brown wooden sticks with white smoke

दरवळ

Incense

चिंतन

Kavita Saraf

8/1/20261 min read

दरवळ

सकाळची शाळा, झोपेत शाळेत जायची केलेली तयारी आणि पहिली घंटा होण्याआधी, लवकर जाऊन मागच्या अंगणातून वेचलेली बकुळीची फुलं .....कसं निसटून गेलं बालपण कळलही नाही .....

कडक उन्हाळ्यानंतर आलेला पहिला पाऊस आणि त्यातून येणारा भाजून निघालेल्या ओल्या मातीचा सुगंध, वाफाळणारा आल्याचा चहा, कांदाभजी तळण्याचा वास..... पावसाळा आल्याची जाणीव .....

सुरईच्या मातीचा वास असलेलं थंड पाणी, वाळ्याच्या ताट्याने थंड केलेलं ऐसपैस घर, दुपारच्या जेवणात असलेले खरबूज शिकरण, गोटी आंब्यांचा भरून राहिलेला वास, उन्हं उतरल्यावर पुढच्या आणि मागच्या अंगणात घातलेल्या सड्याने घमघमलेली लाल माती, रात्री रॉकेल-कंदिलाच्या उजेडातलं - जेवण कधी मेथीची पीठ पेरून केलेली भाजी आणि बुक्कीने फोडलेला पांढरा कांदा, लसूण चटणी, रात्री चांदणं बघत आणि जुईच्या कळ्यांच्या संगतीत लागलेली झोप.... ही माझी आजोळची आठवण....

खूप गर्दी, फुललेल्या मोगऱ्याचा वास, त्यातून येणारा माशांचा मळमळवणारा वास, उग्र वासाचे परफ्यूम्स, घामाचा मिश्र दर्प, फेरीवाल्यांकडचा सामोशाचा वास असल्याशिवाय मुंबई लोकल ट्रेनमधला प्रवास, प्रवासचं वाटत नाही. ....

ओली मेहेंदि, चहा, काथ, निलगिरी, लिंबू साखर पाणी याचा मिश्र वास कुठल्यातरी शुभ प्रसंगाची तयारी सूचवतात .....

आई तर नवरात्रीच्या दिवसांत म्हणायची की देवीचे फेरे असतात संधिकाळी घराघरातून .....आणि खरंच संध्याकाळी दिवेलागणीला उदबत्ती लावण्याच्या आधीच खूप पवित्र आणि प्रसन्न चंदनाचा वास जाणवायचा ...... अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकताना आलेला धुपाचा वास खूप आवडायचा .....पण त्या बायकांची खूप भीती वाटायची .....

दिवाळी आता थोड्याच दिवसांवर आली आहे हे घराघरांतून येणाऱ्या भाजणीचा, बेसन लाडू भाजल्याचा, करंजी, चकलीच्या तळणीच्या वासांवरून कळायचं........

वासावरून पदार्थ कसा झाला असेल हे ओळखणारी तर शितावरून भाताची परीक्षा करणाऱ्यांपेक्षा पण हुशार असतील असं वाटतं .... ?

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे जागच फटाक्याच्या आवाजाने यायची, चाळीत तर पाहिला बॉम्ब कोण लावतो यावर पैज लागलेली असायची. आई औक्षण करून मग मस्त सुवासिक तेल लावून अंग रगडून द्यायची, मग गरम पाण्याने शिकेकाई आणि रिठ्याने नहाणं, खसखस-चंदन उटणं आणि म्हैसूर सॅंडल सोपचा मंद वास त्यातच फटाक्यांच्या दारूचा वास, दादांनी डाव्या पायाने फोडलेले कारट ...नरकासुरवधाचं प्रतीक .... ह्या सगळ्यांचा एकत्र 'दरवळ'....... लक्ष्मीपूजनाला संध्याकाळी हळदीकुंकू, फुलं आणि अत्तर.... पाडव्याच्या दिवशी मोती साबण.... असे नेहेमीचे सवयीचे सुगंध अनुभवल्याशिवाय दिवाळी साजरी केली असं वाटतच नाही...

संध्याकाळी थकून घरी आल्यानंतर देवापाशी लावलेला दिवा आणि मन प्रसन्न करणारा मंद वास असलेली उदबत्ती ....जणू काही सगळं ठीक होण्याची ग्वाहीच ....

आपलं कोणीतरी .....त्याचा परिचित मंद परफ्युम....नकळत आपल्या ओठांवर उमटलेलं स्मित .....

कृष्ण, सत्यभामा आणि रुक्मिणी .....पहाट आणि प्राजक्त....कोणी कोणाला किती ओळखलं ? आणि कोणी नुसतंच निमूटपणे प्रेम निभावलं आणि सगळंच सुगंधित केलं?

‘अवचिता परिमळू झुळकला अळुमाळु ....’, ज्ञानोबांना पण कृष्णाचे वर्णन करताना जाणवणारा 'दरवळ' शब्दांमध्ये सांगावासा वाटला.....

आपल्या घ्राणेंद्रियांना किती वास ओळखण्याची सवय झालेली असते ना?... काही वास अगदी हवेहवेसे , मन प्रसन्न करणारे ......तर काही अगदी नकोसे ...

लहानपणी ऐकलेली अकबर आणि बिरबलाची गोष्ट आठवते .... 'बूंद से गयी वो हौद से नाही आती' ...तेव्हाव्ही मला असं वाटायचं कि हि गोष्ट अकबर राजासाठी थोडी अन्यायकारक आहे ...... बिरबलाच्या हुशारीचे खूप कौतुक होते ते ठीकच आहे पण म्हणून अकबरच्या गुणग्राहकतेकडे दुर्लक्ष करायचे हे मला तेव्हाव्ही पटायचे नाही.... एवढा मोठा राजा..... पण एक थेंब गालिच्यावरुन टिपून घेणारा .... उंची-दुर्मिळ अत्तराची काय किंमत असते ते कळलेला राजा.... असं वाटायचं मला.....

बरं हे सुवास पण किती प्रामाणिक ? ..... जाई-जुई-सायली-निशिगंधा म्हटलं की अगदी मंद नाजूक गोडवा ..... पण तेच अनंत-तेरडा-मोगरा-गुलाब म्हटलं की थोडे उग्र ...... जसं अगदी अपेक्षित ? ...... म्हणूनच देवाला कमळ, जास्वंद, तगर अशी तटस्थ फुलं आवडत असावी का?

आता तर वाटतं कि प्रत्येक ऋतूला स्वतःचा असा एक वास असतो ..... आणि तोच आपला त्या त्या दिवसांतला मूड सेट करतो ..... असं काहीतरी अखंड-सतत बदलत जाणारं आहे म्हणूनच जगण्याची मजा आहे .....

माणसाचं पण काहीसं कस्तुरीमृगासारखच आहे.... अखंड शोध त्या सुवासाचा....... पण नंतर कधीतरी कळलं आहे कि हा सुगंध आपल्याच नाभीतल्या कस्तुरीचा ..... अगदी तुझं आहे तुजपाशी....पण ते कळूनही न वळलेलं...

तीक्ष्ण घ्राणेंद्रिय असलेल्या लोकांना 'जगणं' जरा 'जास्तीच' कळलंय असं तर नसेल ना ? पण मग ज्यांना 'वासच' ओळखता आला नाही त्यांना 'जगणं कळण्यासाठी’ दुसरं कुठलं इंद्रिय परजून ठेवावं लागत असेल ?......

© कविता सराफ

12 November 2020