Kavita's Kaleidoscope
।। श्रीराम ।।
ShreeRam
चिंतन
Kavita Saraf
8/1/20261 min read

।। श्रीराम ।।
गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरवात कडुनिंबाच्या पाना-फुलांची ओवा, जिरं आणि मिर चिंच-गुळात कालवलेली चाटणाने व्हायची ....आधी आवडायचं नाही ते कडुशार चाटण .... पण नंतर कधीतरी आवडायला लागलं .... सुंदर गुढी उभारल्यानंतर, देवाला आणि घरातल्या मोठ्यांना नमस्कार, गुढीला नमस्कार ..... साडेतीन मुहुर्तातला एक असल्यामुळे प्रत्येक विषयाचा थोडा तरी अभ्यास झाला पाहिजे असा आईचा आग्रह आणि मी तो करते आहे की नाही ह्याकडे ताईची बारीक नजर .... खूप कंटाळा यायचा सणाच्या दिवशी अभ्यास करायचा .....पण श्रीखंड-पुरी-आंबेडाळ-बटाटाभाजी ह्यावर ताव मारायचा असल्यामुळे ही त्याची 'फीच' आहे असा समज करून मी कसातरी अभ्यास करून टाकायचे .....आता आठवत की मी लहान असताना नववर्ष मिरवणूक वगैरे प्रकार अजून सुरु झाले नव्हते ..... दुपारी झोपून उठल्यानंतर नवीन कपडे घालून रामाच्या देवळात जाऊन 'रामरक्षा' आता संध्याकाळपासून रोज रामननवमी पर्यंत म्हणू असं promise करून यायचो ..... अर्थ कळत नसताना पाठ केलेली 'रामरक्षा' म्हणून आपण फार 'मोठा तीर' मारला आहे असं वाटायचं मला .....नंतर अश्विनी .... माझी लहानपणापासूनची शेजारी-मैत्रीण-एकाच वर्गातली... तिच्या आजोबानी अर्थ समजावून सांगितला आणि वाटलं की वाल्याचा वाल्मिकी होण्याचा प्रवास किती थक्क करणारा आहे आणि हे महाकाव्य लिहिणारा वाल्मिकी आणि 'आदर्श' असा राम आपल्याला कळला तर ?
श्रीरामनवमीपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी सुरु झालेली असायची .... त्यामुळे नेहेमी रामजन्माचं कीर्तन ऐकायला आणि दुपारी १२ वाजता 'रामबाळा' ला पाळण्यात घालून झोके द्यायला आम्ही धसवाडीच्या राममंदिरात जायचो ....सुरंगी-मोगरा-निशिगंधाच्या हारांनी सजलेले 'राम-लक्ष्मण-जानकी-हनुमान' इतके मनमोहक-साजिरे दिसायचे की ह्यांची दृष्ट काढायला आत्ता ह्याक्षणी 'कौसल्या' माता परत खाली येईल धरतीवर असं वाटायचं मला.... मग तिथेच प्रसादाचं जेवण आणि सुंठवड्याचा प्रसाद ..... दुपारी घरी गेल्यानंतर आई कैरीचं पन्हं प्यायला द्यायची ..... मस्त गाभुळलेल्या कैरीचे त्या season मधलं पहिलं पन्हं.... रामनवमीच्या दिवशीच व्हायचं .... आंबेडाळ गुढीपाडवा आणि रामनवमी म्हणजे पन्हं असं आमच्याकडे ठरलेलं असायचं .... आई उकडलेल्या कैऱ्यांचा निगुतीने गर काढून, हलक्या हाताने फेटून....कधीच mixer वापरायची नाही त्यासाठी....कारण तो गर खूप छान लागतो, साखर आणि थोडा गूळ.... जिरं पावडर, वेलची पूड, केशरकाड्या घालून रामाला नैवेद्य दाखवायची .... 'राम' तिचं पन्हं प्यायला नक्की येत असणार ह्याबद्दल बहुतेक तिला खात्री होती.... मग कधी-कधी गप्पा मारताना मी विचारायचे आई तू म्हणतेस की आंबा खूप खाऊ नये पण पन्हं पिताना तसं म्हणत नाहीस ... तर ती सांगायची की कैरी थंड पण आंबा उष्ण ...तसंच वेलची थंड पण केशर उष्ण .... आता कळतं की अशी comparison सांगून तिनं किती सोपे-सोपे धडे दिले आहेत .... आणि कोणती गोष्ट किती प्रमाणात करायची ह्याचा आमचा अंदाज पक्का केला आहे ..... संध्याकाळी काळा राम आणि मग गोरा राम ह्यांचे दर्शन ....
राम लहानपणापासून रोज भेटत होता ... झोपताना 'गोष्ट मला सांग आई रामाची, वेळ माझी झाली आता झोपेची ... ',
थोड मोठं झाल्यावर ...'आकाश पांघरोनी जग शांत झोपले ग .... घेऊन एकतारी, गातो कबीर दोहे ....'
नंतर शाळेत आम्ही 'राम' ला संस्कृत मध्ये चालवले होते ... धातू चालवणे अशी संज्ञा होती....
मग रामायण serial सुरु झाली आणि आवडायला लागली .... 'रामाचं लग्न' आमच्या नवीन color TV वर पाहायला आजूबाजूच्या घरातून सगळे आले होते ...रिमोट ने advertisements ना आवाज mute (किती अप्रूप होतं तेव्हा रिमोटचं !!!) करून मध्ये चहा आणि फराळ केला होता ...
दादांनी music system आणली आणि आईला गीतरामायणाचा सेट gift केला होता ....... आईला गदिमा, सुधीर फडके आणि माणिक बाई ह्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता.... मग नागपूरला हे सगळे गीतरामायणाच्या live program साठी आले होते तेव्हा माणिकबाई किती गोड़ दिसत होत्या आणि सुधीर फडक्यांचा आवाज ... 'स्वये श्रीरामप्रभू ऐकती... कुशलव रामायण गाती..... ' ह्या गाण्याला आणि विश्वामित्र जेव्हा '.... मार ही त्राटिका रामचंद्रा ...' सांगतात तेव्हा त्या गाण्याला कसा बदलतो ह्याबद्दल सांगायची ....
आज रामनवमी म्हटल्यानंतर हे सगळं आठवलं ....लहानपणापासून राम 'कळावा' असं वाटतं पण अजूनही मला रामाचा आदर्शवाद कळत नाही .... बहुतेक 'राम' समजून घेणं खूप अवघड आहे .... इतका आदर्श? ...संयमी ? की तू वनात जा म्हटलं आणि निघाला?.... एका क्षणी असं वाटलं नाही की आत्ताच गुरुगृहातून परत आलो आहे.... लग्न झालं आहे.... तुम्हीच 'युवराज' म्हणून घोषणा केली आहे.... पण मी हा 'माणूस' म्हणून विचार करते आहे आणि राम तर 'भगीरथाचा' वंशज आहे..... त्याच्या रक्तरेखेतच (bloodline) मध्येच 'परोपकार' आहे..... तीच त्याची 'इतिकर्तव्यता' आहे .... मग म्हणून 'सीतेला' रामाशी लग्न करून काय मिळालं हा विचार फारच क्षुद्र आहे .... फक्त 'सीताराम' हेअद्वैत समजून घेतलं की तेवढं पुरेसं आहे ?
रामाने प्रत्येक नातं किती आदर्श निभावलं ? मुलगा, भाऊ, शिष्य, युवराज, नवरा, मित्र, राजा, स्वामी ..... रामदास स्वामींना 'रामातच' गुरु मिळाला .... आता वाटतं राम ही एक 'मानसिकता' आहे ..... जसं कृष्णाने फक्त 'कर्म' करा त्यात अडकू नका असं सांगितलं तसं राम म्हणतो की आधी तुमच 'कर्तव्य' काय आहे ते जाणून घ्या आणि त्यानुसार कर्म केलं .... तर अडकण्याचा प्रश्नच येणार नाही .....? दोघांनी एकच सांगितलं...... पण ते कळायला उभं आयुष्य अपुरं आहे .... कधीतरी नक्की कळेल 'राम' म्हणजे काय ते .... तोपर्यंत कशात तरी 'राम' शोधला पाहिजे ......
© कविता सराफ
२१-०४-२०२१
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations