Kavita's Kaleidoscope

गिरगांव आणि गणेशोत्सव
Ganeshotsav
आठवणी
Kavita Saraf
9/18/20231 min read

गिरगांव आणि गणेशोत्सव
मी गिरगांवात राहात असल्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाची तयारी, कृष्णजन्माष्टमी आणि गोपाळकाला (त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी...) झाला की चाळीत मांडव घालण्यासाठी बांबू आणि ताडपत्री येऊन होत असे. मग येत्या weekend किंवा कुठल्या तरी रात्री सगळे आपापली कामं आटोपून आले की शुभ मुहूर्तावर नारळ फोडून, बाप्पाचा जयजयकार करून एक बांबूची मोळी बांधून होत असे. आमच्या १२६-डी जगन्नाथ चाळीत, तिथले रहिवासी आणि त्यांची उत्साही मुले हेच मांडव घालण्याची जबाबदारी पार पाडायचे. काही चाळींमध्ये त्याचे contract देऊन मांडव घालून घेतला जायचा. पण आमच्या इथे मात्र आमचे रहिवासी मांडव घालतात ह्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान होता. मग गणेशोत्सवाच्या आधीच्या weekend ला मांडव घालण्याचं नक्की होतं असे आणि सकाळपासून चाळीत मस्त धमाल गडबड असे. लहान मुले, मोठ्या मुलांना बांबू च्या batches बांधण्यात मदत करायची आणि मग असे १०-१२ वासे बांधून झाले की मोठी मुले आणि माणसे ते वासे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरच्या कठड्यांवर rest करून नंतर वरती मजबूत सुतळीने बांधून घेत असत, मध्यभागी एक उंच वासा आणि मग दोन्ही बाजूंनी उतरते वासे बांधून घेत असत. हे structure एकदा जमलं की मग त्या वास्यांवर चढून बसून एक-एक बांबू लावून, सुतळ्यांनी बांधून मांडव पूर्ण होत असे. लहान मुलं मग खाली उभे राहून, वर बसलेल्याना बांबू पुरवण्याचं काम करत असत. मीही लहान असताना हे काम केलं आहे. आमचे दादा (वडील) पण मांडव घालण्यात सहभागी होत. मांडव skeleton साधारण दुपारपर्यंत पूर्ण होत असे. मग चाळीतल्याच बायका पोहे-चहा करून सगळ्या volunteers च्या खान-पानाची व्यवस्था बघत असत. माझ्या आईने एकदा भरपूर चहा, पोटभर पोहे आणि सर्वांना घरी केलेले विडे असं दिलं होत असं आठवतं आहे. ह्यात कुठल्याही मोबदल्याची कोणालाच काहीच अपेक्षा नसायची उलट आपला काहीतरी हातभार गणेशोत्सवासाठी लागतो आहे ह्यातच आनंद असायचा.
दुपारनंतर मांडवावर ताडपत्री घालण्याचं काम सुरु होत असे, ताडपत्र्यांच्या घड्या प्रत्येक मजल्यावर एक-एक करत उचलून आणायला लागत आणि मग ताडपत्र्या पसरून, चारही बाजूंनी आधी सुतळ्या-दोऱ्या ओवून घेऊन त्या ओढत मांडवावर घालण्यासाठी तयार केल्या जात आणि बांबूच्या skeleton वर त्या पसरवून घालून परत बांधून टाकल्या जात म्हणजे मग वाऱ्या-पावसात पण गणपती सुरक्षित राहण्याची काळजी घेतली जायची. कधी कधी मांडव घालून झाला की पाऊस पडून मांडव किती चांगला घातला गेला आहे त्याची परीक्षा व्हायची ... कुठे पाणी गळलं की ताडपत्री patch-up काम करायला लागायचं.
सगळेचजण गणपती साठी उत्साहाने काही ना काही कामात सहभागी होत, मोठी मुलं आणि माणसं वर्गणी जमवण्याच्या कामामध्ये पुढाकार घेत असत, कोणी सांस्कृतिक कार्यक्रम ठरवण्याच्या, मान्यवरांना पत्र पाठवणे, coordinate करणे कामात सहभागी होत. आम्ही सगळी लहान मुले खूप आधीपासून नाटकं, नाच, नाट्यछटा असं काहीतरी ठरवूंन त्याच्या practices मध्ये busy होत असू. आम्हाला guidance, direction पण चाळीतल्याच उत्साही मोठ्या माणसांचं मिळायचं. खूप मजेचे दिवस असायचे ....सगळ्यांचाच शाळा-कॉलेज-other activities-जॉब सांभाळून कसरत असायची. पण प्रचंड ऊर्जेने भारलेले दिवस असायचे ...
मग आवरणाच्या म्हणजे भाद्रपद द्वितीयेला चाळीत ज्या घरी गणपती बसतो त्यांच्याकडे पाहुणे यायला सुरवात झालेली असायची. आमच्याकडे गणपती काकूंकडे असायचा पण तरी आई ह्या दिवशी सगळं घर आवरून काढायची आणि आम्हाला पण नवीन कपडे घालायला सांगायची. आवरणाच्या दिवशी सगळ्या मुलींनी न्हायचे आणि नवीन कपडे घालायचे असा आमच्याकडे रिवाज असायचा. दुसऱ्या दिवशीच्या हरतालिकेच्या पूजेसाठी पत्री, फुलं आणि वाळू आणायला आई बाहेर पडायची. चाळीतल्या आजूबाजूच्या घरामध्ये पाहुणे यायला सुरवात झालेली असायची. सगळ्या चुलत घरांमधला गणपती बहुतेक वेळेला चाळीतल्या भावाकडे बसायचा आणि उपनगरांमध्ये राहणारे सगळे चाळीत गणपतीसाठी राहायला यायचे. मग २ खोल्यांचं घर अपुरं पडायचं. मग घरातली कॉट, मोठालं सामान गॅलरी मध्ये ठेवलं जायचं आणि मग पाहुणेही कधी कधी आजूबाजूला राहायला किंवा आंघोळीपुरतं यायचे. एकूण गणपती माहोल बनलेला असायचा. हरतालिकेसाठी आई आधीच आणून ठेवलेली वाळू 'समुद्रातून' आणली आहे असं 'शास्त्र' मला घेऊन (मी सगळ्यात लहान म्हणून) पूर्ण करायची म्हणजे एका बादलीत पाणी घेऊन त्या बदलीतल्या पाण्यातून ३ वेळा काढून ती ताम्हणात ठेवायची ....हे करत असताना आम्ही 'खडक फोडू मोती काढू निघा निघा गौराई गौराई' असं गाणं म्हणायचो. मग देवापाशी येऊन त्या ताम्हणातल्या वाळूचा 'महादेव' करायचा - शंकराची पिंडी आणि वाळूच्या सखी-पार्वती त्याच्या बाजूला बसवायच्या. आणि मग पत्री, फुलं वाहून मनोभावे महादेवाची पूजा साजरी व्हायची.आई अगदी निर्जळी उपास करायची ...मी आणि माझ्या बहिणी आमच्या त्या त्या वयाप्रमाणे कडक उपास किंवा एक वेळा फळं खाऊन किंवा एक वेळा साबुदाणा खिचडी खाऊन उपास करायचो.
हरतालिकेच्या दिवशी चाळीतल्या गणपतीचे आतले मखर पूर्ण करण्यासाठी सगळे जण बहुतेक वेळा खूप जागायचे आणि पहाटेपर्यंत मखर पूर्ण करायचे. आमच्या चाळीतला गणपती लोकमान्य टिळकांनी बसवला होता ... त्यामुळे आमच्या चाळीतल्या मखरामध्ये लो.टिळकांचा फोटो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो, वासुदेव बळवंत फडके आमच्या चाळीत येऊन भूमिगत झाले होते त्यामुळे त्यांचा फोटो असायचा आणि आतमध्ये गणपती मूर्तीच्या मागे मोठा आरसा लावलेला असायचा. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीला सगळे घरातलं आवरून गणपती आणायला जाण्यासाठी तयार व्हायचो बहुतेक वेळा बाबा-दादा आणि मुलं-मुली असे सगळे जायचो आणि आई घरी असायची. आई सकाळी महादेवाला दहीभाताचा नैवेद्य दाखवायची आणि आम्ही तो दहीभात प्रसाद म्हणून खाऊन गणपती आणायला जायचो. आमच्या चाळीतल्या गणपतीची मूर्ती खूप सुबक आणि शांत आहे. पूर्वापार एकच मूर्ती, तिची बांधणी आणि आकार ह्यात अजूनही कणभर फरक नाही. बाप्पा आणण्यासाठी आमच्या चाळीची स्वतःची 'ढकल' गाडी होती त्याला खाली चार चाक आणि वर सपाट प्लॅटफॉर्म आणि सजवायला चार बाजूंनी छोटे खांब होते. फुलांच्या माळांनी सजवलेल्या गाडीत बाप्पा विराजमान होताना त्याचं मुख मलमलच्या वस्त्रांनी झाकून ठेवण्याची रीत होती. वाजत-गाजत, बाप्पा मोरया च्या गजरात गणपती मिरवणुकीसह चाळीत आला की नवीन लग्न होऊन आलेल्या सुनांना गणपतीच्या पहिल्या दर्शनाचा आणि औक्षणाचा मान मिळायचा. बाप्पाच्या स्वागताप्रीत्यर्थ वेलची घातलेले साखरफुटाणे प्रसाद म्हणून सगळ्या चाळीला वाटले जायचे आणि मग सावकाश करंबेळकर गुरुजी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायचे. करंबेळकर गुरुजींच्या पिढ्यानपिढ्या बाप्पाची 'प्राणप्रतिष्ठा' आणि रोजच्या पूजेचे काम बघायचे. कदाचित ह्यात आता बदल झालेला असू शकेल. बाप्पाला दुपारचा नैवेद्य दाखवून झाला आणि जेवणं आपापली आटोपली की मग चाळीतली बहुतेक मुलं स्टेज घातलेला असायचा तिथेच झोपून जायची. आदल्या दिवशी जागून बाप्पाचं मखर केलेलं असल्यामुळे झोप तोपर्यंत अनावर झालेली असायची. संध्याकाळी दीड दिवसाच्या गणपती दर्शनासाठी आम्ही चाळीत आणि बाकी ओळखीचे, नातेवाईक असं निघायचो. प्रत्येक बाप्पा तितकाच देखणा, कधी मोदक खाऊन थोडा 'सुस्तावलेला' पण खूप गोड दिसायचा. प्रत्येक वर्षी बाप्पासाठी काहीना काही नवा दागिना करण्याची पण पद्धत खूप जणांकडे होती. आमच्या चाळीतल्या गणपतीला पण चांदीची छत्री, सोन्याचं जास्वदींचं फुलं, चांदीच्या दूर्वा, सोन्याचा मुकुट असा थाट होता. आमचा गणपती नवसाला पावतो असं म्हणायचे....नवस फळला की बाप्पाला असे दागिने करायचे चाळीतले लोकं. संध्याकाळी प्रसाद खाऊन पोट आधीच भरलेलं असायचं मग घरी आलं की थोडासा भात खाऊन लगेच चाळीतल्या गणपतीच्या आरतीसाठी आम्ही साधारण ९ वाजता खाली जायचो.
गणपतीत खूप वेगवेगळ्या आरत्या आमच्या चाळीत म्हटल्या जायच्या त्यात मला आवडणाऱ्या आरत्या म्हणजे बाप्पाची 'विघ्नांतक विघ्नेशा हे गजानना....', शंकराची 'जय जय त्रिबंकराज गिरीजा नाथा गंगाधरा ...', कृष्णाची 'चरणकमल ज्याचे अतिसुकुमार....', दशावताराची 'अंबऋषीकारणे हरीये ..... आरती सप्रेम हरीये जयजय विठ्ठल परब्रह्म...', आणि सगळ्यात आवडती आणि tongue-twisting आरती भुवनसुंदराची, 'पद्मसम पादयुग्म रंगा ओवाळणी कोटी भृंगा, नखमणी स्रवताहे गंगा ...', रामाची 'श्रीराम जय राम जय जय राम....भरत शत्रुघ्न दोघे चवऱ्या ढाळिती स्वर्गीहूनि देव पुष्पवृष्टी करिती .. ', विठ्ठलाची 'येई हो विठ्ठले ...', ज्ञानदेवांची 'आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा ....' आणि कितीतरी ....ह्या आरत्या रोज ज्या देवाचे महत्त्व असेल त्याप्रमाणे म्हटल्या जायच्या... मारुतीची आरती सुरु झाली की आरती पुस्तकात शोधेपर्यंत संपून पण जायची म्हणून मग आम्ही मुलं शक्यतो आरत्या पाठ म्हणता आल्या पाहिजेत असा दंडक स्वतःला घालून घ्यायचो ...आरतीला साथीसाठी झांजा, टोल, कधी ढोलकी असायची पण ज्या भक्तिभावाने आणि छान सुरांमधे म्हटली जायची त्याला तोड नाही ....मला अजूनही सगळ्या चाली पाठ आहेत. आरती झाली की मग 'धूपदीप झाला आता कर्पुरार्ती .... ' , मंत्रपुष्पांजली .... ती आपल्याला तोंडपाठ मोठ्याबरोबर त्यांच्या सुरात म्हणता आली म्हणजे आपण मोठे झालो असं वाटायचं ...आरतीनंतर प्रसाद वाटपाचं काम ज्यांच्या घरचा प्रसाद असेल ते दादा-ताई करत असत ... सगळ्या बायकांना हळदी-कुंकू लावून प्रसाद दिला जायचा ... प्रसादात कधी शेंगदाणे आणि खोबरं असं खमंग भाजून दाण्याचा चिवडा किंवा वाटली डाळ किंवा दाण्याची उसळ, साबुदाणा खिचडी, शिरा, उपमा, पोहे, पेढे असे काही पदार्थ असत.
गणपतीच्या दिवसांमध्ये दशमीला संध्याकाळी मंत्रजागर...वेद पठण, एकादशीला कीर्तन आणि द्वादशीला प्रवचन असा कार्यक्रम ठरलेला असायचा ....वेद पाठशाळेतले ब्राह्मण येऊन खूप छान सुरांत वेदमंत्रोच्चारण करायचे आणि सगळा परिसर एकदम पवित्र झाल्यासारखं वाटायचं, ह.भ.प. हरिभक्त परायण आफळेबुवा, मालगुंडकर बुवा, अप्पमरजनी बुवा, रामदासी बुवा किंवा अशाच जाणकार कीर्तनकारांचं कीर्तन ऐकायला पण छान वाटायचं ...पूर्वरंगामध्ये एखादा श्लोक आणि त्याच्या अनुषंगाने उत्तरार्धात त्याचा दृष्टांत/गोष्ट/प्रसंगवर्णन असा काहीसा ढाचा असायचा ....खूप लहानपणी कीर्तन फार कळायचं नाही पण पुढे ८-९वी नंतर त्यांत गोडी वाटायला लागली. प्रवचनासाठी पुंडशास्त्री, सु.ग.शेवडे किंवा सत्चिदानंद शेवडे, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे किंवा अजून अभ्यासू प्रवचनकारांची व्याख्यानं गणेशोत्सवात ऐकलेली आठवत आहेत. त्यानंतर मग कधी मराठी किंवा हिंदी वाद्यवृंद, किंवा मोठा पडदा लावून अमिताभ बच्चनचे कितीतरी सिनेमे आम्ही चाळीच्या पटांगणात जाजमावर बसून, लोळून बघितले आहेत.
चाळीतले कितीतरी जण पूर्ण १० दिवस सुट्टी घेऊन चाळीतल्या गणेशोत्सवाला वाहुन घेतलेले असायचे....बरेच वेळा सगळे जण आपण आता binge-watching करतो तसं binge कॅरम खेळायचे.....अगदी पहाटेपर्यंत त्यांच्या टुर्नामेंट्स चाललेल्या असायच्या.... गणेशोत्सवात वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या - तीन पायांची शर्यंत, चमचा-लिंबू, बटाटा शर्यत, संगीत खुर्ची, स्मरणशक्ती, हस्ताक्षर, दोरीच्या उड्या, एका अक्षरावरून अनेक शब्द…आणि त्याचा बक्षीस समारंभ सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी असायचा....
मध्ये रविवार असला की गणपती अथर्वशीर्षाची सहस्रावर्तनं, होम-हवन-याग, उकडीचे मोदक प्रसादाला आणि त्याच दिवशी चाळीचा महाप्रसाद...माहेरवाशिणींना आवर्जून आमंत्रण असायचं ....आणि सगळ्या जणी जमेल तसे त्या दिवशी हजेरी लावायच्या .....कुठलीही शुभ गोष्ट सगळ्यांना सांगण्यासाठी पण हा दिवस निवडला जायचा ...आमचं लग्न ठरलं तेव्हा राहुलला प्रसादाच्या दिवशी आईने बोलावलं होतं...
अनंत चतुर्दशीच्या जवळ जाणारे दिवस म्हणजे नाटका-नाचासाठीच्या रंगीत तालिमी, कपडेपटाची फायनल जुळणी, प्रत्येक नाच, नाटकासाठीच्या वेगवेगळ्या कॉस्च्युम्स, मेकअप, ऍक्सेसरीजच्या भरून तयार ठेवायच्या....अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी चाळीतल्या मुला-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम असायचे आणि रात्री आरतीनंतर १० वाजता सुरु झालेले कार्यक्रम सकाळी ४-५ वाजता संपायचे, त्यानंतर सगळे जण काहीतरी स्नॅक्स खाऊन झोपायला जायचो....
अनंत चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यांना घरचं कोणीतरी कायमचं सोडून जाणार आहे असं वाटायचं ...बाप्पापण खूप उदास दिसायचा....त्या दिवशी आरती ५ वाजताच सुरु व्हायची .... आरतीनंतर बाप्पाला गाऱ्हाणं घालून झालं की सगळेजण गोल करून फेर धरायचे आणि वेगवेगळ्या भजन, गाण्यांवर, ढोलकीवर, ज्ञानोबा-तुकाराम तालावर भोवंत्या व्हायच्या त्यात १-२ तास कसे निघून जायचे ते कळायचं नाही सगळे जण ह्या वर्षीच्या गणपतीची सेवा गोडं मानून घे म्हणत अनवाणी पायाने बाप्पाला निरोप द्यायला निघायचे ....ढकल गाडी खूप छान सजवून, टोल, झान्झा वाजवत ...'पुढच्या वर्षी लवकर या ....चैन पडेना आम्हाला...' म्हणत काही जण कोपऱ्यापर्यंत जायचे तर काही जण बाप्पाला चौपाटीपर्यंत जाऊन निरोप द्यायचे. मी फक्त १०० व्या वर्षी पूर्ण गेले होते आणि खूप छान विसर्जन यात्रा अनुभवली होती.....खूप वेगवेगळे गणपती गिरगांव चोपाटीला बाप्पा विसर्जनासाठी येतात आणि त्यांच्या मिरवणुकीपण खूप बघण्यासारख्या असतात .... तेंव्हा मी पहिल्यांदा लालबागचा राजा मिरवणूक गिरगांव चौपाटीच्या रस्त्यावर पाहिली होती....
चाळीच्या गणपतीच्या कौतुकात आम्ही इतके मग्न असायचो की बाप्पाला निरोप दिला की सगळे जण पुढचे कितीतरी दिवस पुढच्या वर्षीसाठी अजून काय करता येईल त्याच्या चर्चांमध्ये बाप्पाला शोधायचो ......ते दिवस खूप भारलेले होते आणि टीमवर्कचं उत्कृष्ट उदाहरण होतं ....
© कविता सराफ
१८ सप्टेंबर, २०२३
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations