round blue and white hole under blue and white sky

वर्तुळ

Circle of life

चिंतन

Kavita Saraf

11/1/20221 min read

वर्तुळ

आज सुदर्शन क्रिया करताना breath circles चा विचार करताना Lion King नाटकामधला circle of life चा संवाद आठवला आणि गाणं आठवलं....खूप छान वाटलं .....Disney community म्हणूनच मला कधी कधी खूप भारतीय मानसिकता असलेली वाटते .....त्यांची प्रत्येक कलाकृती कुठेतरी आपल्याला आपलाच शोध घ्यायला भाग पाडते किंवा निश्चित असा विचार देते ...... वाटलं की श्वासापासून सुरु झालेलं जीवन श्वासानेच संपतं पण त्या मधल्या काळात त्या जीवाचं वर्तुळ पूर्ण होत किंवा त्याच्या सुप्त ईच्छा पूर्ण करण्यासाठी कोणीतरी आपल्यातच ते वर्तुळ सामावून घेतं....... खरं तर माहित नाही की असे विचार यायला हवेत आणि आले तरी ते लिहून काढावे किंवा ते share पण करावे कि नाही ......चाचपडत सुरु झालेला प्रवास आहे तर म्हटलं कि स्वतःशी प्रामाणिक राहून लिहून काढावं .....

प्रत्येकाचं वर्तुळ पहिल्या श्वासापासूनच आखायला सुरवात झालेली असते ..... ह्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी बहुतेक वेळा आपण, आपलं कुटुंब, आपले संस्कार, विचार, आपले श्रद्धास्थान, आपले मित्र मैत्रिणी, खूप जपलेली नाती अस खूप काहीसं असतं ....आणि ह्या वर्तुळाचा प्रवास होत असताना आपण बहुतेकवेळा इथे फिरून परत येता येईल ना असा विचार करून तेवढीच त्रिज्या आखतो ......मर्यादा घालतो स्वतःवरच पण तरी अजमावून बघण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड स्वस्थ बसू देत नाही आणि आपण ही त्रिज्या ताणायचा प्रयत्न करतो ..... आणि प्रत्येकवेळी परत येतो तेव्हा हा विश्वास असतो की अरे हे तर आपल्याला जमतं आहे......दूर जाणं आणि परत फिरून माघारी येणं आणि ..... परत परत करून बघताना आपली त्रिज्या वाढत जाते....पण त्याहिपेक्षा लवचिकता कितीतरी पटींनी वाढते .... आपण खूप नव्या अनुभवांना सामोरे जातो पण नेहेमी केंद्राकडे परतायचा आहे हा विचार पक्का असतो...... ज्यांची हि नाळ घट्ट नसते त्यांचे मग सरीतून ओघळलेले मोती व्हायला वेळ लागत नाही ..... त्रिज्या जशी वाढते तसा परिघही मोठा होत जातो....आपलं वर्तुळ वाढत जातं आणि खूप छोटी-मोठी वर्तुळ ह्या मोठ्या परिघात सामावली जातात .....कधी नुसतीच एकमेकांना स्पर्श करणारी .... कधी छेदणारी, कधी भेदून आरपार जाणारी, कधी आवाक्यात न येणारी .... परीघ जितका मोठा तितकाच व्यासही मोठा आणि म्हणूनच एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे यायला लागणारा वेळही तितकाच मोठा ..... सर्वज्ञ व्यासांसारखेच ...आपल्या अनुभव परिघावरच्या दोन बिंदूंना जोडणारे पण केंद्रातून गेलेले अनुभव तितकचं शहाणपणही घेऊन येणारे, तावून-सुलाखून निघतांना अमूल्य ठेवा सापडावा तसं आपलंच आपल्याला कळलेलं काही .... घेता घेता देण्यात असलेलं सुखं, कमावल्यापेक्षा गमावलेलं कधीचं परत येणारं नाही ही जाणीव, कोणीतरी समजून घेण्यापेक्षा कोणालातरी समजावून देण्याची वृत्ती, पटलं नाही तिथे सोडून देण्याची क्षमता, आणि मुख्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधलं सुख अनुभवण्याची जमलेली कला ...... पडलेले प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरं....कधी पटणारी....कधी न पटणारी .....कारण तेवढी तयारीच नाहीये ..... आतापर्यंत आपल्याला वाटत असलेलं फसवं सत्य ... जे केंद्रस्थानी जो सगळ्यात मोठा बिंदू आहे तो आपण...... पण तसं ते नाहीच आहे ..... धूसर होत जाणारं आपलं महत्त्व आणि आपल्याला कळलेलं पण न वळलेलं की आपण भवतालच्या दृष्टीने एक बिंदुमात्र.....पण त्याचाच एक कण आणि जिथून आलो तिथेचं परत जाण्यासाठी केलेला हा प्रवास हेच core आहे ...... म्हणूनच प्रदक्षिणा हि डावीकडून सुरु होऊन उजवीकडे जिथे सुरवात झाली तिथेच संपते. मला वाटतं ह्याचा संबंध मेंदूशी पण आहे .....डावा भाग लिहिणं-वाचणं-आकडेमोड करून मग big picture पहाणं …. मला तर वाटतं ... अवकाशातून केंद्राकडे (outward-In), केंद्रापासून परिघाकडे (Inward-out) , नंतर परिघाकडून केंद्राकडे (Outward-In) आणि मग केंद्र ते परिघ (Inward-Out/realization) आणि परीघ ते अवकाश (Extrapolate) अशा टप्प्यांमध्ये हे वर्तुळ पूर्ण झालं पाहिजे ?..... त्यासाठीच केलेला हा अट्टाहास आहे ?

© कविता सराफ

नोव्हेंबर १, २०२२