढून त्या दोन गृहस्थांना खूप वेळा thank you म्हणत हुश्श करून pontoon मध्ये बसलो .
रवीने शिताफीने navigate करत pontoon चालवायला सुवात केली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो .... तोपर्यंत आमच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्या आजूबाजूच्या pontoons खूप भराभर दिसेनाशा झाल्या आहेत. लाटांचा वेग आणि वारा परत खूप वाढला आहे. साना तेव्हाही खूपच upset होती आणि परत रडायला लागली.... तिला वेगवान लाटांची खूप भीती वाटत होती. तेव्हा मी तिला म्हटलं की आपल्यासाठी कशी ती माणसं देवासारखी धावून आली आणि आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि आपण सगळे एकत्र आहोत तेव्हा तेच समाधान आहे ना....तर तू आता रडू नको everything will be alright ...तेव्हा साधारण दूपारचे १:४५ झाले होते...मगाशी चैतूचा फोन येऊन ती pontoon वर पाणी भरत आहे असं सांगितलं होतं त्यामुळे ते सगळे कसे आहेत हे विचारण्यासाठी मी तिला परत फोन केला तर तो तिने उचलला नाही म्हणून मग मी एका पाठोपाठ असे सगळ्यांना फोन try केले.....पण मग नंतर दिपकने callback करून सांगितले की ते कोणाच्या तरी private property च्या इथे pontoon ठेवून त्यांच्याकडे निघाले आहेत कारण त्यांच्या pontoon वर खूप पाणी भरले होते. Rental company ने exact वेळ सांगितली नाही त्यांना rescue करण्यासाठी आणि त्यांच्या pontoon वर senior citizens पण होते त्यामुळे सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यांनी pontoon सोडून दिली. नंतर चैतूचा फोन आला आणि ती म्हणाली की एका जोडप्याने त्यांना मदत केली आणि आता सगळे जण त्यांच्याकडे आहेत आणि त्या बाई त्यांना car पर्यंत सोडतील. पण तेव्हा फोन network ची गडबड आणि फोन ओले झाल्यामुळे ऐकण्यासाठी खूप disturbance येत होता. सगळे सुखरूप आहेत हे ऐकून चांगलं वाटलं पण दोघांच्याही आवाजात प्रचंड तणाव जाणवला त्यामुळे मग फक्त whatsapp वरून message करून विचारलं की काही अजून मदत हवी आहे का पण आम्ही स्वतः पण pontoon वर असल्यामुळे आणि rental company चा फोनवरून अनुभव घेतल्यामुळे आपण फारशी काहीच मदत करू शकत नाही हे लक्षात आलं.

आम्ही परत येत असताना एका ठिकाणी लाटा थोड्या कमी झाल्या असं वाटलं त्यामुळे थोडं थांबून, प्रेषिता Bruno ची leash स्वतःला बांधून पाण्यात उतरली तिथे बहुतेक पाणी २०० foot खोल होतं ...प्रेषिता खूप धाडसी आहे आणि त्याचा अनुभव आम्ही खूप वेळा घेतला आहे त्यामुळे ती खाली उतरली हे पाहून काही फार आश्चर्य वाटलं नाही. पण लगेच परत वातावरण बदललं आणि उसळणाऱ्या लाटा सुरु झाल्या. त्यामुळे आम्हाला तिथे जास्त थांबता आलं नाही आणि आम्ही पुढे निघालो पण वारा आणि लाटा खूपच वाढल्या होत्या आणि आता उसळून ४-५ फूट उंचीच्या लाटा येत होत्या. तेव्हा आम्ही सगळ्यांनी life-jackets घातले....खरंतर खूप आधी घालायला हवे होते कारण torch lake साधारण ३३०-३५० foot खोल आहे. आणि देव न करो काही झालं असतं तर आम्हाला एवढ्या उंच लाटा आणि वाऱ्यामध्ये पोहता नक्कीच आलं नसतं. त्या परिस्थितीत pontoon steer करणं इतकं अवघड होत होतं पण तरी रवीने जिद्दीने अगदी हळूहळू चालवत परत येणं सुरु ठेवल होतं .... रवी आणि प्रेषिता ज्या धैर्याने आल्या त्या प्रसंगाला तोंड देत होती त्याला तोड नाही. सानाला sharp ६th sense असल्यामुळे आणि तिने north sea चे बरेच भयानक videos पाहिल्यामुळे तिला आता आपण pontoon च्या बाहेर फेकले जाणार या भीतीने खूप रडू कोसळत होतं. तेव्हाही मी तिला म्हटलं की रडू नको आपल्या पाठीशी महाराज आणि मारुतीराय दोन्ही आहेत, आपण प्रयत्न करतो आहे. रवी पण सगळ्यांना आश्वस्त करत होता की मी सगळ्यांना ह्यातून सहीसलामत बाहेर काढीन ..... तेवढ्या तणावपूर्ण situation, मध्ये पण आम्ही रवीला 'तू तो हमारा Tom Cruise है, तूही ये कर पायेगा... ' असं म्हणतं encourage करत होतो आणि त्याला पण त्याचं हसू येत होतं......लाटांचा आणि वाऱ्याचा खेळ सुरूच होता आणि क्षणोक्षणी pontoon हव्या त्या दिशेला नेणं दुरापास्त होत होतं .....आता आम्हाला पण कच्चे बांधलेले pontoon park करण्यासाठीचे platforms दिसले जे private होते .... एका platform च्या इथे आम्ही pontoon park करण्याचा प्रयत्न केला पण प्रचंड उसळत्या लाटांमुळे ते शक्य झालं नाही आणि pontoon platform ला आपटून नुकसान होण्याची शक्यता जास्त होती ...साना रडत म्हणत होती की तिला इथे उतरायचं आहे कारण बाजूला जमीनही दिसते आहे आणि हा pontoon वरून उतरण्याचा chance तिला दवडायचा नव्हता .....मग मी तिला खूप कडक शब्दांत समजावलं की आता इथे pontoon park होत नाहीये आणि तिला उतरायचं असेल तर एकटीला उतरता येणार नाही आणि मी किंवा राहुल, रवी आणि प्रेषिताला एकट सोडून उतरणार नाही. तेव्हा तिने मग हट्ट केला नाही आणि आम्ही पुढे गेलो. दुसऱ्या एका तशाच private platform च्या इथे परत एकदा pontoon park करण्याचं try केलं तेव्हा तिथले लोक त्यांच्या backyard मधून म्हणाले की हे platforms कच्चे बांधलेले आहेत आणि ते platforms वाहून जाण्याची शक्यता आहे आणि ते safe नाहीये .... तुम्ही सर्व जण pontoon च्या मागे जाऊन बसा आणि थोडं नाक वर आलेली pontoon चालवा .....आम्ही त्यांचा सल्ला ऐकून लगेच मागच्या seats वर जाऊन बसलो पण तिथे फक्त आम्ही तिघी, वीरू आणि प्रेषिता एवढ्यांनाच जागा होती ....म्हणून राहुल pontoon weight balance करण्यासाठी पुढच्या seat वर Leo ला पकडून बसला. रवीच्या आधीच्या अनुभवामुळे त्याने maps वर driving directions लावून आपण बरोबर दिशेने pontoon नेत आहोत ना हे पाहण्यासाठी राहुलला सांगितलं ....फोन वर navigation लावून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि इतक्या वेगवान लाटा आमच्या pontoon वर एका मागोमाग एक धडकत होत्या .... तोपर्यंत सगळ्या bags आणि त्यातले कपडे सगळंच गच्च ओलं झालं होतं .... आम्हाला खूप थंडीही वाजत होती ...पण सुदैवाने पाऊस नव्हता...आता pontoon च्या engine चा थोडा weird आवाज कानी पडला आणि आम्हाला वाटलं की ह्यातला gas तर संपणार नाही ना .... लाटांचं थैमान चालूच होतं आणि सगळ्यांचा धीर थोडा सुटत चालला होता...तेव्हा आम्ही परत rental company ला आम्हाला rescue करण्यासाठी या असा फोन केला....त्यांनी किती वेळात येतो सांगितलं नाही पण येतो एवढं म्हणाले ... त्यानंतरही बराच वेळ आमची pontoon हेलकावे घेत रवी नेटाने हाकत होता ....लाटांमुळे सारखं पाणी अंगावर येत होतं आणि एवढ्या मोठ्या लेक मध्ये फक्त आमची एकच pontoon होती .... राहुलचा फोन पाणी जाऊन बंद पडला आणि प्रेषिता ने navigation ची जबाबदारी घेतली .... आता आम्ही एकमेकांशी बोलून ९११ ला कॉल करण्याचं ठरवलं ....कारण स्वराही रडायला लागली पण तरी धीराने माझ्या फोन वरून ९११ ला कॉल केला ....सुरवातीला मी त्यांना आम्ही कसे लेकमध्ये अडकलो आहोत आणि मदत हवी आहे त्याबद्दल माहिती दिली ... पण त्यांच्या प्रश्नांचं शेपूट मारुतीच्या शेपटीसारखं सुरूच होतं मग स्वराने ९११ शी बोलणं सुरु ठेवलं.... तेव्हा कोणीतरी आपलं निदान ऐकून तरी घेत आहे आणि मदत पाठवू असं म्हणत आहे असं वाटून सानाला बरं वाटलं आणि तिचं रडणं थांबलं .... pontoon वरून कोणीही बाहेर फेकलं गेलं नाहीए ना हे ऐकून ९११ म्हणाले कीं आम्ही marine patrol ला contact केला आहे आणि ते तुम्हाला शोधतील ... परत लाटा धडकून आम्ही seat वर बसणंही खूप मुश्किल होत होतं ... धरायला काहीच नव्हतं म्हणून आम्ही एकमेकांना धरून बसलो होतो .... वीरू शांतपणे coke पीत आई-बाबा सांगतील ते ऐकत होता... Bruno आमच्याजवळ येऊन काहीतरी आधार मागत होता पण त्याला आम्ही सारखं खाली बस असं सांगत होतो ... आम्ही एका वेळी सगळे जण मिळून गजानन महाराजांचा सिद्ध मंत्र जप करत होतो आणि आहे त्या प्रसंगाला तोंड देत होतो ..... राहुल समोरच्या seat वर Leo ला पकडून बसला होता पण एका क्षणी Leo त्याच्या life jacket मधून निघाला आणि राहुलच्या हातात फक्त handle राहिलं, राहुलला धस्स होऊन त्याने इकडेतिकडे पाहिलं तर Leo बाजूला अंगाचं मुटकुळं करून घाबरून डोळे मिटून बसला होता, त्याला परत jacket घातलं आणि पकडून ठेवलं. आता आम्हाला सकाळी जिथून निघालो होतो ते ठिकाण जवळ आलं आहे असं वाटू लागलं .... थोड्या वेळाने rental company ची speed boat जवळ येताना दिसली .... Rental boat दिसल्यावर स्वराने ९११ कॉल जो अजूनही चालूच होता त्यांना कळवलं की आमच्यापर्यंत अजून marine patrol पोहोचले नाहीत पण rental company चे लोक आले आहेत तर marine patrol ला तसं कळवा. Speed Boat आमच्या pontoon च्या जवळ येऊन फक्त आमच्या मागोमाग या एवढंच म्हणून पुढे गेली पण त्यातूनही आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि रवीने last leg steering करत pontoon, आम्ही निघालो त्या ठिकाणी येऊन park केली. ही सगळी pontoon ride आणि थरार नाट्य जवळजवळ ६-७ तासांनंतर संपलं आणि आम्हाला जाणीव झाली की आम्ही खूप casually ह्या trip ला निघालो होतो आणि basic गोष्टीही चुकू शकतात ह्याची जाण नव्हती ... Rental Company ने pontoon damage चार्जेस आमच्याकडून वसूल केले आणि आम्ही खूप वाद न घालता त्यांना ज्या गोष्टींचे पैसे देणं योग्य आहे ते एकमेकांशी बोलून दिले. खरंतर ते पैसे आम्ही आमच्या चुकांची भरपाई म्हणून दिले असंच वाटलं. कारण rental कंपनी ने नाईक-गोडसेना जशी उत्तर दिली आणि वाद घातला ते पाहून आम्हाला कळून चुकलं होतं की rental company ला फक्त त्यांच्या pontoon ची काळजी त्यात बसलेल्या माणसांच्या जीवांपेक्षा जास्त होती. दोन्ही pontoon मधले सर्वजण सुखरूप घरी आलो ह्यातच आम्हाला समाधान वाटलं.
आम्ही खूप धडे ह्या प्रसंगातून शिकलो ...मुख्य म्हणजे आई म्हणायची तसं अमावस्या आणि पौर्णिमेला पाण्यापाशी फिरकायचं नाही आणि नारळी पौर्णिमेला तर नाहीच नाही, basic safety features ची माहिती करून घेतल्याशिवाय अशा adventure ट्रिप्स ला जायचं नाही... आणि बरच काही.....
सगळ्यात महत्वाचं आम्हाला नंतर जाणवलं ते म्हणजे जेव्हा pontoon वाळूत रुतून बसली तेव्हा आम्ही ती धैर्याने बाहेर काढली आणि त्याच pontoon ने आम्हाला सुखरूप आणून सोडलं आणि एकही जण आमच्यापैकी एवढ्या वाऱ्यात आणि लाटांच्या वेगामुळे बाहेर फेकला गेला नाही आणि Torch Lake ट्रिप, Torture Trip झाली नाही.

आम्हांला सर्वांना 'आपले मरण पाहिले म्या डोळा' असा अनुभव आला होता आणि सगळे खूप सुन्न होऊन गेलो होतो. पण एकमेकांवर असलेला विश्वास आणि महाराजांवरची श्रद्धा ह्या दोनच गोष्टींमुळे आम्ही वाचलो. ह्या trip नंतर आम्ही Naperville ला घरी पाऊलं ठेवलं तेव्हा Leo ने इतके आभार मानल्यासारखं आमच्या पायांना घट्ट मिठी मारली आणि खूप उड्या मारून आनंद व्यक्त केला की आम्हाला परत एकदा जाणवलं की आम्ही खूप दिव्यातून पार पडलो आहोत.

© कविता सराफ

ऑगस्ट २६, २०२४