body of water under sky

पाणी

water

चिंतन

Kavita Saraf

8/1/20261 min read

पाणी

आज राहुल शर्माचा soundscape water album ऐकताना पाण्याबद्दल विचार करत होते

पाण्याला किती योग्य नाव आहे ना 'जीवन' ...

जीवनाची सुरवातच पाण्याच्या स्पर्शाने

जन्माला येताना आनंदाश्रूंनी स्वागत

बाळाचं अस्तित्व मान्य ते सुद्धा पहिल्या रडण्याने

ह्या रडण्यापासून सुरु झालेले जीवन ….

त्या रडण्यापर्यंत भरभरून जगण्यासाठी….

सरते शेवटी पाण्यातच विलीन होण्यासाठी…..

जीवाचा जीवनातून जीवनाकडे जाण्याचा प्रवास.... म्हणजेच जीवन?

खर तर पाणी किती समर्पक वस्तूपाठ आहे चांगलं 'जीवन' जगण्यासाठी !

पाणी दाखवून देते की सतत वाहतं राहा

साचून राहू नका....वेग असू द्या

कुठेही सहज मिसळून जा

कुठल्याही रंगात रंगून जा

लवचिक राहा ... ज्यात ठेवला त्याचा आकार घ्या ....

संपन्नाभुवासाठी पंचेंद्रिय....शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श ….जागृत ठेवा…..

म्हणूनच ५०% पेक्षा जास्त पाण्याने बनलेलं असतं का शरीर ?

पाण्याचे प्रकार तरी किती....जसे माणसांचे......?

छोटी-छोटी बाळ ....दवबिंदू

बागडणारी-धडपडणारी मुलं ....पागोळ्या

किशोरवयीन मुलं ..... झरे

हसरी खेळकर मुलं ..... धबधबा

लहरी तालेवार माणसं .... पाऊस

शांत,संयमी, सुगृहिणी ..... नदी.... शिस्तबध्द, कुठे पोहोचायचे आहे त्याबद्दल जागरूक, मिलनोत्सुक.... पण वेळप्रसंगी नद होण्याचं सामर्थ्य बाळगून असलेली

पुरुषोत्तम .... धीरगंभीर समुद्र.... खळाळता समुद्र .... वरून शांत, पण मनात असंख्य विचार लहरी, अमर्याद खळबळ

साहसी, ध्येयप्रेरित, झोकून देणारी ...... कड्यावरून कोसळणारे प्रपात

आजी-आजोबा, अपार माया करणारी ..... मेघ

मुला-माणसांमध्ये रमणारी पण एकमेकांना मदत करणारी ...... तलाव

कामानिमित्त स्थलांतर करणारी .... ओढा

अनुभवसंपन्न, वयस्कर .... विहिरी

आत्ममग्न, काळाबरोबर न बदलणारी .....डबकी, उथळ पाणी

कपटी .....गढूळलेली

वाया गेलेली-सुधारण्यापलीकडची ........ नाला-गटारं.... ?

ओझ्याखाली, दबावाखाली खदखदणारी ....वाफ

थंड डोक्याने संहार करणारी ......गारा

थंड...सहज विरघळणारी ..... बर्फ

आत्मोन्नतीसाठी धडपडणारी...... शुद्धजल

स्वशोधासाठी झगडणारीं ..... मृगजळ

संत..... तीर्थ

सद्गुरू ....मोक्ष ..... क्षितिज ?

© कविता सराफ

January 31, 2020