Kavita's Kaleidoscope
आप
Water
चिंतन
Kavita Saraf
8/1/20261 min read

आप
मी मागे सुद्धा पाण्यावर लिहिलं होतं पण पंचमहाभूतं संदर्भाने परत एकदा 'आप' म्हणजेच पाणी तत्वाबद्दल लिहायला घेत आहे. प्रत्येक तत्वाचा विचार केला तर प्रत्येक तत्वाची स्वतःची देवता आहे जी त्या तत्वाला सतत परोपकारार्थ जागृत ठेवते ... वरूण देव समस्त जीवसृष्टीला जीवन देण्याचं काम करतो...मग ते कधी भगीरथाच्या प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर अवतरून, कधी पाऊसाचा वर्षाव करून किंवा अखंड वाहणाऱ्या नद्या, झरे, तलाव, विहिरी, समुद्र अशा कोणत्याहो रूपातून. नावं आणि रूपं कितीही बदलली तरी एकच 'जीवनदायी' कार्य आहे. सतत प्रवाह, कशातही मिसळून जायची तयारी, शुचिता, वेग, सर्वसमावेशकता अशा कितीतरी गोष्टी आपण पाण्याकडून शिकतो...आपली संस्कृतीसुद्धा पाण्याभोवती वसली आणि विकसित झालेली आहे ... आपणही ह्याच तत्त्वांपासून बनलेलो आहोत.... आणि त्यांच्या कमी-अधिक संपृक्ततेने आपल्याला आपलं व्यक्तिमत्व प्रदान केलं आहे.
गिरगांवात जन्म आणि तिथेच वाढल्यामुळे पाण्याबद्दल आणि एकूणच natural resources बद्दल नितांत आदर आणि जपणुकीची भावना आहे. दिवसाची सुरवातच 'नळ येणे' म्हणजेच नळाला पाणी येण्याने पहाटे ५ ला व्हायची....मग दादांचे २ मोठे पितळी पिंप भरून झाले की नळाच्या rubber pipe ला आई filter ची जोडणी लावून पिण्याचं आणि पूजेचं पाणी भरून ठेवायची. कालचं उरलेलं पिण्याचं पाणी वापरायला पिंपात भरून घ्यायची/अंघोळीला द्यायची ...पाण्याचं असं recycling आणि Optimum use फक्त ज्यांनी पाण्याची टंचाई अनुभवली आहे त्यानांच कळेल. ६:२५ ला पाणी जायचं त्यामुळे हा सकाळचा १.५ तास घरी 'पाणी' ह्या विषयावर अक्षरशः meditation केल्यासारखा जायचा. पाणी असताना १-२ आंघोळी उरकल्या तर अजूनच बहार ... बहुतेक माझी आणि दादांची व्हायचीच कारण शाळेसाठी सकाळी ६:३० ला घरातून निघावं लागायचं ... म्हणूनच जेव्हा लहानपणी, बहुतेक तिसरी किंवा चौथीत असताना, जलचक्राची ओळख झाली तेव्हा कळायला खूप सोपं गेलं ... पाणी किती विविध रूपात परत येतं आणि ते 'जलचक्र चित्र' काढून परीक्षेत लिहिता आलं तर केवढी धन्यता वाटायची !! नंतर प्रयोगशाळेत पाणी तयार करताना सुद्धा असाच आनंद झाला होता. मग समुद्रात किंवा नदीत तयार होणारा भोवरा आणि आईने समजावून सांगितलेलं centripetal आणि centrifugal forces आणि त्याची प्रत्यक्ष उदाहरण अनुभवताना खूप मजा यायची. ... तसंच पाण्यात अगदी chip सारखा बारीक दगड parallel फेकून पाण्यावरचे तरंग उठताना आणि फारच skillfully दगड फेकता आला तर multiple inner concentrated circles तयार व्हायची आणि फेकणाऱ्याला आकाश ठेंगणं व्हायचं....
कुठलही पाणी बघताना/अनुभवताना अजूनही माझा उत्साह कायम राहिला आहे .. मग ते चिंचोटी धबधबा, पांडव लेणी धबधबा, खोपोलीचा झेनिथ धबधबा, गोव्याचा दूधसागर धबधबा, लोणावळ्याचा भुशी डॅम, नायगारा USA हुन अगदीच नगण्य वाटणं पण तोच नायगारा इतका का प्रसिद्ध आहे हे Canada मधून अनुभवणं आणि ते अनुभवताना रणजित देसाईंच्या 'प्रपात' शब्दाची आठवण होणं हे अजूनही माझ्यासाठी अप्रूप आहे. नायगारामुळे तयार होणारे लेव्हल ४-५ चे currents पाहून सुद्धा पोटात गोळा येणं. अनेक वेळेला केलेलं कृष्णा नदीतलं स्नान, ऋषिकेशला केलेलं गंगेतलं rafting आणि गंगेतलं स्नान, स्वराच्या वेळी मी प्रेग्नन्ट आहे हे गंगेकाठी असताना कळणं, पंढरपूरला जाताना चंद्रभागेतलं स्नान, भालोदचं नर्मदा स्नान, ब्रह्मपुत्र नदाच साक्षात दर्शन, यमुनेच लोभस रूप, जम्मूतवी मधून हिमालयीन ट्रेकला गेले असताना पाहिलेले हिमाच्छादित डोंगर, बियास (व्यास) नदीवर तंबूत राहणं आणि पहाटे बियासच्या खळखळाटामुळे जाग येऊन हे सगळं स्वप्न तर नाही असं वाटणं, नैनितालची शांत तळी अनुभवणं, महाबळेश्वरचं टेकाडावरचं छान तळं, चिलका लेकची भव्यता , ठाण्याचं तलावपाळी आणि उपवनचा तलाव, सिमला-मनालीचं बर्फ, London ची थेम्स परकी वाटणं पण मलेशियातल्या नदीवर बोटीतून काजवे बघायला जायची रम्य आठवण, मुंबईचा पाऊस जीवापाड प्रिय असणं, शाळेत असताना मुंबईचा पाऊस चौपाटीला जाऊन अनुभवणं आणि पाऊसात उधाणलेल्या समुद्र लाटा अंगावर घेणं, Sewri Mangorve Creek ला जाऊन फ्लेमिंगो पाहणं, लोणावळा-खंडाळ्याचा पाऊस अनुभवणं, मुंबई , गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अलिबाग, गोवा, दमण, चेन्नई, केरळ, जगन्नाथपुरी, सिंगापूरचा समुद्र हे सगळं मला आजही अगदी जसच्या तसं आठवतं...गेले १०-१२ वर्ष शिकागोला राहायला आल्यापासून घराजवळच समुद्र वाटावा असा मिशिगन लेक आणि मग पाचही great lakes बघण्याचं भाग्य आणि जिथे हे ५ लेक्स
मिळतात ती जागा बघायला मिळणं हा अतिशय सुखद अनुभव आहे. मिशिगनच्या Mackinac Island आणि तिथला सुंदर लेक परत परत अनुभवणं पण त्याच मिशिगन मधल्या minominnie river मध्ये white-water rafting करताना राहुल raft मधून बाहेर फेकला जाणं आणि काही सेकंदांच्या चपळाईमुळे परत raft वर सुखरूप येणं, Torch Lake मध्ये मरता मरता वाचणं... हे तत्व आमच्यासाठी 'संहारक' न होता 'जीवनदायी' होणं हे आमच्यावर ह्या 'आप' तत्वाची किती कृपा आहे हे जाणवून रडू येणं ... परत एकदा ह्या तत्वांवरचा 'सकलहिताय' हा विश्वास दृढ होणं हे सगळं अचंबित करणारं आहे. USA च्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रांमध्ये सफरी करायला मिळणं.. डोळ्याचं पारणं फिटणं म्हणजे काय ह्याचा अनुभव California च्या South Route १ ची ट्रिप करताना येणं, हे सगळंच खूप अद्भुत आहे. कॅरेबिअनची क्रूझ करताना समुद्राची वेगवेगळी रूपं अनुभवणं आणि तीच नेहेमीची समुद्राची 'गाज' रात्रीच्या शांतवेळी अनुभवणं याहून सुख म्हणजे काय असू शकतं? हे सुख पहाटेचा सूर्योदय समुद्रावर पहायला मिळणं आणि 'तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज... ' ऐकणं ह्याच्याशीच फक्त compare होऊ शकतं ....
आता मागे वळून बघताना असं जाणवतं आहे की मी खूप भाग्यवान आहे.... मला नेहेमीच पाण्याच्या जवळ राहायला मिळालं आहे, अगदी जन्मापासून गिरगांव चौपाटी घराजवळ, मग नंतर colleges समुद्राला लागून, लग्न झाल्यावर उपवन तलाव घराजवळ, Chicago मध्ये, Apartment च्या खिडकीतून दिसणारा मिशिगन लेक, University चं नाव Du Lac आणि २ मोठे तलाव युनिव्हर्सिटी परिसरात असणं आणि आता Naperville च्या घराजवळ असणारे artificial lakes ... शिकागो सारख्या शहरात खूप snow होतं पण त्याचा तिटकारा न वाटता आम्ही सगळे ख्रिसमस च्या वेळी आवर्जून snow ची वाट बघतो ... हेही पाण्याचं रूप तितकंच लोभस आहे ... एकूणच ह्या 'पाण्यामुळे' माझं आयुष्य सुखसमृद्ध आहे असं वाटतं मला.
बा. भ. बोरकर, वि.वा. शिरवाडकर, गुलझार, जावेद अख्तर, राहुल शर्मा ह्यांनी पाण्यावर इतकं लिहिलं/काम केलं आहे की ते वाचताना आणि अनुभवताना आयुष्य अपूर्ण पडेल ... सगळ्या बऱ्या-वाईट प्रसंगांचा साक्षीदार होण्याचं भाग्य ह्या पाण्यात आहे... कधी अश्रू किंवा आनंदाश्रू म्हणूनही... ज्यांना कुठलीच भावना कधी मनाला शिवत नाही ते म्हणूनच किती कोरडे वाटतात... पाणी जिथे नसेल तिथे किती रखरखीत उदास वाटतं ... आत्ताच मी परत एकदा Arizona मध्ये जाऊन आले आणि प्रकर्षाने जाणवलं की आपल्या इथे पण दुष्काळी प्रदेशांमध्ये जसं चित्र आहे तसंच कमी-अधिक प्रमाणात इथेही आहे....आपल्याकडच्या पाणी, NAAM फौंडेशन सारख्या संस्था इथेही ह्या सगळ्या समस्यांवर काम करताना दिसतात... Sustainability of Natural Resources हा मुद्दा आता इतका ऐरणीवर आला आहे की थेट World Economic Forum दरवर्षी आपला अहवाल सादर करतं. पण मला वाटतं की प्रत्येकांनी ह्या तत्वांचा योग्य मान ठेवला तर हे सहज शक्य आहे. आपल्या सगळ्या जीवनावर ह्या पंचमहाभूतांचा खूप प्रभाव आहे... आपल्या बोली भाषेतही ह्या तत्वांसाठी कितीतरी दाखले आहेत... पळता भूई थोडी होणं, पायाखालची जमीन सरकण, तोंडचं पाणी पळणं, काळजाचं पाणी होणं, बारा गावचं पाणी चाखणं, डोळ्यांत अंगार फुलणं, अंगात वारं भरणं, नाकी नऊ येणं, डोक्यात हवा जाणं, आकाशाला गवसणी घालणं आणि कितीतरी .... आपल्या शरीरातलं दुसरं चक्र - स्वाधिष्ठान हे जल तत्वाशी निगडित आहे ..ही पंचमहाभूत आपली औषधसुद्धा आहेत.. उन्हांतून येऊन पायांवर थंड पाणी घेतलं की लगेच डोकं शांत वाटतं तसंच कशामुळेही आपल्या तळपायाची आग मस्तकाला गेली असेल तरी त्यावर हाच उपाय चांगलाच परिणाम दाखवतो... spa treatments हे ह्याचचं आधुनिक रूप. आपण पाण्याशी इतके जोडले गेलो आहोत की अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत आणि नंतरही आपण पाण्यातच मिसळून जातो ...अगदी कोणी गेलं तरी त्या घरात सगळे दिवस-वार झाले की परत सगळं शुभ सुरु होण्यासाठी आधी उदक शांत करावी लागते. मला तर हे त्या पंचमहाभूताचा केलेला 'अत्युच्च सन्मान' वाटतो. © कविता सराफ ६ ऑगस्ट २०२५
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations