Kavita's Kaleidoscope
श्रेष्ठत्व की पूरकत्व ?
Superiority or Complementarity
चिंतन
Kavita Saraf
8/1/20261 min read

श्रेष्ठत्व की पूरकत्व ?
खूप दिवसांपासून लिहायचं होतं ह्या विषयावर पण वेळ मिळत नव्हता ....
बऱ्याचदा आपण हा विषय लग्न जमवताना किंवा त्या अनुषंगाने बोलतो ....आणि मग नेहेमीचेच संवाद ..... 'संसार रथाची दोन सारखी चाकं', 'compromise कोणाला तरी करावंच लागतं', 'एकाने रागावलं कि दुसऱ्याने शांत राह्यचं' ..... 'बाईच्या जातीला 'जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ असायला हवा'. 'स्वभाव म्हणून सोडून द्यावं' .... असं आणि कितीतरी ऐकतो..... माझं लग्न अगदी 'ठरवून' झाल्यामुळे हे मी आईकडून खूप वेळेला ऐकलं .... सुदैवाने मात्र लग्न झाल्यानंतर हे कधीही ऐकावं लागलं नाही. माझ्या सासरकडची सगळी मंडळी आधुनिक विचारांची असल्यामुळे आणि मुख्य म्हणजे राहुल खूप समजूतदार आणि आम्ही एकमेकांना 'पूरक' असल्यामुळे असे प्रसंग माझ्यावर आले नाहीत.
आता खोलवर विचार केला की असं जाणवतं की आपल्या जडण-घडणी मध्ये ह्याचं मूळ सामावलं आहे .... लहानपणापासून आपल्यावर जर संस्कार झाले असतील की 'श्रेष्ठत्व' हे क्षणिक आणि सापेक्ष आहे, 'श्रेष्ठ' असण्यापेक्षा आपण 'पूरक' आहोत का? हा विचार केला पाहिजे तर हा विषय आपल्यासाठी वाटतो तितका अवघड नाही. माझे आजोबा नेहेमी मेणबत्तीचं उदाहरण द्यायचे आणि एक वाक्य सांगायचे असं आई म्हणायची 'स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास'.....ह्यातला मेणबत्तीचा स्वतःला संपवून घेण्याचा भाग सोडला तर मला ह्या उदाहरणामागची आजोबांची मानसिकता कळायची असं वाटतं. बहुतेक त्यांना - आपण माणूस म्हणून परिपूर्ण/उन्नत व्हायला हवं आणि आपलं ध्येय आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याबरोबरच आपल्या अवतीभवतीच्या व्यक्तींचा पण विकास होण्यासाठी साहाय्य ठरलं पाहिजे, असं सांगायचं असावं. आपण एक 'व्यक्ती' म्हणून आपल्यावर असे संस्कार झाले असतील तर त्या अनुषंगाने वागणं आणि सराव शक्य आहे.
मी मोठी होत असताना कितीतरी कुटुंबांमध्ये मुलगा म्हणून वेगळी वागणूक,अपेक्षा आणि संस्कार आणि मुलगी म्हणून वेगळी वागणूक,अपेक्षा आणि संस्कार असं बघितलं आहे. बऱ्याचदा मुलगे हे वंशाचा दिवा .....पुढील पिढीचा दुवा ... म्हणून डोक्यावर बसवले जातात आणि श्रेष्ठत्वाची भावना मूळ धरू लागते. तसे तर आणखीही कितीतरी अंगानी सामाजिक स्थान, आर्थिक दर्जा, पिढीजात वारसा, शिक्षण,स्वबळावर पुढे येणं ....आणि बरचं कांहीसुद्धा ही श्रेष्ठत्वाची भावना रुजण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणूनच फक्त मुलांमध्ये ही भावना असते आणि मुलींमध्ये नसते असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण ही श्रेष्ठत्वाची भावना मात्र आजूबाजूला नक्की दिसते पण पूरकत्वाची भावना खूप कमी वेळा दिसून येते.
आदीम काळापासून समूहात राहून माणसांनी आपल्या उणिवा एकमेकांच्या साहाय्याने समूहात राहून पूर्ण केल्या ....पूढे लग्नसंस्था/कुटुंब अशा व्यवस्था निर्माण केल्या गेल्या की आपल्याला आपलं अपूर्णत्व जाणवावं आणि ते पूर्ण करण्याच्या प्रवासासाठी एक भक्कम 'चौकट मिळावी. त्या चौकटीत राहून आपण पूर्णत्वाला जाण्याचा आणि पूरकतेचा प्रवास सुरु ठेवावा .... अगदी ह्या जन्मात नाही तरी जमलं तर पुढे कितीतरी जन्मांनंतर, कधीतरी हे पूर्णत्व प्राप्त व्हावं.
व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर असं जाणवतं की माणूस म्हणून आपण खरं तर किती अपूर्ण आहोत...त्यामुळे 'श्रेष्ठत्व' तर दूरच पण आपण 'पूरकत्वाचा' तरी विचार करू शकतो का? आपण माणूस म्हणून आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी तरी पूरक आहोत का? आपल्यामुळे आपल्या स्वतःचा, कुटुंबाचा, आपल्या परिघाचा, समाजाचा उद्धार झाला आहे का ? हा विचार केला कि आपण किती दूर आहोत आजोबांनी जे स्वप्नं/ध्येय आपल्याला दाखवलं आहे त्यापासून ह्याची जाणीव होते....
स्वतःपुरतं आणि आपल्या कटुंबापुरतं म्हटलं तर आपण सगळेच अपूर्ण आहोत....पण आपला आवाका लक्षात घेऊन आपल्याला माहित असतं की आपल्या उणिवा पूर्ण करणारे आपल्याच अवतीभवती आहेत, आपल्याला पूरक आहेत आणि त्यांचा आपल्याला खूप मोठा आधार आहे. ज्यांना हा विचारही शिवत नाही ते लोक मीच किती विद्वान, मला कोणाची गरज नाही, मीच एकटा/एकटी 'श्रेष्ठ' ह्या विचारात गुरफटून जातात.
मी काही समाज कसा असायला हवा ह्यावर भाष्य करण्याच्या योग्यतेची नाही पण तरी प्रत्येक गोष्टीचा व्यक्तिगत, कुटुंब, संस्था, समाज, राज्य, देश आणि वैश्विक पातळीवर हाच विचार Extrapolate केला तर आपण सामूहिक रित्या परीपक्व होऊ आणि सकस समाज घडवू असं नक्की वाटतं.
'एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ' ह्या पंक्तीचा माझ्या आवाक्यातला हा अन्वयार्थ आहे असं मला वाटतं.
© कविता सराफ
४ ऑगस्ट २०२३
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations