Kavita's Kaleidoscope
रंग
colors
चिंतन
Kavita Saraf
8/1/20261 min read

रंग माझा वेगळा ते अवघा रंग एक जाला
धुळवड, होळी, रंगपंचमी, ह्या दिवसांत रंगांना किती महत्त्व आहे ना ? ह्याच दिवसांत छान वसंताची चाहूल लागून दिवस मोठा होत जातो आणि साऱ्या आसमंतात रंगांच्या उधळणीला सुरवात झालेली असते ....मला तर वाटतं की देवाला किती छान आकाशाचा canvas, जोडीला पृथ्वी-सृष्टीचं stage, backdrop ला आप-तेज-वायू च साहाय्य मिळालं आहे आणि ह्या सगळ्यांबरोबर, तो रोज वेगवेगळे रंग सूर्य-चंद्राच्या साथीने भरतो... आपल्याला स्वतःच्या आयुष्याचा रंगारी होण्याची प्रेरणा देतो..... प्रत्येक चित्र आकर्षक होण्यासाठी आपल्याला अजून काय पाहिजे ?
फाल्गुन आपल्या पंचांगातील शेवटचा महिना आणि होळी हा शेवटचा सण, आपण तो दुष्ट प्रवृत्तीचा नाश म्हणून होळी पेटवून आणि दुसऱ्या दिवशी रंगांबरोबर साजरा करतो.... आपलं उभं आयुष्य ह्या रंगांनी व्यापून टाकलं आहे आणि म्हणूनच खूप सुंदर आहे .... चैत्र पासून ते फाल्गुन पर्यंत प्रत्येक महिन्याला स्वतःचा रंग आहे ...चैत्राचा हिरवा-केशरी आंब्यांची पानं-मोहोराचा आणि झेंडूच्या फुलांचा, वैशाखाचा पिवळा गव्हाच्या रोपांचा, ज्येष्ठाचा तपकीरी वडाच्या पारंब्यांचा, आषाढाचा राखाडी-निळा-काळा सावळ्या विठूचा आणि काळ्या ढगांचा, श्रावणाचा हिरवा-पिवळा-लाल हिरव्यागार गालिचाचा आणि फुलांचा, भाद्रपद पिवळा कृष्णाच्या पीतांबराचा, अश्विनाचा इंद्रधनूचा शारदामातेच्या विविध रूपांचा, कार्तिकाचा पिवळा दिवाळीच्या लख्ख प्रकाशाचा, मार्गशीर्षाचा लाल-पिवळा पौर्णिमेच्या चंद्राचा, दत्तगुरूंच्या पितांबराचा, पौषाचा पिवळा-लाल-केशरी सूर्याचा-विष्णूचा, माघाचा पांढरा माघस्नानाचा आणि फाल्गुनाचा सप्तरंगी रंगांच्या उत्सवाचा...महिन्यांना रंग आहे तसाच प्रत्येक ऋतुलाहि आणि अगदी असाच प्रत्येक दिवसाला त्याचा-त्याचा रंग असतो ....आणि आपणही आपल्या स्वभावानुसार, प्रसंगानुरूप त्यात रंग भरतो .....
लहानपणी समजलेले सप्तरंग आणि त्यापासून आलेल्या विविध छटा पुढे एकेक अनुभवांतून प्रत्यक्ष जगतो आपण ....खरंतर पंचेंद्रियांपैकी सर्वांत महत्वाचं ज्ञानेन्द्रीय रंगांकडे खूप लवकर आकर्षित होतं .... कुठलाही अनुभव हा पंचेंद्रियांनी जाणला तर तो कधीच विसरला जात नाही आणि म्हणूनच अनुभव आठवताना मला तरी त्याचे रंग आठवतात ... मला तर वाटतं की आपल्या त्या-त्या अवस्थेला पण एक रंग असतो... लहानपण म्हणजे लाल, तरुणपण म्हणजे हिरवा, मध्यमवय म्हणजे जांभळा, चिरतरुण म्हणजे पिवळा... पण हे तर इंद्रधनुष्यातले ठळक रंग.... इतकं सोपं नाहीये आयुष्य म्हणून मग आपण माणसांच्या, स्वभावाच्या, भावनेच्या असंख्य छटा अनुभवतो ...मला तर भावना नेहेमी रंगांबरोबरच जाणवतात .... रागाचा लाल, अनुरागाचा डाळिंबी, विरहाचा मोरपिशी, प्रेमाचा गुलाबी, मायेचा पिवळा-पांढरा, परिपूर्णेतेचा निळा, व्यापकतेचा निळा-पांढरा, लोभाचा हिरवा, मत्सराचा शेवाळी, उद्वेगाचा राखाडी, कारुण्याचा जांभळा, दुःखाचा कुठलातरी गडद, प्रयत्न करून मग हरल्याचा पांढरा, प्रयत्नही न करता आलेल्या अपयशाचा तपकिरी, यशाचा सोनेरी, शिकण्याचा चंदेरी, त्यागाचा केशरी, त्वेषाचा काळसर लाल, समाधानाचा कुठलाही pastel, ....आणि कितीतरी....भाव-भावनेच्या छटांबरोबर माणसांचे रंगही कधी सरड्यासारखे बदलणारे, कधी गडद, कधी रंगहीन, कधी रंगाचा बेरंग करणारे तर ह्याउलट योगी म्हणजे नारिंगी/केशरी आणि संत म्हणजे पांढरा....सगळ्या भावभावना अनुभवाव्या आणि आयुष्य रंगांनी समृद्ध असावं असं वाटतं मला .... रंग रांगोळीतले असोत, चित्रातले असोत की आयुष्यातले त्यांची संगती चांगली जमली पाहिजे म्हणजे मग दुःखामागून सुख आणि सुखामागून दुःख अशा रंगांचा contrast अंगवळणी पडतो ....त्यालाही चंदेरी-सोनेरी किनारी देण्याचं काम मात्र कुशल कारागिराला जमावं तसं जमलं पाहिजे.....पण रंगांची सोबत अखंड असावी, आपले रंग आणि आपल्या बरोबरच्यांचे रंग एकत्र करून काय कलाकृती घडते आहे ते अजमावावं, त्या रंगांमध्ये न्हाऊन निघावं, कधी आपल्या रंगांची भर घालावी कधी आपले रंग उसने देऊन बघावं .... पण भरभरून रंग अनुभवावे....असं करता करता कधी कधी 'रंगूनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा' अशी अवस्था अनुभवावी .... नाव राधा असूनही शोले सिनेमातल्या रंगप्रेमी राधाचं आयुष्यं काळं-पांढरं असावं ह्याचा विषाद जेव्हा पहिल्यांदा हा सिनेमा पहिला होता तेव्हा पासून वाटत आला आहे.....तोच विषाद ज्यांना रंगच दिसत नाहीत त्यांच्या बाबतही वाटतो पण त्यांच्या सिक्सथ सेन्स मुळे कदाचित रंगांच्या पलीकडे जाण्याची दृष्टी उपजतच त्यांना असेल .... पण अशा साध्या आनंदाला कोणी मुकू नये असं जरूर वाटतं....
रंगांचा विचार केला की मला प्रामुख्याने राम, कृष्ण, महादेव, हनुमान आणि गणपती डोळ्यांसमोर येतात ....ह्या प्रत्येकाचं रंगाबरोबर घट्ट नातं आहे .... त्यातही कृष्णाइतकं रंगांशी खेळणारं परिपूर्ण उदाहरण दुसरं नसेल .... म्हणूनच इतकी अर्थपूर्ण गाणी ह्या श्रीरंगावर रचली आहेत..... 'त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग ... ' , 'सांज ये गोकुळी सावळी सावळी...', 'सावळाच रंग तुझा...'....
' अवघा रंग एक जाला .... रंगी रंगला श्रीरंग' ..... काही दिवसांपूर्वी किशोरीताईंचा हा अभंग ऐकला आणि माझे रंगांविषयी विचार तरंग सुरु झाले. पण वेळ मिळत नव्हता कागदावर उतरवण्यासाठी ....पण आज धूळवड आणि परत एकदा तोच अभंग ऐकला आणि ते कृष्ण-विठ्ठल लोभस रूप आणि त्या रंगामध्ये रंगलेली राधा-मीरा-जनाबाई-सोयरा आणि अशा कितीतरी ....अद्वैताचा साक्षात्कार इतक्या सहजी सोयराबाईंनी मांडावा.... प्रत्येक शब्दाने आपल्याला थक्क करून सोडावं ....शब्द ऐकू की किशोरीताईंचे सूर-आलाप ऐकू की त्या सावळ्याच्या कृपेचा ठाव घेऊ, की ह्या पराभक्तिच्या वर्षावात अश्रू थांबवू .... किती वेळा हा अभंग ऐकला तरी माझी हीच भांबावलेली अवस्था असते....शेवटी शब्दच ठाव घेतात आणि "चोख्याची 'म'हारी ...." हा शब्द का आहे हा माझ्या कुवती प्रमाणे लावलेला अर्थ ... 'मीपणा हरलेली' आणि म्हणूनच ' भक्तिरंगात पूर्णपणे रंगलेली सोयरा.... त्या विठूच्या रंगात एक जाली ....'
© कविता सराफ
१७-मार्च-२०२५
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations