brown wooden sticks with white smoke

तेज

Radiance

चिंतन

Kavita Saraf

9/11/20251 min read

तेज

पंचमहाभूतांमधलं तिसरं तत्त्व तेज..... तेज म्हटलं की मला ग.दि माडगूळकरांचं गीतरामायणातलं ..."पुत्र सांगती चरित्र पित्याचे, ज्योतीने 'तेजाची' आरती, कुश-लव रामायण गाती...." हेच आधी आठवलं... आणि सौम्य-शीतल रामचंद्रांचा उल्लेख 'तेज' म्हणून व्हावा ह्याचं अप्रूपही वाटलं कारण माडगूळकरांना सगुण-साकारापासून पुढे जाऊन विष्णुतत्त्वाचा निर्गुण निराकार म्हणून विचार केला पाहिजे असं अभिप्रेत असावं कदाचित... परब्रह्माचा निर्गुण निराकार प्रत्यय म्हणजेच तेज. मूलाधारापासून ....सहस्रारापर्यंतचा प्रवासही असाच स्थूलाकडून सूक्ष्माकडे , सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारा आहे. हेच 'तेज' आपल्या मणिपूरचक्रातून जेव्हा बोलतं तेव्हा आपण 'परा' वाणीतून बोलतो आणि ते 'ब्रह्मवाक्य' असतं. वैखरी वाणीतून जे बाहेर पडतं त्याचा प्रवास परा, पश्यन्ति आणि मध्यमा असा आधीच झालेला असतो. ह्या चक्राला Solar Plexus म्हणतात म्हणजेच अग्नि/तेज/प्रकाश/उष्णता जिथून प्रवाहित होते ते स्थान. ह्याच अग्निचा आपल्या पचनाशी (literally & figuratively) संबंध आहे ... म्हणजेच आपण काय-न-काय पचवल्यानंतर/अनुभवल्यानंतर, आपल्या स्वानुभवाचं तेजच परावाणीतून बोलतं... हे सगळं किती logical आहे...!!

प्राचीन काळापासून आपण सगळे सनातनी, ह्या पंचमहाभूतांचे आद्य पूजक आहोत. विशेषतः मंत्रोच्चारांद्वारे आपल्या ऋषीमुनींनी तेज/अग्नि देवतेला यज्ञांमध्ये आवाहन करून आहुती दिल्या आहेत आणि लोककल्याणाच्या विविध क्षमता आत्मसात केल्या आहेत. आजही कित्येक घराघरांतून 'अग्निहोत्र' केलं जातं आणि हीच तेजाची 'अग्निदेवता' सगळी नकारात्मता नष्ट करून पावित्र्य आणि मांगल्य पसरवते असा आपला पूर्वापार अनुभव आहे. नवरात्रातले अष्टमीचे होम-हवनही, ऊर्जेने ऊर्जेचं पूजन ह्याच भावनेने केले जातात. काहीही नवीन शिकताना आपण 'ॐ सहानववतु ...' प्रार्थना करतो त्यातही आपण आपला अभ्यास 'तेजस्वी' illuminating, सत्याकडे नेणारा आणि 'उपयोगी' व्हावा अशीच ईच्छा व्यक्त करतो. ऋग्वेदाची सुरवातच 'अग्निमीळे पुरोहितं ...' म्हणजेच ह्याच तेजाच्या स्तुतीने होते. मला तर असं वाटतं की जेव्हा ह्या द्रष्ट्या ऋषींना वेद ध्यानातून 'दिसले' तेव्हाही त्यांना आधी तेजाची अनुभूती झाली असेल आणि मग वेदाक्षरे सुचली असतील ... आपल्याला पण साधं काही कळलं की लक्ख प्रकाश आधी दिसतो आणि मग actual realization असाच क्रम असतो ह्यावर माझा ठाम विश्वास आहे..

बृहदारण्यक उपनिषदांमधला 'पवमान मंत्र' उमजण्यासाठी तर आयुष्य अपूर्ण आहे... 'असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माSमृतं गमय '. इतकी उदात्त शिकवण आपल्या उपनिषदांनी दिली आहे, त्याचा मराठीतला अर्थ 'असत्य सोडून सत्याची कास धरावी, कुठलाही अज्ञान अंधःकार नाहीसा होऊन तिथे ज्ञानाचा प्रकाश पडावा आणि मृत्यूचं रूपांतर अमृतात म्हणजेच अशाश्वताचं शाश्वतात रूपान्तर व्हावं'. मला वाटतं ह्यावरूनच बेतलेलं गाणं, मी लहान असताना दूरदर्शनवर बहुधा 'ज्ञानदीप' कार्यक्रमाआधी लागायचं ... 'ज्ञानज्योती तेवत्या ठेवा जिथे अंधार आहे, उजळू द्या अंधारलेली रात्र ही वैरीण आहे'... त्याच काळात 'गोट्या' मालिकेतलं शीर्षक गीतही ह्याच स्वरूपाचं होतं ... 'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, जसे रुजावे बी बियाणे माळरानी परसात ....... हवी अंधारल्या राती चंद्रकिरणांची साथ......' इथेही पंचमहाभूतांचा उल्लेख आला आहे. आपल्या रोजच्या जगण्यासाठी ही पंचमहाभूतं किती महत्वाची भूमिका बजावतात ते असं लिहायला बसलं की प्रकर्षाने जाणवतं आणि ही पण आपण एक प्रकारे केलेली मानसपूजाच आहे असं वाटतं मला.

तेजाचा संदर्भ नेहेमी डोळ्यातलं, बुद्धिमत्तेचं, त्यागाचं, समर्पणाचं तेज असाच दिला जातो पण मला ते, 'प्रगटीकरण' असतं, एखाद्याचं स्वानुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघण्याचं किंवा उपजत ठायी असलेल्या आगीचं, असं वाटतं. तसंच आपला aura हाही आपल्यामध्ये असलेल्या तेजाचं प्रतिबिंब आहे असं वाटतं मला. आम्हांला दहावीतले एक सर नेहेमी चांगला अभ्यास करून मोठे होण्यासाठी सांगायचे तेव्हा 'एकच तारा समोर आणि पायतळी अंगार' .... ह्या कवितेचा उपयोग करायचे आणि ते १००% पटायचं. कुठलही ध्येय गाठण्यासाठी मला वाटतं अशी मनात आग लागल्याशिवाय प्रयत्न केले जात नाहीत ... म्हणूनच English मध्येही 'fire in the belly' अशीच म्हण वापरली जाते.

ह्या तेजाचं महत्व आपल्याला रोज जाणवावं म्हणून सूर्य-चंद्र नेमले आहेत असंच वाटतं मला...उत्सवप्रिय असलेले आपण म्हणूनच सूर्याचं उत्तरायण-दक्षिणायन आणि मकर राशीतलं संक्रमण, रथसप्तमी, चंद्राची प्रत्येक कला आणि पौर्णिमा साजरी करतो. वर्षाकाठी हे तेज आपल्यामध्येही वृद्धिंगत व्हावं म्हणून आपण तेजाचा सगळ्यात मोठा उत्सव 'दिवाळी' साजरा करतो.

कविता सराफ

©११ सप्टेंबर २०२५