blue green and brown peacock

मोरपीस, निळाई, शंकर

blue

चिंतन

Kavita Saraf

8/1/20261 min read

मोरपीस, निळाई, शंकर

मागे कृष्णावर लिहिलं होतं तेव्हा त्याचं मोरपीस आणि निळाई बद्दल पुन्हा कधी तरी लिहीन असं म्हटलं होत पण वेळ काही जुळून येत नव्हती पण आज योग आला ..... तो विचार पुढे न्यायला .....

कृष्ण म्हटलं की सगळ्यात आधी बाळकृष्ण, त्याचं मोरपीस आणि त्याची निळाई हेच रूप डोळ्यासमोर तरळतं ..... यशोदेने खूप तप करून देवाच्या बाललीला अनुभवायला मिळाव्यात असा वर मागितला होता आणि तो पूर्ण करण्यासाठी ......देवकीचा बाळ यशोदेकडे वाढत होता.... यशोदा त्याच्या बाळलीला पाहून इतकी तल्लीन होत असे (भावसमाधी) की बाळकृष्णाला (देवाला) त्यावर नेहेमी 'मायेचं' आवरण टाकून यशोदेला वर्तमानात आणावं लागत असे ..... यशोदा त्याला जेवू-खाऊ-माखू घालून त्याच्या मुकुटात मोरपीस खोवून त्याला तयार करायची... गोरक्षणासाठी जायला.....असा उल्लेख आहे बहुतेक भागवत पुराणात ... कितीतरी आख्यायिका आहेत कृष्णाच्या मोरपिसामागे .....

एकदा, मोर कृष्णाच्या उंबरठ्यावर 'गोपाळा तूझ्या शिवाय माझं कोणी नाही' असं म्हणून विनवणी करत असतो पण कृष्ण त्याकडे लक्ष देत नाही तेव्हा तो मोर राधे कडे जाऊन 'गोपाळा' चीच विनवणी करतो तेव्हा राधेने त्याचं म्हणणं ऐकून त्याला पाणी दिलं आणि म्हटलं की आता असाच जाऊन कृष्णाला परत भेट... मोराने त्याप्रमाणे कृष्णाकडे जाऊन 'राधे राधे' चा जयजयकार केला तेव्हा मात्र कृष्णाने आधी झालेल्या अपराधाची माफी मागितली आणि वचन दिलं की तू मोरपीस रूपाने नेहेमी माझ्या जवळ राहशील आणि जो कोणी राधेचं आणि माझं नाव घेईल तो मला नेहेमी 'प्रिय' असेल ..... अशी ही मोरपिसाची कहाणी मला कृष्णाच्या प्रेमाचं प्रतीक वाटतं.....ह्यावर माझा इतका ठाम विश्वास होता की मी माझ्या पहिल्या प्रेमपत्राबरोबर मोरपीस पाठवल होतं ..... पण मग जसजसं अजून विचार केला तेव्हा इतर अर्थ जास्ती बरोबर आहेत असं वाटायला लागलं ..... कधी असही वाटतं की मोरपिसामध्ये किती सुंदर रंगछटा असतात तसचं कृष्णाचं आयुष्य खूप विविध रंगछटा असलेलं होतं .....आणि त्या त्या क्षणी तेवढ्याच समरसतेने पण अलिप्ततेने ते त्याने जगलं.... आपल्यालाही असचं ....'रंगुनी रंगात साऱ्या ....रंग माझा वेगळा .... गुंतूनी गुंत्यात साऱ्या .... पाय माझा मोकळा ...' असं जगता आलं तर? ..... राम अवतारात सीता शोधासाठी मोराने मदत करून आपल्या अंगावरचं एक एक पिस काढून रामाला सीतेचा मार्ग दाखवला होता आणि सगळी पिसं झडून गेली तर मोरांचा मृत्यू होतो असं म्हणतात .....राम जन्मातल्या उपकारांची परत फेड म्हणून कृष्ण मोरपीस मुगुटावर धारण करतो .... मला सगळ्या आख्यायिकांमध्ये ही सगळ्यात पटणारी वाटते....प्रत्येकाच्या उपकारांची फेड, आठवण ठेवून परत करणं हे खूप कमी जणांना जमतं पण कृष्ण साक्षात 'परमात्मा' असल्याने त्याने हा वस्तुपाठ घालून दिला आहे....मोरपीस हे त्याच्या 'स्वरूपाचं' प्रतीक किंवा 'मायेचं' प्रतीक आहे असाही समज आहे.....सगळं 'जग' हेच मायेतून प्रतीत झालं आहे आणि एक तो वासूदेव नित्य-शुद्ध-मुक्त आहे पण आपली नजर त्याला सोडून बाकीच्या पसाऱ्यावर केंद्रित होते .... आणि त्याच्या मंद स्मितहास्यातून आपल्याला किती पल्ला अजून गाठायचा आहे ते कळतं .....

जसं कृष्णाकडे बघताना मोरपीसाकडे पहिलं लक्ष जातं आणि मग हळूहळू आपण त्याचं बाल्यरूप किंवा पुरुषोत्तम रूप न्याहाळतो तसं अजून एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्याची निळाई ..... श्रावण कृष्ण अष्टमी चा रात्री १२ चा जन्म म्हणून आधीच सावळा, त्यातून तान्हेपणी पुतनेचं आणि बालपणी कालियाचं विष पचवून आलेली निळाई ..... पण इतकं विष आणि अगणित शत्रूंचा विरोध-मत्सर पचवूनही फक्त बाह्यदर्शनी निळा ...... कुठल्याही शत्रूचा त्याच्या अंतरंगावर-वागण्यावर काहीच परिणाम नाही .....तो जसा होताच तसाच निर्मळ...... आकाश-पाणी असचं निळं दिसतं ..... निळा रंग सर्वव्यापीकत्व सुचवतो, अमर्याद शक्ती, ..... तो रंग निर्गुण-ब्रह्माचा आहे... निळा रंग पूर्णत्व सुचवतो......... म्हणूनच रामही सावळा-निळा दिसतो .....कारण राम-कृष्ण हे 'पूर्णत्व' आहेत....

म्हणूनच कदाचित corporate world मध्येही RAG status communicate करताना Blue Color - completed tasks साठी वापरतात.

..... अशीच निळ्या रंगाची सामायिकता देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निघालेल्या शंकराच्या 'हलाहल' पचवण्याच्या कथेतही आहे..... मंथनातून निघालेली १४ रत्नं वाटून घेतली गेली देव-दानवांमध्ये पण अमृतकलश हाती येण्याआधी विष पचवण्याची वेळ आली तेव्हा मात्र सगळे देव भोळ्या शिवाकडे गेले आणि त्यांनी हसत हसत ते सगळं 'हलाहल' पचवलं .... किती मोठा धडा आहे हा की...प्राप्तपरिस्थितीत कारणमीमांसा करत 'गरळ' ओकण्यापेक्षा, सर्वकल्याणासाठी 'हलाहल' पचवावं लागतं ...... ही सगळी कथा खूप छान 'रूपक' आहे हे आपल्या लक्षात येत नाही ..... 'मन' घुसळून 'स्वस्वरूपाचं' ''ब्रह्म'-अमृत' हाती येण्याआधी... आपल्याच पूर्वकर्मांच 'विष' पचवावं लागत त्यासाठी आपल्यातल्या 'शिवाला' जागवावं लागतं .... तो 'शिवच' जुन्या नको असलेल्या विचारांचा-अज्ञानाचा 'ऱ्हास' करून नव्या 'अनुभूतीला-सृजनाला' जागवणार असतो .... ज्याचं व्यवस्थापन आपल्यातलाच 'हरी' करणार असतो........ तर असं हे आपल्यातलच 'ब्रह्मा-विष्णू-शिव' - 'त्रिकूट' आपल्यातल्या सृजनाचं-व्यवस्थापनाचं-ऱ्हासाचं चक्र अबाधित ठेवत असतं ....शंकरासारखंचं कुठे थांबायचं, कसला नाश करायचा, कुठलं हलाहल पचवायचं, कुठे भोळेपणा कायम ठेवायचा, कुठे तिसरा डोळा उघडायचा, कुठे तांडव करायचं, कुठे खुशीत डमरू वाजवायचा ......हे कळलं पाहिजे .........

© कविता सराफ

१८-फेब्रुवारी-२०२३