Kavita's Kaleidoscope
मी, आई आणि आजोळ
मी, आई आणि आजोळ
आठवणी
Kavita Saraf
7/30/20261 min read

मी, आई आणि आजोळ
मी आधीच्या एका आई आणि मी लेखात म्हंटलं आहे तसं माझ्या आईचं आजोळ म्हणजे नागपूरचे मंगळमूर्ति कुटुंब आणि माझं आजोळ म्हणजे गोंदियाला स्थायिक झालेले देशमुख. माझ्या लहानपणी आमचं दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गोंदियाला जाणं व्हायचं. पण एखादं-दोनदा नागपूरला पण गेलेलं आठवतं आहे. आणि तिथूनच शेगांव जवळ असल्यामुळे तिथेही जाणं व्हायचं. खूप उन्हाळा असला तरी घरी आधीच्या काळी वाळ्याच्या ताट्या आणि नंतर इलेक्ट्रिक कूलर्स लावून सगळ्या बिछाना असलेल्या खोल्या, दिवाणखाना आणि आजोबांची ऑफिस रूम नेहेमी खूप थंड असायची. त्यामुळे खूप त्रास कधी झाला नाही.
मी बहुतेक चौथीत असताना माझ्या मावशीचं लग्न होतं तेव्हा नागपूरला गेल्याचं आणि राहिल्याचं आठवतं आहे. माझ्या आईच्या आजोळच्यांचा नागपूरला धंतोली भागांत दुमजली बंगला होता. त्या बंगल्याला नाव होतं की नाही ते आता मला आठवत नाही. पण खूप मोठा आणि तेव्हा माझ्या लहान वयाला खूपच अवाढव्य वाटावा असा होता. बंगल्याला मागचं आणि बाजूचं अंगण-बाग, पुढचं पोर्च, फाटक, मागच्या अंगणातून वरती जायला लोखंडी जिना होता. कदाचित बंगल्याचं रक्षण करण्यासाठी किंवा मामा-आजोबांना आवडत असेल म्हणून, एक Dobermann जातीचा कुशल कुत्रा होता नागपूरच्या घरी...
मला आठवतं आहे त्याप्रमाणे, मी गुलाबाची फुलं बघायला गेले तेव्हा हा कुत्रा खूप जोराने भूंकला आणि मी घाबरून जोरात पळाले आणि माझ्या पायात गुलाबाचा काटा घुसला...मग माझी रडारड आणि सगळे लग्नाला आलेले पाहुणे माझ्या भोवती गोळा झाले आणि मला लाज वाटून अजूनच रडू यायला लागलं ...मग नंतर आई-दादा मला डॉ. पेंडसेंकडे घेऊन गेले, डॉक्टरांनी माझ्या पायाला बँडेज केलं, एक इंजेक्शन दिलं आणि आई-दादांबरोबर खूप गप्पा मारून आम्ही येताना आशीर्वाद हॉटेल मध्ये डोसा खाऊन परत आलो....इंजेक्शन घेतल्याची टोल वसूली :) मग मी ताई-माई आणि माझ्या मावस बहिणींना मीच एकटी कशी आई-दादांबरोबर जाऊन मजा केली हे सांगितलं ...तर त्यांनी मेहेंदी काढून घे आता आई आणि मीच राहिली आहे म्हणून मला चिडवलं....
मी आठवणींत रमणारी आहे त्यामुळे लिहता लिहिता असे digressions होतात...
बंगल्याच्या आतमध्येही खूप प्रशस्त खोल्या, मोठं स्वयंपाकघर, मोठं डाईनिंग टेबल असलेली डाईनिंग रूम, मोठा हॉल आणि वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा पॅसेज आणि त्याच्या शेवटी जिना, खूप मोठं-मोठी न्हाणीघरं (म्हणजे bathrooms) आणि डाईनिंग रूमच्या एका अंगाला लागून असलेली फुलं आणि फळं भाज्यांची बाग असा थाटमाट होता. आम्ही मुंबईहून रात्रीची विदर्भ एक्सप्रेस पकडून साधारण दुसऱ्या दिवशी दुपारी २-२:३० च्या दरम्यान नागपूरला पोहोचत असू. स्टेशनवर आम्हाला घ्यायला कधी मामा किंवा आजोबा स्कुटर वरून यायचे. तेव्हा नागपूर-गोंदिया भागात माणसांनी चालवलेल्या सायकल रिक्षा होत्या, त्यात सामान लोड करून, आम्ही घरी यायचो. आजी छान स्वागत करायची गारगार पन्हं किंवा सरबत देऊन आणि मग अंघोळी करून आम्ही मस्त जेवून कूलर ची हवा घेत झोपायचो ते उठेपर्यंत अंधार झालेला असायचा. मग बाहेर पडून आई तिच्या मैत्रिणीना भेटायला जायची. संध्याकाळचे जेवण स्किप करून आम्ही सगळे आधी गच्ची गार करण्यासाठी पाण्याचा सडा टाकायला जायचो. नंतर प्रत्येकाची बाज सेट करून गच्चीवर चांदणं बघत हसत-खिदळत, गप्पा करत कधीतरी झोपी जायचो.
आमची मावस भावंडं, मामे भावंडं सगळेच ठरवून नागपूर किंवा गोंदियाला जायचो.... मुंबईहून गोंदियाला जाताना आमची संध्याकाळची विदर्भ एक्सप्रेस किंवा कलकत्ता मेल गाडी असायची ....गाडीत खाण्यासाठी कांद्याचा झुणका, पोळी, लोणचं आणि दहीभात, सकाळी बडनेऱ्याला चहा घ्यायचा आणि शेगावला कचोरी खायची असा आमचा नेहेमीच शिरस्ता होता. गोंदियाचं घर सिव्हिल लाईन्स मध्ये होतं ...तिथे दर्शनी भागातून मुख्य दिवाणखान्यात किंवा आजोबांच्या ऑफिस रूम मध्ये जायला अशी दोन वेगवेगळी दारं होती. आजोबांचे पक्षकार नेहेमी आजोबांच्या खोलीच्या दारातून त्यांच्याकडे येऊन तिथूनच जायचे. सगळे नातेवाईक मुख्य दारातून यायचे. दिवाणखाना, मग दिवाणखाना आणि देवघर जोडणारं माजघर, देवघराच्या दुसऱ्या टोकाला मोठा लाकडी झोपाळा लोखंडी कड्यांनी टांगलेला असायचा ज्यावर आम्ही सगळी मावस भावंडं खूप मस्ती करायचो, देवघरातून स्वयंपाकघर आणि मागच्या अंगणात जायला दारं होती. मागच्या अंगणात पडवी होती, बऱ्याचदा आजोबा तिथे बसून दाढी करायचे आणि पाण्याचा नळ होता हात-पाय धुवायला. इथेच शांताबाई (आजीची कामवाली बाई) भांडी घासायची....ती खूप मस्त होती आम्ही भावंडं तिला खूप आवडायचो ...मी तिच्या मुलीबरोबर खेळलेलं आठवत आहे ... तिथे कपडे वाळत घालायला दोऱ्या होत्या. शांताबाईला 'ळ' म्हणता यायचा नाही मग ती "ताई कपडे 'वारले' काढून घ्या नाहीतर पावसात भिजतील" असं म्हणायची आणि आम्ही सगळी भावंडं खूप हसायचो....
मागच्या अंगणात तगरीच्या फुलांचं झाड होतं त्या झाडावर चढून फांद्या पकडून कळ्या बाजूला सारून आजोबांच्या पूजेसाठी फुलं तोडणं हे माझं काम होतं....कारण मी सगळ्या भावंडात लहान होते ...मला ते करताना इतकं privileged वाटायचं की बस ....आजोबा फुलांची भरलेली टोपली बघून प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्यायचे आणि मग जरा मस्ती केली त्यांच्याबरोबर की 'हो तिकडे भयताड कोणीकडची' असं म्हणायचे .....त्यांनी ते म्हणावं म्हणूनच मी मस्ती करायचे कारण ते लहानपणी माझ्या कानांना इतकं गोडं वाटायचं .... आजी आजारी असताना पाणी प्यायला दिलं की तुझा पहिला नंबर येईल असं म्हणायची आणि थरथरत्या हातांनी चेहऱ्यावर हात फिरवायची .... तिचा तो आशीर्वाद माझ्यासाठी खरंच फळला ... (रमले मी...)
मागच्या अंगणातून कोठीघर, विहीरीकडॆ आणि स्वयंपाकघरात जायला दारं होती. स्वयंपाकघरातून मागे पाण्याचे नळ आणि न्हाणीघर होतं आणि मागची विहीर होती. स्वयंपाकघरात आधीच्या काळी खाली चूल बांधली होती नंतर गॅस आला. फडताळात सारखे लक्ख पितळी डब्बे (शांताबाईंची कृपा) जिन्नस भरून ठवलेले असायचे. आम्हा सर्व भावंडाना त्यातल्या बोरकूटाच्या डब्ब्यात खूप इंटरेस्ट असायचा आणि आम्ही आजीच्या पाठीमागे दुपारी चोरून बोरकूट खायचो. दुपारी जेवणं झाली की आम्ही भावंडं स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या जवळ असलेल्या पेरूच्या झाडावरून पेरू काढणे, आजूबाजूच्या वाड्यातल्या मुलांशी खेळ-भांडण करणे असं करायचो. सगळ्या घरांची मागची दारं विहिरीच्या इथे उघडायची आणि मागे कपडे धुवायला प्रत्येकाचा स्वतःचा एक मोठा दगड होता. त्यावर कपडे आपटून धुवायला दुपारी बायका यायच्या. तिथेच दुपारी आम्हा सगळ्यांचा चिवचिवाट चालायचा आणि मग तिथे आजी, मावशी आणि आई पण जॉईन व्हायच्या.
आम्ही तिघी, मावस भावंडं ४ असे ७-८ जण खूप मस्ती करायचो ....कधी आम्ही दुपारी सिनेमा बघायला जायचो, कधी मामाच्या ट्रान्सिस्टर वर गाणी ऐकत झोपाळ्यावर मस्ती करायचो, कधी घरी पॉट मधलं आईस्क्रीम करण्याचा घाट घालायचो, कधी सुखरामने (आजोबांनी ह्याची जमिनीची केस पैसे ना घेता लढवून जमिन मिळवून दिली होती म्हणून तो आजोबांकडे जे काम असेल ते करायचा आणि आपल्या शेतातली लिंबं आणून द्यायचा) आणलेली घरची लिंब घेऊन लिंबू सरबतचा स्टॉल लावायचो, कधी गाडीवाल्याकडून बर्फाचे गोळे किंवा कुल्फी घेऊन ती सगळ्या घरातल्यांसाठी घेऊन २-३ राऊंड्सची मजा चाखायची, कधी बाजाराच्या दिवशी भाज्या-फळं घायला बाजारात जायचो, कधी दुपारच्या जेवणासाठी किलोवर (३०-४०) आणलेल्या गोटी आंब्यांचा रस स्टीलच्या बादल्यांमध्ये काढायचा त्यासाठी आंबे धुणे, माचवणे, रस काढणे, साल चोखून कचरा नेऊन टाकणे आणि रसात दूध मिसळणे अशी कामांची विभागणी करून सगळे एक्दम जेवायला बसायचो, कधी संध्याकाळच्या जेवणासाठी पालेभाज्या निवडून, धुवून चिरायचो आणि आजीला-आई-मावशीला रात्रीच्या स्वयंपाकात मदत करण्यासाठी लूडबूड करायचो, कधी संध्याकाळचं जेवण मागच्या अंगणात करण्यासाठी अंगण झाडणं, सडा घालणं, कंदिलांमध्ये वाती आहेत की नाही ते बघणं आणि मग सगळ्यांनी त्या मिणमिणत्या प्रकाशात हसत-खिदळत जेवणं, कधी रात्री मागच्या अंगणात झोपण्यासाठी सगळ्यांच्या बाजा लावणं त्यावर अंथरूण -पांघरूण ठेवणं, पाण्याच्या सूरया भरून त्यात वाळा टाकून ठेवणं अशी कामं करायचो, कधी शेणाने माजघर सावरून घायचो, कधी शेजारच्या जोशी काकूंकडे ४ मुली होत्या - राधा, सोना, पिलू आणि बंटी त्यांच्याबरोबर पत्ते, भेंड्या, कॅरम, लंगडी खेळायला जायचो, कधी दुपारी कालीमाता घरोघरी यायची ...काळे कपडे घालून आणि गेटअप करून भिक्षा मागायला ...मला तिची इतकी भीती वाटायची की मी त्या रात्री आईचा किंवा ताई-माईचा हात घट्ट धरून झोपायचे. कधी आम्ही शेजारच्या दातीर काकूंकडे फराळाला जायचो - त्यांच्याकडे खूप छान कढीपत्त्याचं झाडं आणि खूप फुलझाडं होती, कधी दादा आणि काका ठरवून गोंदियाला यायचे तेव्हा दादा मुंबईहून हापूस आंब्यांची पेटी आणायचे आणि काका औरंगाबादहून सोनपापडी-पापड-खारोड्या घेऊन यायचे, खारोड्या, कच्चे शेंगदाणे आणि बुक्कीने फोडलेल्या कांद्याबरोबर फस्त करण्यात आम्हाला खूप मजा यायची, कधी आम्ही चाट खायला बाहेर जायचो पण तेव्हा आजी-आई-मावशी यायच्या नाहीत कारण तिथे घरच्या बायकांनी बाहेर जाऊन ठेल्यावर खाणं रूढ झालं नव्हतं ....
गोंदियाहून निघायची वेळ जवळ आली की आजोबा मुलींसाठी लुचई तांदुळाची पोती, थोड्या २-३ दिवस टिकणाऱ्या भाज्या, लिंब मागवून घायचे, आजी-आई-मावशी चिवडा, लाडू, वड्या, विविध प्रकारची लोणची-पापड करायच्या ....मी मुंबईतल्या मैत्रिणींसाठी चिनी मातीचे टी-सेट, डिनर-सेट घेऊन यायचे ...गोंदियाला चिनी मातीच्या वस्तू खूप छान मिळायच्या ...माझ्याबरोबर आईची पण दह्याचा सट, लोणच्याच्या बरण्या अशी खूप खरेदी व्हायची ...निघताना आमच्या बॅग्स, आमची पावलं आणि मन सगळचं मणाचं ओझं वागवल्यासारखं जड झालेलं असायचं ....
मला ताई-माईंपेक्षा खूप कमी वेळा आजोळी जाता आलं कारण पुढे आजी गेली, मामा दुसऱ्या गावी शिफ्ट झाला, आजोबांनी पण हळूहळू वकिलीची प्रॅक्टिस कमी केली ....ताई-माई आणि मावस भावंडं कॉलेजमध्ये गेली...पण जे काही आजोळचे क्षण मी अनुभवले ते जसेच्या तसे माझ्या आठवणींमध्ये जागे आहेत ...तेव्हा तर माणसांनाच नाही तर वास्तूंना-गोंदिया-नागपूरच्या घरांना पण स्वतःचे चेहरे आणि व्यक्तिमत्व होती ....ती घरं पण माणसांसारखीच अपार माया करणारी वाटायची मला ...पुढे काळानुसार ही दोन्ही घरं विकली ....मी ते ऐकलं तेव्हा खूप वाईट वाटलं ....पण मी त्या घरांना, त्या मायेला आणि बालपणीचा काळ सुखाचा .... मनात साठवून ठेवलं आहे ....
©कविता सराफ
३० जुलै २०२६
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations