person holding black and white 10 print

वेलकम २०२०

Welcome 2020

चिंतन

Kavita Saraf

11/1/20221 min read

वेलकम २०२०

अजूनपर्यंत २००० साल उजाडलेल आठवतं आहे आणि आता २०२०..... बापरे मध्ये चक्क २० वर्षांचा काळ गेला आणि आपण खूपच वयाने मोठठं झाल्याची जाणीव झाली. पण त्यासाठी खंत नक्कीच नाही, ह्या २० वर्षांनी मला अनुभवांनी , नात्यांनी, कटू-गोड आठवणींनी, सुख-दुखातल्या प्रसंगांनी शहाणं केलं का अनुभवसंपन्न केलं? अनुभवसंपन्न. ह्या सर्व काळात, जाणीवा शाबूत ठेवता आल्या किंवा वय त्यासाठी साजेस होतं म्हणून ते झालं. तपशीलात जाऊन विचार केला तर प्रत्येक अनुभवावर निबंध लिहिता येईल....

जानेवारी २०२०.... प्रत्येक नवं वर्ष जसे अनेक संकल्प मनात घेऊन उजाडतं तसचं हेही वर्ष अपवाद नाही.....

पण एका गोष्टीचा आनंद आहे की व्यायाम हा इतका अंगवळणी पडला आहे की तो कायमच करता यावा आणि आरोग्यात सुधारणा व्हावी हा विचार ह्यावर्षीही अग्रक्रमी स्थान राखून आहे.

स्वतःला कमी लेखणं थोड कमी करता येईल का ह्याबाबतीत विचार सुरु ठेवला पाहिजे ....राहुल नेहेमी ह्यावरून रागावतो .... पण मला अजून down to earth राहणे, स्वतःला कमी लेखणं ह्यातली सीमारेषा कळलीच नाहीये..... मी माझ्याच विचारांमध्ये सुसंगती लावण्याचा विचार करते आहे बहुधा.... . ह्याचा अर्थ काहीतरी अजून शिकायचं आहे...हे प्रगतीच लक्षण आहे ...

to be good at metacognition...

हे सगळं साध्य करायचं आहे म्हणूनच तर हा सगळा लेखनप्रपंच चालवायचा ठरवलं आहे .....लिहिलेल खूप मनापासून असतं आणि ते वाचलं की आरसा बघितल्यासारख वाटत, मग अजून वाचन, एक पाऊल पुढे, त्यातून प्रेरणा ...आणि पुढे अजून लिहावंसं वाटतं....चक्र आहे ..... शाळेत असताना जलचक्र शिकले होते ना तसच काहीसं आहे....

काही काही प्रसंग खूप शिकवून जातात ना…. तसाच एक प्रसंग अनुभवला ...... आपली तब्येत चांगली असणारच आहे हे आपण किती गृहीत धरतो ना? एक दिवस जरा काही खुट्ट झालं आणि डॉक्टर कडे वाऱ्या, तपासण्या, त्याचा ताण, स्पेशियालिस्टच्या फेऱ्या, निदान, फेरतपासणी ... हे सुरु असल कि सगळं घर किती बेचैन होऊन जातं ... त्यातून हे घरातल्या स्त्रीबाबतीत असेल तर सगळं घर ठप्प झाल्यासारखं होऊन जातं, मुलं खूपच शहाणी-मोठ झाल्यासारखी वागतात, आपण मनोमन आधी झालेल्या चुकांची माफी मागून टाकतो, सगळं अवसान गोळा केल जातं ... आलेल्या प्रसंगाला सामोरे जातो...आपल्या श्रद्धा स्थानाचा खूप आधार वाटतो अशा वेळी....सुटकेचा निश्वास त्यामुळेच टाकता येतो.... अजून एक जाणवल ते म्हणजे नवऱ्याचं प्रेम बायकोला कणखर बनवतं, पण बायकोचं प्रेम नवऱ्याला हळवं करतं ? ......किती अनाकलनीय आहे हे ..... तसं नाही ....बहुधा नैसर्गिक .....?


क्षण .....

काही दिवसांपासून वाटतं आहे की
जगावा प्रत्येक क्षण परिपूर्ण
नसावी आठवण मागच्या दुःखाची
अन नसावी अपेक्षा येणाऱ्या सुखाची

जखमी करतील काही क्षण
भरून येतील कसे ते व्रण ?

तरीही अनुभवावा एक एक क्षण
हसरे असतील काही म्हण

निवांत असू द्यावे हे मन
भरभरून देईल मग तो क्षण

ओघळू न द्यावे असे कैक क्षण
जमतील अनुभवओंजळीत मण

माळच गुंफू ही क्षणोक्षण
मोती होईल मग आठवण

असाच येईल का मग क्षण?
ओळख देईल का मी कोण ?