clouds under clear blue sky during daytime

आकाश

The sky

चिंतन

Kavita Saraf

8/1/20261 min read

आकाश

पंचमहाभूतांमधलं पाचवं तत्त्व आकाश .... ह्या तत्वालाच व्यापकत्व, सर्वसमावेशकता, विस्तार, मोठेपण असे सगळे गुण बहाल आहेत. आपल्या शरीरातलं पाचवं चक्र energy center म्हणजे विशुद्ध तत्व .... इथेच आपला आतला आवाज ह्या आकाशाच्या-अवकाशाच्या माध्यमातून आपल्याला बाहेरच्या जगापर्यंत पोहोचवता येतो... आणि इथेच ज्या कंपनांमधून जगाची उत्पत्ती झाली तो आवाजही आपल्याला त्या शिवकृपेने ऐकू येतो. हा सगळाच प्रवास मूलाधार-गणपती, स्वाधिष्ठान-पार्वती, मणिपूर-लक्ष्मी-विष्णू, अनाहत-मारुती, विशुद्ध-शिव आणि मग सत्य-सुंदर असं आज्ञा-शिव आणि सहस्रार-शिव-ब्रह्म-परब्रह्म आणि अद्वैत अपेक्षित आहे. जसजसा पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत प्रवास होतो तसतसा स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत जाणं, मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणं, रूपाकडून अरूपाकडे, आपल्या संकल्पनांचा विस्तार, 'तुका आकाशाएवढा' होणं असं खूप काही अपेक्षित आहे. जसं पांढऱ्या रंगात सगळे रंग आहेत तसाच ह्या सगळ्याच पंचतत्वाचं अस्तित्व एकट्या आकाशात एकवटून राहिलं आहे.

मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे आकाशाचे कितीतरी खूप छान संदर्भ आता आठवतात आणि ते माझ्या अंतर्मनात खूप खोलवर रुजले आहेत... पहाटे शाळा भरण्याआधी speaker वर 'देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो... ' ह्या गाण्याने मस्त दिवसाची ताजीतवानी सुरवात व्हायची ... 'आकाशी झेप घे रे पाखरा ...सोडी सोन्याचा पिंजरा ...' असा बोध, 'अणुरेणिया थोकडा ....तुका आकाशाएवढा...' ही जाणीव, 'आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे ... ' हा आनंद, 'नभ उतरू आलं, चिंब थरथर ....' , 'तोच चंद्रमा नभात....', 'आकाश तारकांचे उचलून रात गेली... ' ह्या कवितांमधलं आश्चर्य, 'फिटे अंधाराचे जाळे ....झाले मोकळे आकाश', मधला सुटकेचा निःश्वास असं सगळं ऐकत... मनात साठवत मी आकाशाशी माझं वेगळं नातं जपलं आहे ... ह्या सगळ्या अस्तित्वावर कोणाची मायेची ऊब असेल तर ती या आकाशाची आहे असं मला वाटतं आणि ते खूपसं 'आकाश पांघरोनी जग शांत झोपले ग ...घेऊन एकतारी गातो कबीर दोहे...' ह्या लहानपणापासून ऐकलेल्या गाण्यामुळे आहे. हिंदीतही bollywood films मुळे 'नीला आस्मा ...खो गया', ' निले गगन के तले...धरती का प्यार... ', 'नीले नीले अंबरपर चाँद जब आये ...', 'तू जहाँ मैं वहा वहा ...संग संग चलू जैसें तेरा आस्मा..' अशा कितीतरी गाण्यांनी मनात घर केलं आहे.

मी शाळेत असताना ८-९ वीत कधीतरी 'तिचं आकाश' नावाचं पुस्तक वाचलं होतं, लेखिकेचं नाव आता आठवत नाही ... तिच्या जाणिवेने ती आयुष्याकडे बघते असं काहीसा विषय होता मला वाटतं ....पण एकूणच मला तेव्हाही हा दृष्टिकोन खूपच संकुचित वाटलं होता. आपल्याला समज येता-येता आपण आपलं आकाश विस्तारण्याऐवजी कधी कधी खूप संकुचित करून घेतो कधी कधी एखाद्या दुराग्रहामुळे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठीसुद्धा आपल्याला आपलं 'आकाश'च विस्ताराव लागतं ...कधी आपल्याला दुसऱ्याला 'अवकाश द्यावं' लागतं, तर कधी 'अवकाशही द्यायला' लागतो... कधी आपलं आकाश आणि बरोबरच्यांच आकाश मिसळून टाकावं लागतं....खरंतर आकाश किती विस्तृत आहे .....तो परमेश्वराचा canvas आहे असं मला नेहेमी वाटतं ...त्यात त्याचेच timekeepers सूर्य आणि चंद्र, तारका मंडळ, ग्रह, ढग, रंग असं काय न काय आहे .... जिथे बघावं तिथे आपल्यासोबत ते आहेच .... infinity म्हणजे काय ते कळावं म्हणून नेहेमी आपण आकाशाचाच संदर्भ देतो... sky is the limit हे कुठल्याही संधी साठी म्हणूनंच वापरलं जाणारं विशेषण आहे.

Security camera च्या console वरून कसं ज्या परिसरात camera लावला आहे तिथला कानाकोपरा दिसतो तसं आकाशाच्या console वर परमेश्वरला जिथलं दृश्य हवं ते दिसत असेल असही वाटतं मला...

एकूणच मूर्ताकडुन अमूर्ताकडे जाताना आपला विचार, विकास, विस्तार व्यापक झाला पाहिजे आणि त्यासाठी खरंच अमर्याद आकाश हेच परिमाण योग्य आहे.

© कविता सराफ

१६ डिसेंबर २०२५