चातुर्मास - एक आठवण

Blog post description.

आठवणी

7/30/20261 min read

चातुर्मास - एक आठवण

खरं तर ह्या विषयावर खूप जणांनी काही ना काही लिहिलं आहे, पण तरीही 'माझं' असं काही लिहावंसं वाटलं ...... चातुर्मास, किती छान कल्पना आहे ना? मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्मल्यामुळे, सगळं बालपण गिरगावात काढल्यामुळे किंवा आई-दादांच्या संस्कारांमुळे चातुर्मास आला कि काही वेगळाच आनंद, उत्साह सगळ्या वातावरणात भरून राहायचा, चित्तवृत्ती अगदी प्रफुल्लित झालेल्या असायच्या... सुरवात अगदी 'आषाढस्य प्रथमदिवसे' म्हणून महाकवी कालिदास दिनाच्या निमित्ताने कालिदासाची आठवण मेघदूत, कुमारसंभव आणि शकुंतलेच्या संदर्भांनी व्हायची .... किती असामान्य प्रतिभेचं 'रत्नं' होतं कवी कालिदास !!!...कॉलेज मध्ये थोडीशी 'मेघदूत' ची 'झलक' अभ्यासली होती आणि नेहेमी कालिदासाच्या स्त्रीच्या भावना ओळखण्याची ताकद अचंबित करायची, कुमारसंभवहि असंच मोहित करायचं आणि 'शंकर-पार्वती' ची आठवण पुढे भाद्रपदापर्यंत रेंगाळायची ....एकदा 'मेघदूत' आणि 'कुमारसंभव' वाचलं पाहिजे पूर्ण .....

मग कांदेनवमीला नेहेमी 'खास बेत' बहुतेकवेळा कांदा, पालक भजी, वाफाळणारा चहा आणि कांदे भात असा काहीसा बेत असायचा ...हे इतकं ठरून गेलं होतं कि दरवर्षी तोच बेत थोड्याफार फरकाने असला तरी आम्ही त्याची आवर्जून वाट बघायचो. आई एक आठवडा, आधीच आठवण करून द्यायची की आता कांदा-लसूण बंद ..... मग मी तिला विचारायचे की का खात नाही आपण कांदा-लसूण? आणि नवमीच का करतो? ...कांदे दशमी का नाही? तर तिचं उत्तर असायचं की आपण उष्ण कटिबंधात राहणारे, 'मूळ शेतकरी' पावसाच्या भाकितावर आणि मर्जीवर अवलंबून असणारे, कांदे-लसूण ह्या दिवसात पचवण्याची क्षमता नसणारे आहोत, संपूर्ण चातुर्मास हा अत्यंत सात्विक वृत्तीत व्यतित करावा म्हणून उत्तेजक अशा कांदा-लसूणाचा वापर व्यर्ज असतो ....पाळलाच पाहिजे अस नाही पण पाळला तर मनाला आणि शरीराला पण चांगलं वाटतं. आणि 'नवमीच' का तर, 'दशमी' हा दिवस आदल्या दिवशी खाल्लेलं पचवायला आणि 'निग्रहाचा' दिवस. दुसऱ्या 'देवशयनी' आषाढी एकादशी असते त्यासाठी मनाने आणि शरीराने शुद्ध होण्याचा दिवस. एकादशी म्हणजे लहानपणी मस्त साबुदाणा खिचडी फस्त करण्याचा दिवस वाटायचा. जसं मोठी होत गेले तसतसा त्यातला वारीचा 'भाव' कळत गेला. आई तर संपूर्ण चातुर्मास 'नक्त' करायची...म्हणजे एक वेळच जेवायची ....मग आम्ही मुलींनी तिला ते कसं चुकीचं आहे हे पटवून देऊन फक्त श्रावण महिना उपास कर अस deal strike केला होत तिच्याशी.

मग येणारा श्रावण म्हणजे तर मला 'मासराजच' वाटतो एक तर बालकवींमुळे कळलेला ऊन-पावसाचा खेळ अनुभवता यायचा आणि दुसरं म्हणजे माझ्या जन्मदिवस जवळ येण्याची चाहूल लागलेली असायची. शाळेत असताना श्रावण सोमवारी फक्त सहा पिरियड शाळा, सकाळी लवकर उठून बाबुलनाथाच्या दर्शनाला जायचं बेस्ट बसने आणि मनोभावे दर्शन घेउन शाळेत जायचं....दुपारी लवकर घरी आले की आईची दुसर्र्यांदा अंघोळ करून शिवलीलामृतातला अकरावा अध्याय वाचत बसलेली असायची. आई आणि दादा दोघेही शिवभक्त .....मलाही एकूणच शिव-पार्वती-कार्तिकस्वामी-गणपती ह्या पूर्ण कुटुंबाबद्दल अतोनात कुतूहल आहे....प्रत्येक जण आपापल्या परीने श्रेष्ठ, अढळ आणि प्रसंगानुरूप तावून-सुलाखून 'देवत्व' पावलेला.....

दर श्रावण सोमवारी संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास जेवण व्हायचं ... वरण-भात-तूप-लिंबू-फ्लॉवर-बटाटा भाजी, गरमागरम फुलके, अळूवडी, चटणी,कोशिंबीर, दही आणि खीर ..... अहाहा काय जेवण असायचं ...पहिल्या घासालाच तृप्ततेची जाणीव व्हायची.... घरचं आवरून आई परत एकदा अंघोळ करून संध्याकाळच्या शिवदर्शनाला घेऊन जायची. अजूनही हे सगळं आठवलं की काहीतरी निसटून गेल आहे हातातून .... खूप उबदार.... परत न येण्याजोगं.... ह्याची जाणीव होते.

श्रावणातली प्रत्येक वाराची आणि सणाची कहाणी वाचायची आणि त्यातून 'उतू नये-मातू नये, घेतला वसा टाकू नये' अशी शिकवण आत्मसात करायची.. कधी कधी वाटतं ह्यापेक्षा value education चा दुसरा चांगला मार्गच नसेल .... पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कहाण्या ..... निसर्गाच्या जवळ जाण्याची, त्याला जपण्याची, नाती जपण्याची शिकवण म्हणजे संस्कारांचा crash-course च ... आजही साना-स्वराला कहाण्या सांगताना सुरवातीला गणपतीची कहाणी सहज सुरु होते ....'ऐका गणेशा तुमची कहाणी, निर्मळ मळे उदकाचे तळे, विनायकाची देवळे-रावळे. मनाचा गणेश मनी वसावा .... ', लांडोबा-पुंडोबाची कहाणी, जिवतीची कहाणी, मारुतीची कहाणी... आणि कितीतरी ...

कोणाकडे शेजारी जागवलेली मंगळागौर, खेळताना केलेली मस्ती, खिदळण आणि मग दुसऱ्या दिवशी चालतानाही दुखलेलं अंग...खूप मजा असायची .... एकदा तरी श्रावणात केलेली सत्यनारायण पूजा....दर शुक्रवारचं कोणाकडे तरी कुमारिका म्हणून बोलावलेलं, भजी-पुरणपोळीचं जेवून मग दुपारी डुलक्या काढत केलेला घरचा अभ्यास.... आणि परत संध्याकाळी चाळभर हळदी-कुंकू,चणे-गूळआणि चांदीच्या वाटीतून प्यायलेलं मसाला दूध ....आई पण एका शुक्रवारी सवाष्ण -कुमारिका जेवायला बोलवायची आणि गरम भजी आणि पुरणपोळी वाढायची सगळ्यांना ..... इतके फुलपाखरासारखे दिवस असायचे ....आम्ही मैत्रिणी आणि बहिणी मजेत असायचो ....सगळीकडे असच असत असं वाटायचं मला तेव्हा ... आणि ते तसं नसतं हे कॉलेज मध्ये वेगवेगळ्या जाती-धर्मातल्या मैत्रिणींमुळे कळलं...

गणपती येण्याआधी 'आवरणाला' मदत करायचो .... नवीन कपडे घालून, न्हाऊन आवराआवरी करून, दुसऱ्या दिवशी आईबरोबर 'वाळूचा महादेव' करून हरितालिकेचा उपास करायचो. दादांना तर किती अभिमान होता की आमच्या 'जगन्नाथ चाळीचा' गणपती स्वतः टिळकांनी येऊन बसवला होता. गणपती म्हणजे तर प्रसाद, आरत्या, नाच-नाटक, वक्तृत्व स्पर्धेत घेतलेला भाग, मिळालेली बक्षिसं ह्यात जायचा ....कलागुणांची जोपासना करण्यासाठी चाळीचं व्यासपीठ मिळणं ह्यात काय सुख आहे हे मी शब्दांत सांगूच शकत नाही .... मला तर अगदी जीवावर यायचं चाळीतला गणपती सोडून काकूंकडे गौरीच्या दिवशी जायचा ....पण दरवर्षी आम्ही जायचो ...पुढे लग्न झाल्यानंतर तर गौरींचा सण खूपच आवडतो ....हा सण preparation,planning, execution, behavioral-relationship-financial management शिकवतो असं वाटतं मला. अनंतचतुर्दशीला अनंताची पूजा आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर पितृपंधरवड्याच्या काळात छान अभ्यास व्हायचा ..... बहुतेक पूर्वज खुश असणार ह्या काळात त्यांची आठवण काढयल्यामुळे अस वाटायचं मला. मग सहामाही परीक्षा आणि नवरात्र हॅन्ड-इन-हॅन्ड असायचं ... दसऱ्याला सरस्वती पूजा...नवीन कपडे, सोनं लुटण्याचा आणि चोकोलेट्स गोळा करण्यात संध्याकाळ निघून जायची.... 'कोजागिरीला' चंद्राला ओवाळून 'जुने वस्त्र घे आणि नवे वस्त्र दे' अशी केलेली विनंती तो दिवाळीला नवे कपडे देऊन पुरवायचा (late-current च आहे ....हि माझी लहानपणीची भाषा/भावना) ....अश्विनी पौर्णिमेला आई, ताईला ज्येष्ठ अपत्य निरांजन म्हणून ओवाळायची आणि मग माई आणि मला पण ओवाळून 'अश्विनी' ची भेट मिळायची ....

दिवाळी मला आवडायची कारण फराळ, गेरूने सारवलेली जमीन, रांगोळी आणि आकाशकंदील, पण आवाजाच्या फटाक्यांचं आणि माझं कधीच जमलं नाही....मला चाळीत सगळे जण कविता फटाके 'बघून' नाही पण 'ऐकून' enjoy करते असं चिडवायचे. दिवाळीच्या सुट्टीत आई आणि तिच्या मैत्रिणींबरोबर आम्ही कुठल्यातरी बागेत आवळी भोजनाला जायचो ....म्हणजे potluck. तुळशीचं द्वादशीला लग्न झाल की आता शाळा/कॉलेज सुरु होणार ह्या कल्पनेनेच कंटाळा यायचा.

देवशयनी ते प्रबोधिनी एकादशी हा संपूर्ण चातुर्मासच व्रत-वैकल्याने भरलेला, नाती जपण्यासाठी राखून ठेवलेला आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याचा काळ आहे असं मला वाटतं ...ह्या काळात - 'देव झोपलेला' असताना, माणसाच्या हातून कुठलीही चूक होऊ नये आणि त्याला सावरायला लागू नये म्हणूनच तर हे सगळं असं आखून ठेवलं असेल का? आताच्या भाषेत आपण म्हणतो ना की mind-share तस काहीसं.....?

ह्या सगळ्या काळात एक गोष्ट सामायिक आहे ती म्हणजे दिव्यांच महत्त्व.... दिव्यांच्या अमावास्येपासून ते पुढे अगदी दिवाळी, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत आवळ्यावर वात लावून आपण दिव्यांच किती आवर्जून कौतुक करतो ना ? मला तर वाटतं कि ह्या काळात किंवा रोज जो दिवा आपण देवापुढे लावतो तो लावून शांतपणे बसून देवाचा चेहरा निरखणं किती समाधानकारक आहे ना ....आपला प्रत्येक सण आणि क्षण दिव्यांनी उजळलेला आहे.... त्या शांत ज्योतीच्या प्रकाशात आपण स्वतःलाच बघत/शोधत असतो का देवाच्या डोळ्यांत ? हेच आहे का द्वैत-अद्वैत ?

'श्रावण' 'संयमाचा' । 'भाद्रपद' स्व 'क्षमता' अजमावण्याचा ।।

'अश्विन' 'शक्ति-बुद्धीचा' । कार्तिक 'आनंदाचा' ।।

देवशयनी ते प्रबोधिनी। 'चातुर्मास' हा आवडीचा ।।

©कविता सराफ

२८-८-२०२०