Kavita's Kaleidoscope
Unconventional कृष्ण
Unconventional कृष्ण…
चिंतन
Kavita Saraf
8/31/20251 min read

Unconventional कृष्ण….
कृष्णासाठी काहीच सरळ- सोपं नव्हतं ..... नाव, तिथी, वेळ, मुहूर्त, जागा, जन्म देणारे बेडीत अडकलेले - नात्याने आई-वडील पण पालनपोषण करणारे दुसरेच.......
शत्रू तर कसा की कधी हा जन्माला येतो आणि मी मारतो म्हणून टपून बसलेला पण तरी हा त्याच्या नाकावर टिच्चून दिव्य लीला करून जन्माला आला .....जन्मतःच ह्याला मारून टाकला तरच बरं होईल असं सांगणारे आजूबाजूला, विष देऊन मारून टाकायला आलेली बाई, जागोजागी शत्रू अघ, बक, शकट, कालिया आणि किती तरी पण हा पठ्ठ्या सगळ्यांना पुरून उरला ....
खोडकर पण लाघवी, भरभरून आयुष्य जगणारा, मित्रांवर प्रेम करणारा, मैत्रिणींना समजून घेणारा, त्यांना जगायला शिकवणारा, अमर्याद प्रेम करणारा पण तरी तितकाच कठोर ..... की गोकुळ सौडून जायची वेळ आली तरी कुठलाच पाश कृष्णाला 'अडकवून' नाही ठेवू शकला ..... गोपिकांनी त्याच्या ह्या सगुण रूपावर इतकं प्रेम केलं की त्यापुढे उद्धवही नतमस्तक झाला ..... एकदा जिथून निघाला तिथे परत कधीच फिरून परत आला नाही .....अपवाद फक्त वासुदेव आणि देवकीचा....
ब्रह्मदेव, इंद्र, भीम .....ह्या सर्वांचं गर्व हरण करणारा .... पण भोळ्या गोकुळवासियांच्या गळ्यातला ताईत..... शेष आणि लक्ष्मी ह्या अद्वैताची काळजी घेणारा .....
शत्रूला नेहेमीच नामोहरम करणारा पण त्यासाठी युद्ध केलचं पाहिजे असं नाही.....कधी पळून जाऊन, कधी हार पचवून, कधी नुसत्या non-conventional आयुधांनी तर कधी फक्त मध्यस्थी किंवा शिष्टाई करून वेळ निभावून नेणारा .....कधी शस्त्राला हातही लावणार नाही असं कुंतीला दिलेलं वचन पाळणारा ..... आणि अगदी कस्पटासमान सारथ्याचं कर्तव्य करणारा .....योगेश्वर कृष्ण ...... किंवा अगदी शेवटी मस्करी केलीत तर किती महाग पडू शकते ते दाखवून देणारा .....
गुरुचं महत्त्वं परंपरेनुसार अबाधित राखणारा ..... गुरुपत्नीला मदत करणारा, सुदाम्याला 'आपलं कर्मचं आपलं भाग्य ठरवत असतं' असं पटवून देणारा पण गुरुबंधूंवर जिवापाड प्रेम करणारा .... गुरुदेव आणि गुरुपत्नीची मारली गेलेली मुलं परत आणून गुरुदक्षिणा देणारा ....
अर्ध्या रात्रीत विश्वकर्म्याला बोलावून द्वारका वसवणारा ..... आदर्श राजा ....
आधीच्या जन्मातली कसर भरून काढली असं वाटावं इतक्या स्त्रिया करणारा पण त्यामागे उत्तरदायित्व स्वीकारण्याचा वस्तुपाठ देणारा, प्रत्येकीला खुश ठेवण्यासाठी झटणारा, राधेनंतर कोणाचा असेलच तर तो रुक्मिणीचा ..... पण तरीही त्यात अडकून न जाता स्वतःला ब्रह्मचारी म्हणवून घेणारा.... ऋषीमुनींना प्रमाण मानणारा ....
आपल्या सखीच्या शीलाचं रक्षण करणारा पण तिने हाक मारेपर्यंत संयम बाळगणारा आणि नंतर 'बदल्याच्या सूडभावनेपोटी कोणीही सुखी राहू शकत नाही' आणि 'बोलताना भान सुटू नये' असं तिला शिकवणारा..... तिच्याच भरजरी वस्त्राची राखी बांधणारा भाऊ .....
धर्म म्हणजे काय हे सांगणारा, अर्जुनाला आणि पर्यायाने 'आपल्याला' कसं जगावं ह्याबद्दल बोध करणारा..... ....'तू तुझं विहीत कर्म करण्यापासून पळू शकत नाहीस' ...... त्याच्या परिणामांची तमा तू बाळगू नकोस असं अर्जुनाला पटवून देणारा .....'तू फक्त निमित्तमात्र आहेस' ...... मीच हे रहाटगाडगं चालवतो आहे.....ते कुठल्या क्षणी एखाद्याला साक्षात्कारासारखं समजावं ती 'वेळही' ठरवणारा .....
सगळं करून सवरून नामनिराळा राहणारा अलिप्त ... पण तरीही ज्यात गुंतून राहावं...ज्यावर प्रेम करावं ..... असं वाटायला लावणारा .....रामापेक्षा थोडा भाव खाऊन जाणारा ..... स्त्रियांचा लाडका देव .... पुरुषोत्तम कृष्ण .... आताच्या भाषेत सांगायचं तर picture का हिरो ......
सत्य युगातला 'राम' म्हणजे कर्तव्यपालनाची परिसीमा पण 'द्वापार' युगातला कृष्ण म्हणजे 'कर्मसिद्धांत' ..... दोघेही कळायला कठीणच...... पण तरीही नेहेमी विचार करायला लावणारे ..... प्रत्येक वेळी नव्याने 'सापडले' आहेत असं वाटावं तितक्यात निसटून जाणारे .... हुरहूर लावणारे ..... एकूण काय तर मृगजळ....क्षितिजच....
कृष्ण स्वतःच इतका unconventional आहे की माझं लिखाणही त्याच्यावर लिहिताना साच्यात अडकल नाही बहुधा..... ??? त्याच्या मोरपीस आणि निळाईबद्दल परत कधीतरी ....
© कविता सराफ
३१-०८-२०२१
Kavita's Kaleidoscope
Reflective essays, quiet prose, and cultural commentary.
Home-Essays-About-Contact
Correspond
ksaraf2004@gmail.com
© 2026 Kavita's Kaleidoscope - Written by Kavita Saraf.
Quiet Prose & Observations