Kavita's Kaleidoscope
ती
Her / She
POETRY
Kavita Saraf
5/30/20201 min read

ती
ती म्हणजे ...पहिला हुंकार ?
पहिलं हसू ....पहिला आसू ?
पहिलं पाऊल....पहिला आनंद
पहिली मैत्रीण ...पहिली शाळा
पहिलं भांडण ...पहिली समेट
पहिलं एकटं शाळेत जाणं-येणं
पहिली जाणीव ....पहिली नेणीव
पहिलं बक्षीस ... पहिला अपमान
पहिला पराभव ...पहिली बोच
पहिला प्रवास ....पहिलं आकाश
पहिली जाणीव मुलगी असल्याची
सुरक्षित कोषात पण सजग
पहिलं ध्येय ...पहिलं साध्य
पहिलं यश .. ..पहिलं अपयश
पहिलं दुःख ...पहिलं सावरणं
पहिलं वळण ... पहिली श्रद्धा
पहिली रिस्क ...पहिली उडी
पहिला आत्मविश्वास
पहिली ओळख ... पहिलं प्रेम
पहिला सहवास.. पहिला विश्वास
पहिलं घर ...पहिलं कर्ज
पहिली वेळ ....पहिलं बाळ
पहिली जाणीव परिपूर्णतेची
पहिली निराशा.... पहिली आशा
पहिली घुसमट ...पहिली निरगाठ
पहिलं दुर्लक्ष ... पहिला मोकळा श्वास
पहिला निर्णय ...पहिली निभावून न्यायची वेळ
पहिला त्याग .... पहिली पोकळी
पहिली बरोबरी ....पहिली समानतेची जाणीव
पहिली पुनर्भेट ... पहिलं स्वप्न
पहिली स्वतःला अजमावण्यासाठी केलेली आटाआटी
पहिली स्वतःला सिद्ध करण्याची गरज
पहिलं समाधान ... पहिलं गुणनिधान
पहिली अलिप्तता ... पहिली शांतता
आणि मग निरंतर प्रवास .....
कधी टोकदार ...कधी बाणेदार
कधी अट्टाहास …कधी समजूतदार
कधी मुग्ध .... कधी आर्त
जाणिवांचा पोत शाबूत ठेवणारी
अनुभवांतून शहाणी होणारी....
तरीही वेडेपणा करणारी...
समृद्ध व्हायची धडपड असणारी ...
तुमच्यामाझ्यातलीच एक....
अथपासून .... ईतिपर्यंत कळण्याची
ईच्छा बाळगलेली ...आणि
दशांगुळे उरणारी ती....
शक्ती...ऊर्जा..
अनादी अनंत ..
© कविता सराफ
May 30th 2020
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations