Colorful marble statues of lord rama, lakshmana, and sita.

श्रीराम पुन्हा

ShreeRamAgain

चिंतन

Kavita Saraf

12/17/20241 min read

श्रीराम

मागे एकदा रामनवमीला श्रीरामावर लिहिलं होतं .... तेव्हा रामाच्या आदर्श वागण्यामुळे सीतेवर अन्याय झाला आहे असं वाटत होतं आणि तगमग होत होती. पण खरं समजून घेण्याची समज, परीपक्वता, ज्ञान आणि मुख्य म्हणजे वेळ, हे सगळं जुळून यायला लागतं असं म्हणतात त्याप्रमाणे भागवत पुराण बघता बघता बरीच कोडी उलगडली....

कुशध्वज राजाची मुलगी वेदवती हिने कठोर तपस्या करून भगवान विष्णूंना प्रसन्न केलं आणि त्यांची पत्नी होण्याचा वर मागितला. तिच्या तपस्येवर खुश होऊन विष्णूंनी एका अवतारात ही ईच्छा पूर्ण होईल असं वचन वेदवतीला दिलं आणि पुन्हा साधनेत मग्न राहण्यात सांगितले.

पुढे एकदा रावण पुष्पक विमानातून विहार करत असताना रावणाला एका भव्य वटवृक्षाखाली एक अत्यंत रूपवती आणि तेजस्वी मुलगी तप करत असलेली दिसते आणि तो तिच्यावर लुब्ध होतो. तिला मिळवण्याची लालसा त्याच्यात निर्माण होते आणि तो तिच्या भोवती असलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या बाजूला करून तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, वटवृक्ष वेदवतीची आपल्या मुलीसारखी काळजी घेत असतो त्यामुळे वटवृक्ष रावणाला विरोध करतो पण तरीही वटवृक्षाच्या फांद्या-पारंब्या छाटून वेदवतीला स्पर्श करण्याच्या प्रयत्नांत तिची तपस्या भंग पावते. त्यामुळे क्रोधीत झालेली वेदवती रावणाला शाप देते की ती त्याच्या विनाशाचं कारण ठरेल....

पुढे सीताहरणाच्या वेळी सीतेला म्हणजेच लक्ष्मी मातेला रावणाचा स्पर्श होऊ नये म्हणून वेदवती अग्नितून सुलाखून सीतेचं रूप घेऊन बाहेर येते आणि सीता वैकुंठात साधना करायला जाते आणि रावण वेदवती-सीता हरण करतो. पण तिला पूढे अशोक वनात तो स्पर्शही करू शकत नाही आणि वेदवती-सीता रावणाच्या वधाला कारणीभूत होते. त्यानंतर अग्निपरीक्षेच्या वेळी वेदवती अग्निपरीक्षा देते आणि सीतामातेला प्रगट होण्याची विनंती करते म्हणजे सीता रामाबरोबर अयोध्येला परत जाऊ शकेल. पण तेव्हा सीतामाता, वेदवतीला रामाबरोबर पत्नी म्हणून २ दिवस मिळावेत म्हणून प्रगट होत नाही आणि वेदवती रामाबरोबर अयोध्येसाठी मार्गक्रमण करते. पुढे प्रयागस्थळी वेदवती-सीतेला प्रभू रामचंद्र स्नान करण्यास सांगतात आणि तेव्हा सीता वैकुंठातून येऊन वेदवती-सीता अदलाबदल होते आणि वेदवतीची विष्णूंची पत्नी होण्याची ईच्छा अशा तऱ्हेने विष्णू आणि लक्ष्मी दोघेही पूर्ण करतात. किती विलक्षण आहे हे..सीतामाता आणि प्रभू रामचंद्र अयोध्येला आनंदात परत येतात. प्रभू रामचंद्रांच्या-विष्णूंच्या कृपेमुळे हे घडलं असल्याने त्यांनी कधीही सीता मातेवर अविश्वास दाखवला नाही ...

पण ही गोष्टच माहित नसल्यामुळे रामांनी सीतेवर अन्याय केला आहे असंच वाटत राहीलं.... जे खूप चुकीचं झालं....प्रभू रामचंद्र त्याबद्दल मला क्षमा करोत.

अजून एक चूक म्हणजे कैकेयी दुष्ट ठरवली जाते पण तिच्यामुळे प्रभू अयोध्येबाहेर पडून असुरांचा संहार करू शकले आणि त्यांना हे सांगण्याची शक्ती फक्त तिच्यात होती. त्यामुळे राम अयोध्येत परत येतात तेव्हा कैकेयी त्यांना भेटायला सामोरी जात नाही कारण सगळे लोक तिची निर्भत्सना करत असतात पण प्रभूराम, सीतामाता आणि लक्ष्मण कैकेयीला भेटायला तिच्या महालात जातात आणि तिला सांगतात की आई मी तू दिलेलं काम पूर्ण करून आलो आहे. तेव्हा ती त्यांना म्हणते की तुला हे सगळं माहित होतं ? आणि ते स्मित हास्य करून आईला कुशीत घेतात. चौदा वर्ष काळकोठडीत राहिलेल्या मंथरेचीही ते सुटका करतात. म्हणूनच राम विलक्षण आदर्श पुत्र आहेत.

पुढे अयोध्येत रामांना राज्याभिषेक होताना राम सिंहासनावर विराजमान होण्यासाठी आधी सीतामातेला पुढे जाण्यास सांगतात आणि सीतामातेला खुप अवघडल्यासारखं होतं. ती त्यांना विचारते की हा त्यांचा मान असताना त्यांनी तिला का पुढे जाण्यास सांगितलं? तेव्हा ते तिला विचारतात की लग्नात सप्तपदीच्या वेळी त्यांनी ७ फेरे कसे पूर्ण केले होते? तेव्हा सीतामाई सांगतात की पहिले ४ फेरे श्रीराम प्रभू पुढे होते आणि नंतरचे ३ फेरे त्या पुढे होत्या. तेव्हा ते हसून सांगतात की त्यांचे ह्या अवतारातले ४ फेरे रावण वधाच्या वेळीच पूर्ण झाले. आता रामायण संपून सीतायन सुरु झालं आहे आणि ह्यापुढे सीतामाईने प्रत्येक वेळी रामचंद्रांच्या पुढे पाऊल टाकलं पाहिजे. पती आणि पत्नी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत आणि दोन्ही समान आहेत. तेव्हा सीतामाई 'आपलं पाऊल' पुढे टाकून सिंहासनावर आरूढ होतात. भर सभेत हे सांगितल्यामुळे सगळ्या प्रजाजनांनाही रामचंद्र आदर्श पती आहेत ह्याबद्दल कौतुक वाटते.

राज्याचा कारभार कसा चालला आहे त्याबद्दल प्रजाजनाकंडून वेषांतर करून रामचंद्र माहिती करून घेत असतात तेव्हा त्यांना एका ठीकाणी असं दिसतं की एका जोडप्यातल्या पत्नीला, ती बाहेर गेली असतांना घरी यायला उशीर होतो आणि ती घाईघाईने घरी परत येत असते तेव्हा तिचा पती तिच्यावर चिडतो. तिला उद्देशून तो म्हणतो ..."तुला काय वाटलं की मी प्रभू रामचंद्रांसारखा आदर्श पती आहे म्हणून तू केव्हाव्ही घरी आलेलं मला चालेलं? ... रावणाकडून आलेली सीतामाई त्यांना चालेलं पण म्हणून मी ते खपवून घेणार नाही ..." हे ऐकून साहजिकच रामचंद्रांना वाईट वाटतं आणि ते राजवाड्यात परत येतात ... तेव्हा सीतामाई त्यांना म्हणतात की मला सगळं माहीत आहे....(त्याही वेषांतर करून गेलेल्या असतात). तुम्ही मागे म्हणाला होतात तशी आता माझी पाळी आहे 'दुसरं पाऊल' पुढे टाकण्याची त्याबद्दल मला आज्ञा द्या. मी वनवासात जाऊन राहते तेव्हा रामचंद्र त्यांना म्हणतात की तू आता आई होणार आहेस तेव्हा हे करण्याची आज्ञा मी तुला नाही देऊ शकतं. तेव्हा त्या त्यांना समजावतात की आता त्यांची वेळ सुरु झाली आहे आणि त्याही रामचंद्रांच्या आदर्श पत्नी आहेत. नाईलाजाने रामचंद्र हे सहन करतात आणि सीतामाई वाल्मिकी आश्रमात जाऊन राहतात.

नंतर महर्षी वाल्मिकींच्या आश्रमांत लव-कुश ह्यांचा जन्म होऊन ते वाल्मिकींकडून मोठं होत असताना रामायण ऐकतात आणि एक दिवस दोघेंही रामचंद्र सभेत रामायण गायन करतात. तेव्हा ती तेजस्वी बालके बघून सभेत कूजबूज होते की कोणाची आहेत ही तेजस्वी बाळे ? पुढे वाल्मिकी ऋषींबरोबर सीतामाई सभेत येतात आणि सगळ्यांना सांगतात की कुश-लव ही प्रभू रामचंद्र आणि त्यांची बाळे आहेत जी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वाढली आहेत. परत एकदा प्रजाजनांचा अविश्वास पाहून सीतामाई दुःखी होतात. सभेत त्या सांगतात की एखादी स्त्री परत परत जेव्हा ह्या प्रसंगांना सामोरी जाते तेव्हा ते कष्टदायी आहे आणि आता त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. आणि त्या 'तिसरं पाऊल' धरणीमाते मला पोटात घे असं म्हणून उचलतात आणि धरणीमाता त्यांना आपल्यात सामावून घेते.

ही वेदवती आणि ३ पाउलांची अत्यंत करुण गोष्ट जी मला आधी माहित नव्हती ....

विलक्षण आदर्श प्रभू रामचंद्र आणि तितक्याच आदर्श सीतामाई !!!

© कविता सराफ

डिसेंबर २०२४