Kavita's Kaleidoscope
आई आणि पप्पा
Aai ani Pappa
KRUTADNYATA
Kavita Saraf
6/24/20261 min read

आई आणि पप्पा
आमचं लग्न ठरवून झालेलं आहे आणि लग्न ठरवतानाच मला अंदाज आला होता की राहुलचे आई-वडील पुढारलेल्या मतांचे आहेत. सुरवातीला राहुलबद्दल काहीच मत फारसं तयार झालं नव्हतं तेव्हा माझा विचार होता की घरातले चांगल्या विचारांचे आहेत तर मुलगाही चांगलाच असेल....पुढे लग्न झाल्यावर जे माझं आधीचं मत होतं ते अजूनच दृढ झालं की आपलं सुदैव आणि माझ्या आई-वडिलांची पुण्याई म्हणून सुशिक्षित-सुसंस्कृत घरात आपलं स्वागत झालं...
सासू-सासरे म्हणून त्यांनी अमुकच घाल, तमुक घालू नको असं कधीही म्हटलं नाही उलट तुला हवे ते आधुनिक कपडे तू घाल असं मला पहिल्यापासून स्वातंत्र्य होतं ....आणि हे स्वातंत्र्य मला सगळ्याच बाबतीत अनुभवायला मिळालं ....म्हणजे इतकं की आमचं लग्न झाल्यानंतरचा पहिला गणपती आमच्याकडे होता तेव्हा मला पहिल्यांदा USA ला यायची संधी आली, तेव्हा मला माझ्या वाढदिवसाच्या पहाटे फ्लाय करायचं होतं आणि त्याच आठवड्यात घरी गणपती होते...पण मला तू ही संधी सोडू नकोस आणि आम्ही तुझ्याशी skype वर बोलू, गणपती दाखवू असं म्हणून मला sea-off करायला राहुल आणि आई-पप्पा एअरपोर्टवर आले होते. त्यांना माझ्या धाडसाचं कौतुक वाटलं होतं असं आठवतं आहे. एकटी USA ला गेले, तिथे स्टुडिओ अपार्टमेंट मध्ये राहिले आणि ऑफिसच काम आणि तिथे per-diem चे पैसे पुरवून वापरले आणि जमेल तसं वीकेंड्सना फिरले ....ह्या सगळ्यांचा त्यांना अभिमान वाटलं होता असं मला जाणवलं होतं. मला त्या वर्षीच्या दिवाळीला पपांनी खूप मस्त साडी भेट दिली होती..... इतकं मोकळं वातावरण मला मिळालं हे माझं भाग्य आणि आई-दादांची पुण्याई ...
आमच्याकडे खूप आधुनिक वातावरण नेहेमीच होतं ...त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या anniversary ला काहीतरी special celebrations करणं, फिरायला जाणं, बाहेर जेवायला जाणं, नाटकाला जाणं, movies बघणं, हे होतच पण त्याबरोबर मला आठवतं आहे की आम्ही सगळे एकदा Horse Racing ला महालक्ष्मीला गेलो होतो, family picnic म्हणून. अभ्यास करून कोणता घोडा जिंकण्यासाठी योग्य आहे त्यावर discuss करून जेवढं झेपेल तेवढं पैसे लावणं ही सगळी धमाल अनुभवली आहे. तिथून परत येताना सगळे जिंकलेले पैश्यांचा dinner बाहेर करून आम्ही चट्टामट्टा केला होता....
मी साना आणि स्वराच्या वेळी प्रेग्नन्ट होते तेव्हा दोन्ही वेळेला माझ्या ऑफिसच्या कामांसाठी मला विमान प्रवास करावा लागला तरीही घरातून आत्ता तू जायलाच हवंस का असं कधीही विचारलं गेलं नाही .... साना होण्याच्यावेळी आम्ही आमचं घर घेतलं होतं तेव्हा आम्ही आमच्या घरात शिफ्ट व्हावं हे पण त्यांनीच सुचवलं ....मला आधी थोडं जड गेलं ते पण नंतर तो, निर्णय योग्य होता ते पटलं.
राहुलने साना २ वर्षांची असताना London ची opportunity घेतली आणि तो एकटा UK ला गेला कारण तेव्हा ही संधी किती extend होऊ शकते त्याचा अंदाज नव्हता आणि दुसरं म्हणजे मला माझा जॉब सोडून जाणं हे practical नव्हतं. तेव्हाव्ही मला कोणीच असं म्हटलं नाही की तू राहुलबरोबर जायला हवं होतंस ...मी आणि साना London ला फिरायला आणि राहुलला भेटायला जाणार होतो तेव्हा आई-पप्पाचाही visa आणि tickets केले होते पण त्याच वेळेस पप्पांचा स्कूटर ऍक्सिडेंट झाल्यामुळे त्यांची tickets postpone केली होती. मी आणि साना London-Scotland-Brighten पाहून आलो होतो. माझं स्वतंत्र अस्तित्व, मतं, माझं career आणि त्या अनुषंगाने आलेली Tensions, आर्थिक जबाबदाऱ्या वेळोवेळी राहुल, आई-पपांनी समजून घेतल्या आणि माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आहे.
ह्या विश्वासाच्या जोरावर मला USA ला long-term opportunity (६ महिने सुरवातीला) साठी विचारलं (तेव्हा स्वरा जेमतेम ८ महिन्यांची होती) आणि मी ऑफिसमध्ये हो मला आवडेल USA ला जाऊन काम करायला म्हणून सांगितलं होतं. तेव्हा मी घरी आधी राहुलला विचारलं होतं तेव्हा त्याचं आणि माझं एकमत झालं होतं की आलेली संधी मुली लहान आहेत म्हणून आत्ता सोडली तर परत कधी मिळेलंच ह्याची खात्री नाही आणि हा आपला निर्णय ठाम असेल तर मार्ग निघतील. त्याने मला पुढे विचारलं की तुझा काय विचार आहे? तेव्हा मी म्हटलं मी जाईन ते मुलींना बरोबर घेऊनच, मुली इथे आणि मी तिथे हे काही माझ्याने जमणार नाही. तेव्हा मी सानालाही विचारलं होतं की तिला USA ला यायला आवडेल का तेव्हा तिने मला आई you and me are friends, so wherever you will go I will come....मग आई-पपांना पण सांगितलं तेव्हा त्यांनीही प्रोत्साहन दिलं...
Long-Term यायच्या आधी मी project team la भेटायला short-term ३ आठवड्यांसाठी USA ला येऊन गेले आणि त्याच वेळेस स्वराचा पहिला वाढदिवस होता. मी तिचा पहिला वाढदिवस मिस करणार म्हणून खूप वाईट वाटत होतं पण तेव्हाही आमच्या काम करण्याऱ्या मावशी आमच्याकडे राहिल्या होत्या आणि आई-पप्पाही येऊन राहिले होते. मी विडिओ कॉल वरून स्वराला बघितलं होतं आणि त्याच दिवशी ती पहिल्यांदा चालली.....राहुलने तो विडिओ मला पाठवला होता ....
पुढे Long Term साठी visa करताना एकेक बातम्यांमुळे आधी मी आमच्या मावशींना घेऊन येणार होते ते जमणार नव्हतं तेव्हा आम्ही आई-पपांना विचारलं की तुम्ही माझ्याबरोबर याल का कारण मुलीना USA ला रुळेपर्यंत कोणीतरी बरोबर असण्याची आवश्यकता होती. अनायसे आई त्याच वर्षी की एखादं वर्ष आधी, शाळेतून रिटायर्ड झाल्या होत्या आणि पप्पांचा स्वतःचा व्यायसाय असल्यामुळे ते शक्य होणार होतं. तेव्हा त्यांनी मला मदत होणार असेल तर जरूर येऊ म्हणून सांगितलं होतं आणि गोठवून टाकणाऱ्या थंडीतही निभावून नेलं …. .हे केवळ अशक्यप्राय वाटणारं माझं USA ला काम करण्याचं स्वप्नं फक्त आई-पप्पांमुळे पूर्ण झालं....
शिकागोची थंडी मुंबईत राहण्यारांना आणि ६० वर्ष वयापेक्षा असलेल्या त्यांना किती कठीण असेल हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत .... त्यांनी केवळ माझ्यासाठी आणि त्यांच्या नातींसाठी हे सगळं सहन केलं ....पुढे मला ६ महिन्यांपेक्षा जास्त राहावं लागू शकतं असं कळलं तेव्हा राहुलने इथे येण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने आणि महाराजांच्या कृपेने त्याला शिकागोमध्ये त्याच्या कंपनीतर्फे प्रोजेक्ट मिळाला. आणि तो इथे आल्यावर आई-पप्पा मुंबईला परत गेले. हे इतके धाडसी निर्णय मी आणि राहुल घेऊ शकलो कारण आम्हाला आई-पप्पांची भक्कम साथ होती ....
जसे सगळ्या नात्यांमध्ये चढ-उतार असतात तसे माझ्या आणि आई-पप्पांमध्येही ह्या शिकागो थंडीमुळे आणि एकूणच सासू-सासरे आणि सून ह्या नात्यामुळे असेल पण तसे होते...ते जर मी मान्य केलं नाही तर खूपच खोटं लिहिल्यासारखं होईल ..... पण तरीही ते चढ-उतार काळानुरूप विरत गेले आणि मला आयुष्यभर जाणीव आहे की इतक्या आधुनिक आणि समंजस विचारांचे सासू-सासरे मला मिळाले म्हणून आणि केवळ म्हणूनच आम्ही इथे सेटल होऊ शकलो ...
त्यानंतर आम्ही घर घेतलं तेव्हा आई-पप्पा वास्तूशांत आणि आता गेल्यावर्षी राहुलचा ५० वा वाढदिवस म्हणून आवर्जून आले होते ...मला वाटतं की ते आता आता दाखवत नसले तरी त्यांना राहुलचा आणि नातींचा खूप अभिमान वाटतो .....मला माझ्या आई-दादांचा जसा अभिमान आणि कायम आठवण आहे तशीच कायम जाणीव आणि अभिमान मला आई-पप्पांचा पण आहे ....
©कविता सराफ
२४ जून २०२६
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations