brown wheat in close up photography

वायू

Wind

चिंतन

Kavita Saraf

10/21/20251 min read

वायू

पंचमहाभूतांमधलं चौथं तत्व म्हणजे वायू ... स्पर्श हे त्याचं सूक्ष्म स्वरूप. आपल्या शरीरातलं वायू चक्र हृदयस्थानी आहे आणि त्याची देवता पवनपुत्र हनुमान आहे. ह्याच हनुमानाने, ह्रदयस्थ सीताराम असले की अनाहताचा अनुभव येतो हे सगळयांना दाखवून दिले. स्पर्श त्वचेला जाणवतो पण परमतत्वाचा स्पर्श अंतरंगाला (हृदयाला) झाला की जीवन योग्य मार्गाला लागले ह्याची जाणीव होते दोन्ही बाबतीत वायूच आपल्याला ह्या स्पर्शाची जाणीव करून देतो. सगळ्या नैसर्गिक मूलभूत तत्वांमध्ये किती सुसूत्रता आहे त्याचा पुनःप्रत्यय आहे हा. गती, वेग, निरंतर चालना ह्या गोष्टी किती आवश्यक आहेत रोजच्या जगण्यासाठी हे वायूच्या अस्तित्वामुळे अधोरेखित होतं.

ह्या वायू देवतेचा अत्यंत बुद्धिमान मुलगा म्हणजे हनुमान ज्याने भक्तिची परिसीमा गाठली, तीच परंपरा पुढे तुलसीदासानी चालवली आणि हनुमान चालीसा लिहून ह्या वायुपुत्राचे गुणगान गाऊन भक्तीचं वर्तुळ पूर्ण केलं. हा चिरंजीवी भक्तीचा आदर्श अजूनही भाविकांना नर्मदा प्रदक्षिणा करताना कधी कधी भेटतो आणि त्यांचे जीवन कृतार्थ होते. अठरा पुराणांमधलं महत्वाचं पुराण म्हणजे 'वायू' पुराण... ज्यामध्ये विश्वाची उत्पत्ती, काळक्रम, युग, सूर्यवंश, महाभारत, भूगोल, वर्णाश्रम धर्म, शिवस्तुती, तीर्थस्थळ आणि अशीच बरीच माहिती आह. वायू हा भू, भुवः आणि स्वः म्हणजेच भूलोक, मर्त्यलोक आणि देवलोक ह्यामधलं सामायिक माध्यम आहे. आपल्या धर्माने आपल्या शरीरातलं ह्या वायूचं अस्तित्व पंचप्राणरुपाने मान्य केलं आहे, पंचप्राणांच प्रत्येकाचं कार्यही आखून दिलेलं आहे. प्राणरुपी वायू आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या जन्माला येण्यापासून नित्य वास करतो आहे आणि त्या शेवटच्या श्वासापर्यंतच आपलं अस्तित्व आहे. ह्याच प्राणाचं नियमन - प्राणायाम करून आपण आपलं भू, भुवः किंवा स्वः किंवा त्यापलीकडे जे काही 'साध्य' आहे, ते 'साधू' शकतो.

शाळा-कॉलेज मध्ये असताना गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगला गेले असताना सूं-सूं आवाजाने, कास पठारावर हलणाऱ्या फुलांनी, दऱ्या-खोऱ्यांमधून रोंरावणाऱ्या हवेने,झुळकांमधून येणाऱ्या सुगंधाने, पानांच्या सळसळीने वायूच्या अस्तित्वाची जाणीव नेहेमी करून दिली आहे आणि योग्य ती दखल घ्यायची सवय लावली आहे. आपल्या रोजच्या जगण्यात, बोली भाषेतही ह्या वायू साठी शेलक्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत ... 'कानात वारा भरलेल्या वासरागत होणे', 'वाऱ्याच्या वेगाने येणे', 'नव्या विचारांचे वारे वाहणे', 'वारा कोणत्या दिशेने वाहतो आहे ते अजमावणे' ....

मी पहिल्यांदा शिकागोला एकटी आले तेव्हा ह्या शहराला windy city म्हणतात ते कळलं आणि ते का म्हणतात ते मी चांगलंच अनुभवलं. Lake Michigan ची भव्यता, भणाणा वारा, Michigan Lake-Chicago River चा काटकोन आणि इथल्या skyscraper buildings ची wind-withstanding architectures ह्या सगळ्यांनी मी अगदी भारावून गेले होते. पुढे मला ह्याच शहरातल्या अत्यंत टोलेजंग आणि सुबक skyscrapper मध्ये ५ वर्ष राहण्याचा योग आला. कित्येक वेळा 'वाऱ्यामुळे' आक्खी इमारत डुलते हे आम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे. त्याच इमारतीच्या ६० व्या मजल्यावरून आम्ही खूप अविस्मरणीय-नितान्त सुंदर प्रसंग अनुभवले. हा 'वाराच' त्या सगळ्या प्रसंगांचा साक्षीदार आहे.

माणसाला ह्या पंचमहाभूतांच्या शक्तींचं आकलन होऊन त्याचा सुयोग्य वापर करण्याचं कौशल्य प्राप्त झालं आहे. मी Springfield ला येते तेव्हा रस्त्याच्या बाजूला मोठे मोठे wind-turbines दिसतात. ऊर्जा निर्मितीसाठी सगळ्यांत सोपा, समाजोपयोगी आणि अजिबात विघातक नसलेला हा उपाय आहे आणि ती ह्या 'वायूतत्वाने' 'वसुंधरेला' केलेली सगळ्यात मोठी मदत आहे असं मला वाटतं. जिथे ह्या शक्तींचा कल्याणचा तोल सांभाळला गेला तिथे सुजलाम-सुफलाम अनुभव आले पण जिथे हा तोल ढळला तिथे अनर्थ ओढवला... भूकंप, त्सुनामी अतिवृष्टी, कडाक्याचं ऊन, दुष्काळ, वादळं, हिमवादळं, कडाडणाऱ्या विजा, ढगफुटी ही सगळी त्याची संहारक रूपं...सगळीच महाभूतं सकल कल्याणार्थ असली तरी त्यांमध्ये सर्वसंहारक शक्तीसुद्धा आहे त्यामुळेच ह्या सगळ्या पंचमहाभूतांच स्वतःचं असं एक-एक continuum आहे असं मला वाटतं. प्रलयाच्या वेळी ह्या सगळ्या संहारक शक्ती एकत्र येऊन जुन्याचा ऱ्हास आणि नव्याच्या सृजनासाठी त्याच्या कल्याणार्थ परब्रह्माला मदत करत आहेत असा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणूनच सृष्टीचं हे 'चक्र' युगानुयुग अव्याहत 'चालत' आहे ...

२१ ऑक्टोबर २०२५
© कविता सराफ