Kavita's Kaleidoscope
Letter to Mai
Letter to Mai
KRUTADNYATA
Kavita Saraf
5/19/20171 min read

प्रि य माई ,
MBA Graduation नंतर ज्यांच्यामुळे हे शि क्ष ण पूर्ण करू शकले त्यांना मी THANK YOU आणि मागे वळून बघताना पत्र लिहिली आहेत, तुला लिहिल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होणार नाही. मी कुठलाही निर्णय घेतला तरी तू आणि ताई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहात आणि म्हणूनच मी इथवर येऊन पोहोचले आहे. लहानपणापासून तू माझ्यासाठी खूप प्रेमळ बहीण आहेस, मी तुला तू सगळ्यांना मदत करताना बघितले आहे. मला आठवतं आहे मी शनिवारी तुझ्या हातून वरणभात खाऊन शाळेत जायचे, तुझ्या मांडीत बसण्यासाठी रडायचे आणि तू माझ प्रेमाने सगळं करायचीस. आपल्याला आई दादांनी खूप लाडात वाढवले पण दादांना voluntary retirement घ्यावी लागली आणि काही काळ आपल्यासाठी खूप कठीण होता. पण तुला सगळ्यात आधी जॉब मिळाला आणि आई दादांचं tension उतरलं, तुला दादा नेहेमी माझा मुलगा आहे असं म्हणायचे पण मला वाटतं आई दादांनी आपल्याला चांगल माणूस म्हणून घडवलं. तू पण आपल्या घरासाठी इतक केल आहेस कि त्याची कधीही भरपाई होऊ शकणार नाही. माझ college शिक्षण सुरु असताना मला काही अभ्यासाचं साहित्य लागले तरी तू लगेच त्यासाठी पॆसे द्यायचीस, मी ट्रेकिंग साठी गेले होते तेव्हा तू स्वतः न येता माझ्या ट्रिपसाठी पैसे दिले होतेस आणि आई एकटी राहील म्हणून तू ट्रीपला येणं टाळलं होतस. दादा गेल्यानंतर तू दर आठवड्यात येऊन आईला माझ्यासाठी स्थळ शोधायला मदत केलीस, स्वतःच्या मुलीसारखं माझ्यासाठी तन, मन आणि धनाने सगळं केलस.
तू हुशार नाहीस असा तुला गंड होता, पण आपल्याकडच्या फक्त शिक्षण पद्धतीवरून हुशारी ठरवण्याच्या चुकीच्या सवयीचा परिणाम आहे हा. तू नेटाने तुझ शिक्षण जॉब करत असताना पूर्ण केलस आणि सगळ्यांशी गोड वागून माणसं जमवलीस. आपल्या तिघींमध्ये तू सगळ्यात हुशार आहेस ह्या बाबतीत. सिद्धेश पण खूप हुशार आणि गोड मुलगा आहे तुझयासारखाच.
मी जे करीन ते बरोबरच असेल असं तुला नेहेमी वाटतं आणि त्यासाठी तू मला नेहेमी प्रोत्साहन दिले आहेस. आतासुद्धा तुम्हा दोघींचा पाठिंबा नसता तर USA मध्ये राहणे, job करून मुलींना बघणं आणि हे शिक्षण पूर्ण करणं जमवू शकले नसते. आपण तिघी नेहेमी एकमेकांबरोबर बोलून सगळे ठरवतो त्याचा मला खूप फायदा झाला आहे. आई दादांनी आपला चांगला काळ बघितला नाही ते दोघेही लवकर गेल्यामुळे. पण त्यांना नक्कीच समाधान असेल की आपण तिघी एकत्र आहोत. तुम्हा सगळ्यांना USA ट्रिप करता आली तेव्हा मला जाणवले की आई आणि दादांनी पण आपल्या माध्यमातून सगळे अनुभवले आहे.
आतासुद्धा माझ्या शिक्षणामुळे तू सिद्धेशची मुंज १ वर्ष पुढे ढकललीस आणि तुम्हा दोघीना खात्री होती की मी नक्क्कीच येण्याचे जमवीन त्यावरून आपलं बॉण्डिंग किती घट्ट आहे हे फक्त आपल्याला माहित आहे. मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी आणि ताईसारखी बहीण आहे.
कविता
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations